आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा बागांच्या आराखड्यास राज्याकडून हिरवा कंदील, केंद्र सरकारची अमृत योजना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शहरातील सहा बागांच्या विकास आराखड्यास राज्य सरकारकडून हिरवा कंदिल मिळाला आहे. केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून एक कोटी रुपये मिळणार आहेत.

विकास आराखडा नुकताच शनिवारी नगरविकास विभागाच्या मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांना देण्यात आला. त्यांनी लगेच याला तत्त्वत: मंजुरी दिली. पुढील आठवड्यात एक कोटी रुपये मिळणार आहेत. त्याच्या पुढील महिनाभरात काम सुरू होईल, अशी माहिती आयुक्त विजयकुमार काळम -पाटील यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

केंद्र सरकारने २५ जून २०१५ रोजी अमृत योजना जाहीर केली. या योजेअंतर्गत १७ ऑक्टोबर रोजी ग्रीन स्पेस डेव्हलपमेंट करण्याचा आदेश आला. त्यानुसार राज्याने ४३ शहरांची यादी तयार केली. यात सोलापूरचा समावेश आहे. योजनेतील खर्चाचा वाटा ५० टक्के केंद्र, २५ टक्के राज्य आणि २५ टक्के खर्च महापालिका असा आहे. महापालिकेने २२ फेब्रुवारी रोजी या कामास सर्वसाधारण सभेची मंजुरी घेतली. महापालिकेने इनव्हायरो सेफ कंपनीला सल्लागार म्हणून नेमले आहे.

वनविभागाचाही असेल सहभाग : शहरातीलप्रदूषण कमी होण्यासाठी उपाययोजना, शहरातील हवामानास अनुरूप झाडाच्या जाती, शहर हिरवे करण्यासाठी उपाय, बागांची देखभाल, बागांचे सौंदर्य खुलवणे आदीबाबत वन विभागाची मदत घेतली जाणार आहे.

सहा बागांचा विकास
जानकीनगर : गांडूळखत प्रकल्प, जॉगिंग ट्रॅक, खेळणी, हिरवळ
हुतात्माबाग : जंगलपार्क, प्राणी, पक्षी, सापांच्या प्रतिकृती
विणकरबाग : राशीवन उभारणार
सुभाषबाग : खेळणीबसवणार
शांतीनगर : बागेतहिरवळीचे काम
दमाणीनगर : लतावन विकसित

काम झालेल्या दोन बागांचा पुन्हा समावेश
काहीमहिन्यापूर्वी महापालिकेने सहा कोटी रुपये खर्च करून १३ बागांचा विकास केला. त्यात विणकर बाग आणि सुभाष बागेचा विकास करण्यात आला. आता पुन्हा या अमृत योजनेत या दोन्ही बागांचा समावेश आहे.

येत्या २६ एप्रिलला अंतिम मंजुरी मिळणार आहे. यानंतर लगेच निधी प्राप्त होईल. या कामाचे टेंडर काढून प्रत्यक्षात काम सुरू होण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागेल. काम सुरू झाल्यानंतर काम पूर्ण करण्याकरता आठ महिन्यांचा कालावधी देण्यात येणार आहे. साधारण २०१७ च्या सुरुवातीला बागा आकारात आल्याचे दिसेल.