आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sindhutai Sapkal Statue At Solapur, News In Marathi

या अगदी हुबेहूब सिंधूताईच... सिलिकॉनपासून जिवंत शिल्प

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शिल्पकला म्हणजे संगमरवरासारखे दगड, धातू, लाकूड इत्यादी कठीण तसेच माती, मेण, पॉलीमर आदी मऊ पदार्थांना आकार देऊन, जोडून आणि कोरून त्रिमितीय आकृती बनवण्याची कला होय. मात्र, या पारंपरिकतेला छेद देऊन सोलापुरातील युवा शिल्पकार सागर रामपुरे यांनी सिलिकॉन रबरपासून शिल्प निर्मितीचा प्रयोग केला आहे. गरीब, अनाथ मुलांची आई असलेल्या सिंधूताई सपकाळ यांचे हुबेहूब शिल्प त्यांनी साकारले आहे. त्याचे अख्ख्या महाराष्ट्रातून कौतुक होत आहे.

दगड, धातू आणि मातीपासून बनलेल्या शिल्पांची परंपरा मोठी आहे. हे शिल्प जिवंत आणि अतिवास्तववादी वाटत नाही. दगड, धातूच्या या मर्यादा लक्षात घेऊन सागर यांनी शिल्पकलेत वेगळा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. सिलिकॉन रबरच्या शिल्प निर्मितीची त्यांना कल्पना सुचली. आपले शिल्प जिवंत वाटावे, स्पर्श केल्यानंतर मनुष्यासारखा भास व्हावा, ही प्रेरणा घेत त्यांनी सिलिकॉनपासून शिल्पनिर्मितीचा प्रयोग केला. असा प्रयोग भारतातील कोणत्याही शिल्पकाराने केला नसल्याने सागरपुढे कसलेही मार्गदर्शन आणि अभ्यासाचा पर्याय उपलब्ध नव्हता. हजारो प्रयोग केले. त्यातील बरेच प्रयत्न अपयशी ठरले; पण हार न मानता वर्षभराच्या मेहनतीनंतर अखेर सिंधूताई सपकाळ यांचे शिल्प तयार झाले.

अशी झाली निर्मिती
माती आणि धातूपासून शिल्प साकारताना प्राथमिक कामानंतर त्याला मूर्त रूप देताना रबराचा साचा तयार करावा लागतो. रबराच्या साच्यातून दगड व धातूचे शिल्प सहज वेगळे होतात. मात्र, सिलिकॉन रबराचे शिल्प रबराच्या साच्यातून वेगळे करणे आव्हान होते. सागरच्या शिल्पकलेचा कस येथे लागला. अनेक प्रयोगांनंतर या प्रयत्नाला यश आहे. २५ ते २७ वयोगटातील सागर वयाच्या १३ व्या वर्षापासून शिल्पकलेत वेगवेगळे प्रयाेग करत आहे. वडील प्रसिद्ध शिल्पकार भगवान रामपुरे यांच्याकडून कलेचा वारसा मिळाला असला तरी वेगळे काही तरी करण्याची सागरची धडपड सुरूच आहे.

तेंडुलकर, गुलजारही साकारणार
सागर सिलिकॉन रबरपासून शिल्पनिर्मितीची मालिकाच बनवणार आहेत. सिंधूताई सपकाळ हे या मालिकेतील पहिले शिल्प. यानंतर प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, गीतकार गुलजार, बाळासाहेब ठाकरे आदी दिग्गजांची शिल्पे सागर आगामी काळात साकारणार आहे. कल्याण येथील टिटवाळा संग्रहालयात हे शिल्प बसवण्यात येणार आहे.

रामायण, महाभारतातील प्रसंग साकारणार
सिलिकॉन रबरपासून शिल्पनिर्मितीचा देशातील हा पहिलाच प्रयोग आहे. त्यामुळे सुरुवातीला अडचणी आल्या. भावी पिढीला भारतीय संस्कृतीची माहिती करून देण्यासाठी रामायण, महाभारतातील प्रसंग शिल्पातून साकारणार आहे.
फेसबुकवर ९० हजार लाइक्स
सागर यांनी साकारलेले सिंधूताई सपकाळ यांचे शिल्प आवडल्याने युवा प्रतिष्ठानचे राज सलगर यांनी आपल्या फेसबुक वॉलवर शिल्पनिर्मितीचा फोटो शेअर केला. या फोटोला राज्य व देशभरातून ९० हजारांहून अधिक लाइक मिळाले. शिवाय २ हजारांनी कॉमेंट करताना शिल्प अप्रतिम असल्याचे म्हटले आहे. ११ हजार फेसबुक युजरनी हा फोटो शेअर केला असल्याने सोलापूरची कला राज्यासह देशभरात पोहोचली असल्याचे सलगर यांनी सांगितले.