सोलापूर - सहा फूट उंच, १० फूट लांब टन वजन असणारा भव्यदिव्य बैल पाहण्यासाठी सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर गड्डा यात्रेत भरलेल्या कृषी प्रदर्शनात नागरिकांची गर्दी होत आहे. इतरही अनेक गोष्टी नव्याने पाहण्यासाठी मिळत असल्याने यास प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
यंदाच्या कृषी प्रदर्शनात सांगलीच्या डिग्रजहून आलेला हा बैल म्हणजे एक विशेष आकर्षण ठरत आहे. या बैलाची माहिती देताना त्याचे मालक कृष्णा सायमोते सांगतात की, हा बैल केवळ सहा वर्षांचा आहे. दररोज १५ किलो भरडा, १० ते २० पेंढ्या हिरवा चारा असा भरपेट असा आहार यास दोन ते तीनवेळा द्यावा लागतो. तसेच दिवसातून त्याला सहा किलोमीटर फिरवावे लागते. हा संकरित जातीचा बैल असून, विविध गावच्या प्रदर्शनात याला पाहण्यासाठी गर्दी होते. प्रदर्शनात विविध छोटे, मोठे ट्रॅक्टर, राेटवायटर, दीड लाख रुपयांचे उसाचे बेणे काढायचे मल्चर मशिन, पेरणी यंत्र, कडबाकुट्टी आदी पाहण्यास गर्दी होत आहे.
बंदुका आणि बेडकीचा पाला
विविध प्रकारच्या सुरक्षिततेसाठीच्या छोट्या पिस्तूल आणि मोठ्या रायफल विक्रीस पहिल्यांदाच आल्या आहेत. पुण्याच्या जीएसएम गन हाऊसने स्वत: तयार केलेल्या या बंदुका असून हजार रुपयांपासून २५ हजार रुपयांपर्यंत यांच्या किमती आहेत. तसेच, सप्रात्यक्षिक यांचा वापर कसा करायचा? हे दाखवण्यात येत आहे. तसेच मधुमेहाचे प्रमाण कमी करण्यासाठीचा आयुर्वेदिक बेडकीचा पाला हा पालाही येथे पहिल्यांदाच विक्रीस आल्याने तो घेण्यासाठी गर्दी आहे. हा पाला खाल्ल्यावर साखर चाखली तरी ती गोड लागत नाही.
नैसर्गिक वस्तू गोशाळा उत्पादने
सेंद्रीय शेतीचा वापर करून उत्पादित करण्यात आलेला कृषिमाल या ठिकाणी विक्रीस उपलब्ध आहे. यात ज्वारी, सेंद्रीय गूळ, काकवी, डाळी, पपई, फळे, भाज्या आदींचा समावेश आहे. सोलापूरच्याच क्षीरसागर गोशाळेच्या श्री स्वामी व्याधीमुक्ती केंद्राची विविध उत्पादने प्रदर्शन विक्रीस ठेवण्यात आली आहेत. यात रक्तदाब, मधुमेह, खाज, सर्दी, खोकला, जखमा आदींवर जालीम उपाय ठरणारी विविध उत्पादने आहेत. तसेच धूप, साबण गोवऱ्याही विक्रीस आहेत. रासायनिक खते वापरून पिकवलेल्या उत्पादनास मागणी वाढत आहे.
मोहोळच्या गुरुकृपा रोपवाटिकेने अवघ्या ७० पैशांपासून शोभेची, भाजीपाला, फळभाज्या विविध झाडांची रोपे विक्रीस ठेवली आहेत. यात ७० पैशाला ढोबळी मिरची, रुपयाला बेळगाव पोपटी हिरवी मिरची तर वांगी, झेंडू, उसाची अन्य रोपे अगदी स्वस्तात विक्रीस ठेवली आहेत.
१. कृषी प्रदर्शनात प्रवेश करताना स्वागताला वासुदेव उभा आहेत. २. कृषी प्रदर्शनातील १० फूट लांब बैल पाहण्याची इच्छा पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनाही आवरता आली नाही. होम विधीसाठी आलेल्या पालकमंत्र्यांनी कृषी प्रदर्शनास भेट देऊन हा बैल पाहिला.