आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुतळा दहनास परवानगी नाकारली, करमाळ्यात राष्ट्रवादीचा मूक मोर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करमाळा- पाणीप्रश्नी घेराव घातल्याने आमदार नारायण पाटील यांनी जिल्हा बँकेच्या संचालिका रश्मी बागल - कोलते यांना शिवीगाळ, मारहाणीचा प्रयत्न केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी आमदार पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचे जाहीर केले होते. त्याला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मूक मोर्चा काढून याचा निषेध केला. त्यामुळे मकाईचे अध्यक्ष दिग्विजय बागल, तालुकाध्यक्ष चंद्रहास निमगिरे यांच्याविरोधात जमावबंदी मोडल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. 

सोमवारी महाराष्ट्र दिन कार्यक्रमानंतर रश्मी बागल - कोलते, मकाईचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी आमदार पाटील यांना पाणीप्रश्नी निवेदन दिले. तसेच त्यांना घेराव घातला. या वेळी पाटील यांनी बागल - काेलते यांना शिवीगाळ, मारहाणीचा प्रयत्न केल्याचा बागल यांचा आरोप आहे. त्यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून आमदार पाटील यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. तसेच आमदार पाटील, त्यांच्या सुरक्षा रक्षकाच्या फिर्यादीवरून बागल बहीण-भावाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चंद्रहास निमगिरे यांनी बुधवारी सकाळी ११ वाजता सुभाष चौकात आमदार पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करणार असल्याचे जाहीर केले होते. तसेच शिवसेनेनेही तेथे याचवेळेला बागल बहीण-भावाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे पोलिसांनी जमावबंदी लागू करत दोन्ही गटांना पुतळा दहनास परवानगी नाकारली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने सुभाष चौकापासून तहसीलपर्यंत मूक मोर्चा काढला. कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावल्या होत्या. या वेळी तहसीलदार संजय पवार यांना निवेदन दिले. या वेळी दिग्विजय बागल, चंद्रहास निमगिरे, दशरथ कांबळे, बाळासाहेब पांढरे, सुभाष गुळवे, रमेश कांबळे, धनंजय डोंगरे, संतोष देशमुख, केरु गव्हाणे, शिवाजी सरडे, अशोक ढेरे, किरण कवडे, संतोष वारे, नगरसेवक अविनाश घोलप, श्रीनिवास कांबळे, विजय लावंड, राजेंद्र धांडे उपस्थित होते. 

कायदा सुव्यवस्थाबिघडू नये यासाठी जमावबंदी लागू केली. त्यांना तशी सूचना देऊन पुतळा दहनास परवानगी नाकारली. तरीही मोर्चा काढल्याने गुन्हा दाखल केला. 
- अण्णासाहेब घोलप, पोलिस निरीक्षक, करमाळा 

पुतळा दहनास पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यामुळे शांततेच्या मार्गाने मूक मोर्चा काढला. यात घोषणाबाजीही करता आमदार पाटील यांचा निषेध केला. 
- चंद्रहास निमगिरे, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, करमाळा 
बातम्या आणखी आहेत...