सोलापूर- सोलापूरच्या स्मार्ट सिटी याेजनेचा शुभारंभ २५ जून रोजी पुण्यातून होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण हुतात्मा स्मृती मंदिरात दाखवण्याची शक्यता आहे. त्यानुसार तयारी करण्यात येत असल्याची माहिती मनपा आयुक्त विजयकुमार काळम पाटील यांनी दिली.
स्मार्ट सिटी योजनेचा शुभारंभ करण्यासाठी महापालिका तयारी करत असून, महापालिका आयुक्त काळम-पाटील यांनी गुरुवारी बैठक घेऊन अधिकाऱ्यांवरील जबाबदारी निश्चित केली. महापालिका पदाधिकाऱ्यांशी शुक्रवारी चर्चा करणार आहेत. स्मार्ट सिटी योजनेच्या कार्यक्रमाचे अंतिम निश्चितीकरण दोन दिवसात होईल. त्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून कोण येणार हे कंपनीचे चेअरमन मिलिंद म्हैसकर ठरवणार आहेत, असे आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी सांगितले.
किल्ला बागेतून सुरुवात
अमृतयाेजनेतून किल्ला बागेचे सुशोभीकरण करण्यात येणार असले तरी स्मार्ट सिटी योजनेतून किल्ला बाग फुलवण्यात येणार आहे. या बागेत दहा टक्के बांधकाम तर ९० टक्के हिरवळ असणार आहे. बांधकाम इतर कामासाठी पुरातत्त्व विभागाकडून परवानगी घेणे आवश्यक असल्याने त्याबाबत आयुक्तांनी संबंधित विभागास सूचना दिल्या.