आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्यावर सोशल फोरम दाखल करणार ‘जनहित’ - आमदार प्रणिती शिंदे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलपूर - शहराला दूषित पाण्याचा पुरवठा झाल्याप्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहिती सोलापूर सोशल फोरमच्या अध्यक्षा, आमदार प्रणिती शिंदे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, उद्या सोमवारी जिल्हाधिकारी यांना भेटणार असल्याचेही सांगण्यात आले.

भीमा नदीत मळी सोडून प्रदूषित करणाऱ्यांचा शोध घेतलेला नाही. त्यांच्यावर कारवाई केलेली नाही. दूषित पाणी देऊन लाखो लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न झाला. मात्र, याचे गांभीर्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला गांभीर्य नाही. याविषयी आवश्यक कागदपत्रे गोळा करून याचिका दाखल करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

‘एनटीपीसी’ जलवाहिनीचे काम १५ डिसेंबरपर्यंत होईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली होती. परंतु ते काम पूर्ण झाले नाही. आता मार्चची वेळ दिली जात आहे. तोपर्यंत काय दूषित पाणीच प्यायचे काय, असा प्रश्न शिंदे यांनी उपस्थित केला. सोलापूरच्या पाणीप्रश्नी मुख्यमंत्र्यांनी एका आठवड्यात बैठक घेण्याचे आश्वासन दिले हाेते. मात्र त्याचे काहीही झाले नाही. तेही याविषयी गंभीर असल्याचे दिसत नाही.

जनतेने रस्त्यावर उतरणे गरजेचे : यतीन शहा
आम्हीमुंबईच्या खासगी प्रयोगशाळेकडे पिवळ्या पाण्याचे नमुने पाठवले आहेत. इतर तपासण्याही करून घेत आहोत. याचा अहवाल आल्यानंतर पुढील उपाययोजनांसाठी पाऊल उचलू. सर्व कागदपत्रे गोळा केल्यानंतर याचिका दाखल करू. दूषित पाण्याची इतकी गंभीर समस्या असताना कोणी आवाज उठवत नाहीत. सोलापूरकरांनी रस्त्यावर उतरणे गरजेचे आहे, असे आवाहन उद्योजक यतीन शहा यांनी केले. यावेळी जितू राठी, पराग शहा, प्रशांत राठी, पिंपरकर, किशोर चंडक, प्रियदर्शन शहा, गिरीश देवरमनी आदींसह फोरमचे पदाधिकारी उपस्थित होते.

माणसे मरण्याची वाट सरकार पाहतेय?
काही दिवसापूर्वी दूषित पाण्याने असंख्य मासे मेले. आता शासन माणसे मरेपर्यंत वाट पाहणार की काय, असा सवाल आमदार प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला. पिवळे पाणीसुध्दा पिण्यासाठी योग्य आहे, असे महापालिका म्हणत असेल तर ते चुकीचे आहे. भले आजच्या आज काही परिणाम होणार नाही. मात्र भविष्यात परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. पिवळे पाणी स्वच्छ करण्यासाठी महापालिका प्रयत्न करीत आहे. परंतु पाणी पिवळे होऊच नये यासाठी कोणी प्रयत्न करीत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.