सोलापूर - देशातल्या शंभर ‘स्मार्ट सिटीं’मध्ये सोलापूरचा समावेश झाला. त्यात खासदार शरद बनसोडे यांची भूमिका महत्त्वाची ठरली. आता कुंभारी परिसरात नवीन एमआयडीसी विकसित करावी, तिथे बड्या उद्योगांना खेचून आणल्यास या शहराची भरभराट होईल, अशी मागणी सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सने मांडली.
अॅड. बनसोडे यांनी सोमवारी उद्योजकांशी संवाद साधला. चेंबरचे नूतन अध्यक्ष विश्वनाथ करवा यांचा सत्कार केला. सोलापुरी चादरीला बाजारपेठ मिळवून देण्याचा चंग बांधून आलेल्या खासदार बनसोडे यांच्यासमोर उद्योजकांनी अनेक मागण्या मांडल्या. त्यातील प्रमुख मागणी होती, नवीन एमआयडीसी विकसित करण्याची. कुंभारी परिसरात कामगारांच्या वसाहतींचे काम सुरू आहे. त्याच परिसरात ५०० एकरांवर नवीन एमआयडीसी विकसित केली तर कुशल मनुष्यबळ मिळेल. नवीन उद्योजकांना जागा मिळेल. मोठे उद्योगही येऊ शकतील, असे उद्योजकांचे म्हणणे होते.
यासाठी निश्चित असे प्रयत्न करणार असल्याचे बनसोडे यांनी सांगितले.
मार्केटिंग हवे
^कुशल मनुष्यबळ आहे. दर्जेदार उत्पादने काढली जातात. परंतु त्याचे मार्केटिंग होत नाही. नवीन एमआयडीसी विकसित करून बड्या उद्योगांना खेचून आणल्यास या शहराची अधिक भरभराटच होईल.” प्रभाकर वनकुद्रे, अध्यक्ष, व्यापारी महासंघ, सोलापूर
कुंभारीत करा
^आैद्योगिक विकास महामंडळ चिंचोळी वसाहतीकडे जाण्यास सांगते. तिथे कामगारअभावी यंत्रमाग उद्योग बंद पडलेले आहेत. कुंभारी परिसरातच नवीन वसाहत निर्माण करा.” धर्मण्णा सादूल, प्रेसिडेंट, यंत्रमागधारक संघ
चेंबर भवनसाठी जागा
श्री.करवा यांना शुभेच्छा देताना अॅड. बनसोडे म्हणाले, “मी फिक्कीच्या बैठकांना जायचो. तिथे सुनील मित्तल ते अंबानी यायचे. धोरण आखायचे. सरकारला सांगायचे. एवढी ताकद उद्योजकांमध्ये असते. तुम्ही सक्षम झाला तरच तुमच्यावर अवलंबून असणाऱ्यांची चूल पेटते. पंतप्रधान मोदी उद्योजकांसाठी पोषक वातावरण देत आहेत. स्मार्ट सिटीत सोलापूरचा समावेश झालेला आहे. सोलापूरचा चेहरा-मोहरा बदलून जाईल. पण सोलापूरच्या चेंबरला स्वत:ची इमारत नाही. त्यासाठी प्रयत्न व्हावेत.” त्यांना लगेच उत्तर देताना श्री. करवा म्हणाले, “जागा द्या, इमारत बांधतो.”
बनावट गिरी रोखा
^वस्तुत: सोलापुरी चादर आणि टॉवेलचे ‘जीआय रजिस्ट्रेशन’ (भौगोलिक अधिकार) मिळालेले आहेत. तरीही अशी बनावटगिरी केली जाते. त्याला आळा घालावा.” श्रीनिवास बुरा, उपाध्यक्ष, टेक्स्टाइल फाउंडेशन