आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur 11 Thousand Flat Register Will Be Canceled

सोलापुरातील ११ हजार फ्लॅट खरेदीखताच्या नाेंदी होणार रद्द

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - उच्चन्यायालयाच्या आदेशानुसार ऑनलाइन सात-बारा उताऱ्यावरील नोंदी दुरुस्तीसाठी उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाने अजब शक्कल लढवली आहे. तहसीलदार हणमंत कोळेकर यांनी मजरेवाडी, कसबे सोलापूर नेहरूनगर या भागांतील सात-बारा उताऱ्यावरील ११ हजारांपेक्षा अधिक फ्लॅटच्या खरेदी खताच्या नोंदी रद्द करण्याचे आदेश मंडलाधिकारी तलाठी यांना दिले आहेत. या आदेशामुळे संबंधित फ्लॅटमालकाचा उताऱ्यावरील मालकी हक्क नष्ट होणार आहे.
ऑनलाइन सात-बारा उतारा देण्याबाबत प्रशासनाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. उच्च न्यायालयाने ७/१२ उताऱ्यातील दोष दुरुस्ती करण्यासाठी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयास ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. झालेल्या व्यवहारानुसार नोंदी उताऱ्यावर आणण्यात महसूल यंत्रणेला अजून ते जमलेले नाही. यातूनमार्ग काढताना अनेक नवीन-नवीन शक्कल लढविली जात आहे. या आदेशामुळे मात्र सर्वसामान्य नागरिकांना पुन्हा प्रशासनाच्या पायऱ्या झिजवावे लागणारे आहे. जमाबंदी आयुक्त यांच्या अादेशानुसार राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत
१२ आॅगस्ट २०१५ पासून जिल्ह्यात ऑनलाईन सात-बारा देण्याची अंमलबजावणी करण्यात आली. पण त्यात येणाऱ्या अनेक अडचणींमुळे उतारा मिळाल्याने लोक हैराण झाले आहेत.

प्रॉपर्टी कार्डावरील नोंदींना लागू होणार नाही आदेश :
शहरात ज्या फ्लॅटच्या नोंदी प्रॉपर्टी कार्डावर झाल्या आहेत. त्याठिकाणी हा आदेश लागू होणार नाही. मात्र मूळ सोलापूर शहर (२९ चौरस कि.मी. वगळता) उर्वरित १५७ चौ.कि.मी. मध्ये ज्याठिकाणी अपार्टमेंट अॅक्टनुसार ७/१२ उताऱ्यावर फ्लॅटच्या व्यवहार नोंदी झाल्या आहेत, त्याठिकाणी प्रांताधिकारी तहसीलदार यांचा आदेश लागू होणार आहे. याप्रकरणी क्रेडाई संघटनेने सोमवारी प्रांताधिकारी पवार यांना निवेदनही दिले. या आदेशाच्या अमंलबजावणीमुळे कोणत्या अडचणी येऊ शकतात याची चर्चाही केली. पण तरीही प्रातांधिकारी तहसील कार्यालय आदेशाच्या अमंलबजावणीवर ठाम असल्याचे क्रेडाईचे सचिव शशिकांत जिड्डीमनी यांनी सांगितले.

^सात-बारा उताऱ्यावरील नोंदी रद्दचा आदेश तहसीलस्तरावरील आहे. मला याची माहिती नाही. नोंदी रद्द करण्याविषयी मला आज कोणीही भेटण्यास आले नव्हते. शहाजी पवार, प्रांताधिकारी.

^उताऱ्यावरीलजमिनीचे क्षेत्र जुळत नसल्याने हद्दवाढ भागातील नेहरूनगर, मजरेवाडी कसबे सोलापूर या हद्दीतील ७/१२ च्या नोंदी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. हणमंत कोळेकर, तहसीलदार
एकच फ्लॅट अनेकांना विक्री होण्याचा धोका

^७/१२उताऱ्यावरील फ्लॅटच्या नोंदी रद्दमुळे अनेक धोके निर्माण होतील. तहसीलदारांच्या आदेशाला कायदेशीर आधार नाही. नेहरूनगर, कसबे सोलापूर मजरेवाडी या भागातील ११ हजार फ्लॅटच्या मालकी हक्काच्या नोंदी कमी केल्याने एकच फ्लॅट अनेक लोकांना विक्री होण्याचा धोका आहे. यामुळे नोंदी रद्दचा आदेश रद्द करावा. आज मुख्यमंत्री, महसूलमंत्री यांना निवेदन देऊ. शशिकांतजिड्डीमनी, सचिव, क्रेडाई सोलापूर

मजरेवाडी, नेहरूनगर, कसबे सोलापूरला फटका
हद्दवाढ भागातील जुळे सोलापूर, मजरेवाडी, विजापूर रोड, कसबे सोलापूर, नेहरूनगर या भागातील ज्या अपार्टमेंटमधील मालमत्तेचा सात-बारा उतारा मिळतो, त्यांना अडचणीला सामोरे जावे लागणार आहे. प्रांताधिकारी तहसीलदार यांच्या आदेशामुळे वरील भागातील ११ हजार नोंदी रद्द होऊ शकतात. शेळगी, बाळे, दहिटणे, शिवाजीनगर इत्यादी परिसरातील अपार्टमेंटमधील फ्लॅट खरेदी-विक्री व्यवहार नोंदीलाही फटका बसू शकतो.

हद्दवाढ भागातील महसुली गावामधील अधिकार अभिलेख तपासता ज्या जागेवर आेनरशिप पद्धतीने फ्लॅट बांधले आहेत त्या फ्लॅटच्या संदर्भात नोंदी घेणेबाबत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मध्ये कोणतीही तरतूद नाही. तसेच, गाव दप्तरी नोंदी घेताना फ्लॅटचे स्वतंत्र सात-बारा उतारे तयार करण्यात आलेे आहेत. सदर ही कृती ही नियमबाह्य आहे. त्यामुळे संगणकीय सात-बारा प्रणालीमध्ये मूळ आकारबंदशी क्षेत्र मेळात बसत नसल्याने सात-बारा संगणकीय प्रणालीमध्ये अडचण निर्माण झाली आहे. त्याअर्थी मी तहसीलदार उत्तर सोलापूर सोबतच्या परिशिष्ट मध्ये दर्शविलेले सर्व फेरफार या आदेशाद्वारे रद्द करणेबाबत आदेशित करीत आहे. तसेच, तलाठी मंडलाधिकारी यांना असेही आदेशित करण्यात येते की, ज्या जागेच्या फ्लॅटच्या नोंदी घेण्यात आलेल्या आहेत त्या जागेसंदर्भात फ्लॅटच्या पूर्वीचा सात-बारा उतारा आहे तसा तयार करून फेरफार उतारा दुरुस्त सात-बारा उताऱ्यासह अहवाल इकडे सादर करावा.