आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर: तीन आमदार नाकारू इच्छितात कर्जमाफी, सहकारमंत्री म्हणाले, सरसकट व्हावी माफी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- नंदुरबार जिल्ह्यातील दोन आमदारांनी सरसकट कर्जमाफी नको, अशी मागणी करत आपण कर्जमाफी घेणार नसल्याचे स्पष्ट केेले आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील चार आमदारांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना कर्जमाफीचा लाभ घेणार नसल्याचे स्पष्ट केले. तर शेती कर्ज नाही. असले तरी आम्ही घेतले नसते, असे दोन आमदारांनी सांगितले. दोन आमदारांनी बोलण्यास नकार दिला. सहकारमंत्री विजय देशमुख यांनी सरसकट कर्जमाफीचे समर्थन केले तर पालकमंत्र्यांनी सरकारकडे बोट दाखवले.
 
आमदार दिलीप सोपल, सिद्धाराम म्हेत्रे, प्रणिती शिंदे यांनी कर्जमाफीचा लाभ घेणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. अामदार हनुमंत डोळस, नारायण पाटील यांनी अापण पीक कर्ज घेतले नसल्याचे आणि असले तरी कर्जमाफीचा लाभ घेतला नसता, असे सांगितले. आमदार बबनराव शिंदे, भारत भालके यांनी सरसकट कर्जमाफी आणि ते याचा लाभ घेणार का? याविषयी बोलणे टाळले. आमदार भालके हे कोणी नको म्हणत असतील तर चांगले असल्याचे सांगताना आपण काय करणार हे स्पष्ट केले नाही.

असते तर घेतले नसते : शेतकरी बांधवांना सरसकट कर्जमाफी मिळायला हवी. तसेच ज्या शेतकऱ्यांनी  नियमित कर्जभरणा केला आहे, अशा शेतकऱ्यांनाही या कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे. मीही शेतकरी आहे. परंतु माझ्या शेतीवर कसलेही कर्ज नाही. असते तर मी या कर्जमाफीचा लाभ घेतला नसता, असे आमदार हनुमंत डोळस यांनी सांगितले.
 
सरसकट कर्जमाफी हवी : सरसकट सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे. परंतु सरकार कोणते निकष लावणार याबाबत आताच काही बोलता येणार नाही, असे आमदार बबनराव शिंदे म्हणाले.
 
कोणी नको म्हणत असेल तर चांगलेच : कोणी कर्जमाफी नको म्हणत असतील तर चांगली गोष्ट आहे. कारण त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर टाच येणार नाही, असे आमदार भारत भालके म्हणाले.
 
आम्हाला लाभ नको, निर्णयाबद्दल समाधानी : कर्जमाफीचा फायदा घेणार नाही. सरकारच्या निर्णयाबद्दल समाधानी आहे असे आमदार दिलीप सोपल म्हणाले.

कर्ज फेडले असते : सरसकट कर्जमाफी मिळायला हवी. मात्र, त्यातून मोठ्या शेतकऱ्यांना वगळावे. माझ्या नावे शेतीचे कर्ज नाही. असते तरी कर्ज फेडले असते. त्यामुळे कर्जमाफीचा फायदा घेतला नसता, असे आमदार नारायण पाटील म्हणाले.
 
कोणी वंचित राहू नये : मी कर्जमाफी घेणार नाही. आमदारांना सोडून सर्वांना सरसकट कर्जमाफी मिळायला हवी, असे आमदार सिद्धाराम म्हेत्रे म्हणाले.

गरजूंना लाभ मिळावा
सरसकट कर्जमाफी न दिल्यास काही गरजू शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे. यामुळे सरसकट कर्जमाफी दिलीच पाहिजे. सरसकट कर्जमाफीला आमदारांनी केलेला विरोध हे त्यांचे वैयक्तिक मत आहे, असे आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या.

..तोच माझाही निर्णय
शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. मी मुख्यमंत्र्यांसोबत आहे, असे पालकमंत्री विजय देशमुख म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...