आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाहुल गड्डा यात्रेची, सिद्धेश्वर यात्रा समन्वयाने करण्यावर प्रशासनाचा भर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पुढील महिन्यापासून सुरू होत असलेल्या ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेच्या नियोजनासंबंधी शनिवारी दुपारी पोलिस आयुक्तालयात बैठक झाली. यंदाच्या वर्षी यात्रेत कोणत्याही मुद्द्यावरून वाद उत्पन्न होऊ नये, तसेच समन्वयाने गुण्यागोविंदाने यात्रा पार पडावी याकडे पोलिस आणि जिल्हा प्रशासनाचे कल असल्याचे दिसून आले.

पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी बोलावलेल्या बैठकीत जिल्हाधिकारी रणजित कुमार, मनपा आयुक्त विजयकुमार काळम पाटील, महापौर सुशीला आबुटे, सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, विश्वनाथ आळंगे, राजशेखर हिरेहब्बू, बाळासाहेब भोगडे, चिदानंद वनारोटे यांच्यासह पोलिस आणि मनपा अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, होम मैदानावरील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूचा रस्ता दरवर्षीप्रमाणे यात्रेसाठी वापरणार असल्याची भूमिका देवस्थान पंच कमिटीने घेतली आहे. तसेच मैदानावरील धूळ कमी करण्यासाठी शेणाचा सडा मारण्याची तयारी दर्शवली आहे. रस्त्याबद्दल कोणताही निर्णय शनिवारच्या बैठकीत झाला नाही. येत्या १५ डिसेंबर रोजी पुन्हा एक बैठक होणार आहे. त्या बैठकीत सर्व अडचणी सुटतील, असा विश्वास पोलिस आयुक्त सेनगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
समन्वयाने घेतले जातील निर्णय
-ग्रामदैवतसिद्धेश्वरयात्रा सुनियोजित, शांततेने पार पाडण्यासाठी सर्व विभागांचा समन्वय महत्त्वाचा आहे. मंदिर समिती प्रशासनात योग्य समन्वय ठेवून, चर्चा करून विषय सोडवले जातील. याबाबत दुसरी बैठक १५ डिसेंबर रोजी होईल. यामध्ये यात्रेशी निगडित सर्व संबंधितांचे म्हणणे ऐकून निर्णय घेण्यात येईल.''
रणजितकुमार, जिल्हाधिकारी

प्रशासनाची यंदाची भूमिका
धूळ रोखण्यासाठी शक्य असेल तेवढे मॅट वापरा, पाणी मारा, शेणाचा सडा मारा, एकंदरीत धुळीचे प्रमाण कमी करा. नंदीध्वज मार्गावर तेवढ्यापुरता मॅट वापरू नका. नंदीध्वज गेल्यानंतर त्या मार्गावरही मॅट वापरा. होम मैदानावरील गड्डा यात्रेत उभारल्या जाणाऱ्या स्टॉलच्या भाड्यासंदर्भात मागील वर्षी ज्या पद्धतीने निर्णय झाला होता त्याप्रमाणे यंदाही करा. मार्केट पोलिस चौकी ते सिद्धेश्वर प्रशालेसमोरच्या रस्त्यापर्यंत रस्त्यावर स्टॉल उभारू नका, अशी भूमिका प्रशासनाने बैठकीत मांडल्याची माहिती पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी दिली.
मागील वर्षीचा वाद
गेल्यावर्षी तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी केलेला आपत्कालीन रस्ता हा वादाचा ठरला होता. त्यावरून जिल्हा प्रशासन आणि मंदिर समितीत संघर्ष पेटला होता. रस्ता हा होम मैदानाचाच भाग असल्यामुळे आम्ही पूर्ण रस्ता वापरणार, अशी भूमिका पंच कमिटीने घेतली होती तर तो रस्ता आपत्काळात वापरण्यासाठी ठेवावा, यासाठी श्री. मुंढे आग्रही होते. अखेर मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर वाद शमला होता.

मनपा सुविधा देणार
-श्रीसिद्धेश्वरयात्रेत महापालिकेकडून दरवर्षीप्रमाणे सर्व सुविधा देणार आहे. पोलिस आयुक्तालयात झालेल्या बैठकीत महापालिकेने याबाबत माहिती दिली आहे. मैदान सपाटीकरण, रस्ते दुरुस्ती, शौचालय उभारणे, स्वच्छता, झाडाच्या फांद्या तोडणे आदी कामे महापालिका नेहमीप्रमाणे करणार आहे. त्यासाठी तयारी करण्यात आली आहे.'' विजयकुमारकाळम, मनपा आयुक्त
गेल्या वर्षी कोण बैठकीला आले नाही त्यांना विचारा
गेल्या वर्षी पोलिस आयुक्तांनी बोलावलेल्या बैठकीला जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे गेले नव्हते. त्यामुळे जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्त यांच्या अधिकारासंदर्भात चर्चा रंगली होती. जिल्हाधिकारी हे पोलिस आयुक्तांना आदेश देऊ शकत नाहीत, अशी भूमिका आयुक्तांनी घेतली होती. या पार्श्वभूमीवर यंदा विद्यमान जिल्हाधिकारी हे पोलिस आयुक्तालयात कसे आले, असा प्रश्न उपस्थित केला असता पोलिस आयुक्त सेनगावकर म्हणाले, “जिल्हाधिकारी आमच्याकडे येतात, मी त्यांच्याकडे जातो. आमच्यात असे काही नाही. गेल्या वर्षी कोण बैठकीला आले नाही त्यांना विचारा.’
बातम्या आणखी आहेत...