आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Siddheshwar Yatra Starts, Due To Administration Darkness

श्रीसिद्धेश्वर यात्रा सुरू; प्रशासनामुळे अंधार कायम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - श्रीसिद्धेश्वर यात्रेतील धार्मिक विधींना अाज उत्साहात सुरुवात झाली. पहिल्या दिवशीच्या नंदीध्वजाच्या तैलाभिषेक मिरवणुका निघाल्या. पण दुसरीकडे गेल्या दीड महिन्यापासून वादात सापडलेली होम मैदानावरील गड्डा यात्रा मात्र प्रशासनातील एनअोसी घोळामुळे बुधवारी रात्रीही अंधारातच राहिली. तीन दिवसांपूर्वी मनपा म्हणत होती मैदान अामच्याकडे नाही, त्यामुळे एनअोसी कशी देणार? अाज मात्र एनअोसी देण्यासाठी मनपा तयार झाली. मनपाची एनअोसी मिळाल्याने पोलिस एनओसी देत नव्हते. या घोळात व्यापाऱ्यांना वीज जोडण्या घेण्यासाठीच्या तांत्रिक बाबींची पूर्तता करता अाली नाही अन् यात्रेत अंधारातच राहावे लागले. मागील वर्षीही यात्रेच्या सुरुवातीला अशीच स्थिती होती. आता उद्या मैदानावर उजेड पसरेल असे अधिकारी सांगताहेत. त्यादृष्टीने हालचालीही सुरू अाहेत.

मनपाच्या घोळामुळे व्यावसायिकांना त्रास
महापालिकेनेहोम मैदानावर आपत्कालीन कक्ष उभे केले. पण प्रत्यक्षात एनअोसी द्यायची की, नाही याचा घोळ तीन दिवसांपासून घातला. त्यामुळे एकूणच यात्रेवर परिणाम झाला अाहे. छोट्या व्यावसायिकांचे हाल झाले. अाता मात्र महापालिका ना हरकत प्रमाणपत्र देणार आहे. त्यासाठी स्टाॅलधारकांची यादी लेखी स्वरूपात पालिकेच्या वतीने मंदिर समितीकडे मागण्यात आली. रात्री उशिरापर्यंत यादी मिळाली नाही. सहा मक्तेदारांची यादी मंदिर समितीकडून दिल्याची माहिती मनपा भूमी मालमत्ता विभाग प्रमुख सारिका आकुलवार यांनी दिली. त्या मक्तेदारांशी गुरुवारी संपर्क साधून यादी घेऊन परवाना देणार असल्याचे आकुलवार यांनी सांगितले. पण हीच यादी तीन दिवसांपूर्वीच मागितली असती तर हा घोळ झाला नसता. अन् व्यावसायिकांना त्रास झाला नसता.

महावितरणाच्या डिव्हिजनमध्ये ३५ स्टॉलधारकांनी अर्ज सादर केले. त्यांच्याकडून कोटेशन भरून घेण्यात आले. या लोकांनी टेस्ट रिपोर्ट, सब इन्स्पेक्टरची परवानगी सादर केली. मात्र महावितरणच्या पाहणीमध्ये या लोकांनी अर्थ लिकेज सर्किट बोर्ड आणि अर्थिंगचे काम करून घेतले नसल्याचे दिसून आले.

सुरक्षेच्या दृष्टीने ही कामे करून घेणे अत्यावश्यक आहे. या सर्व स्टॉलधारकांना सूचना दिल्यामुळे बुधवारी याचे काम तत्काळ सुरू झाले. हे काम पूर्ण होताच यांना गुरुवारी वीज कनेक्शन देण्यात येईल. तसेच सी डिव्हिजनमध्ये आतापर्यंत फक्त सात लोकांनी अर्ज सादर केले आहेत. त्यातील केवळ चार जणांनी कागदपत्रांची बुधवारी पूर्तता केली. यामुळे बुधवारी रात्री या केवळ चौघांना वीज कनेक्शन देण्यात आले.

करमणूक कराची परवानगी एकाही स्टाॅलने घेतली नाही
होम मैदानावरील गड्डा यात्रेत विविध करमणुकीचे स्टॉल उभारण्यात येत आहेत. स्टॉलची उभारणी पूर्ण झाली आहे. मात्र अद्याप एकाही स्टॉलधारकाने करमणूक कर विभागाची कोणतीही परवानगी घेतली नाही. करमणूक करासंबंधी बुधवारपर्यंत एकही अर्ज आला नसल्याची माहिती करमणूक कर अधिकारी अमोल कदम यांनी दिली. गणशोत्सवात प्रशासनाने सुविधांचे आश्वासन पाळले नव्हते. जत्रेतही सलग दुसऱ्या वर्षी यात्रा सुरू होऊनही प्रशासनातील समन्वयाअभावी व्यावसायिक बुधवारी अंधारातच राहिले.

जिल्हा प्रशासनाने आपत्कालीन मदत प्रतिसाद केंद्र स्थापन केले आहे. यात्रेतील सर्व घडामोडींचे नियंत्रण करण्यासाठी विविध विभागांचे १०० पेक्षा अधिक कर्मचारी नियुक्त केले आहेत. कृती आराखडा अंमलबजावणीच्या सूचना संबंधितांना दिल्या अाहेत, जे विभाग अंमलबजावणी करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी शहाजी पवार यांनी दिली. यात्रेच्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त विजय काळम-पाटील प्रांताधिकारी शहाजी पवार यांनी होम मैदानावरील उभारलेले विविध स्टॉल, आपत्कालीन रस्ता, सीसीटीव्ही कॅमेरे आदी सुविधांची संयुक्त पाहणी केली. तहसीलदार हणमंत कोळेकर, तहसीलदार रघुनाथ पोटे करमणूक कर अधिकारी अमोल कदम या अधिकाऱ्यांचीही देखरेखीसाठी नियुक्ती केली आहे. सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल, होम मैदान मनपा प्रभाग कार्यालयात ही केंद्रे सुरू असतील. एका कार्यालयांतर्गत ३३ कर्मचारी कार्यरत आहेत.

पालिका, वीज,बांधकाम पोलिस प्रशासनातर्फे एनअोसी देण्यात येत अाहेत. गुरुवारी ती प्रक्रिया पूर्ण होईल. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी साैजन्याने काम करीत अाहोत. रवींद्र सेनगावकर, पोलिस अायुक्त

स्टाॅलधारकांची यादीमंदिर समितीकडून मागवली आहे. ती आल्यावर परवाना देऊ. यात्रा खर्च वजा जाता अन्य रक्कम जमा करण्याचे पत्र मंदिर समितीला यापूर्वीच दिले आहे. विजयकुमार काळम, मनपाआयुक्त

महावितरणाच्या डिव्हिजनअंतर्गतअसलेल्या ३५ स्टॉलधारकांनी बुधवारी अर्थ लिकेज सर्किट बोर्ड आणि अर्थिंगचे काम करून घेतले. गुरुवारी वीजजोडणी पूर्ण होईल. किरण भंडारे, ठेकेदार,मंदिर समिती

स्टॉलधारकांकडून उशिराअर्ज आले. आवश्यक ती पूर्तता होताच बुधवारी चौघांना वीज कनेक्शन देण्यात आले. उर्वरित लोकांना गुरुवारी कनेक्शन देऊ. सुरेश कोळी, अभियंता,महावितरण