आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दूध संघ उत्पादनांच्या ब्रँडिंगपेक्षा नेत्यांनी केले स्वत:चेच ब्रँडिंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघ दुधाबरोबरच तूप, खवा, पेढा, सुगंधी दूध यासह इतर दुग्धजन्य पदार्थांची विक्री करतो. यातून दरवर्षी साडेचार ते पाच कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. यातील तूप, पेढा, सुगंधी दूध या उत्पादनाला बाजारात चांगली मागणी आहे. परंतु, या पदार्थांचे ब्रँडिंग करून जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर त्याची बाजारपेठ निर्माण करण्यासाठी म्हणावे तसे प्रयत्न झालेले दिसत नाहीत. दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीतून जादा पैसे मिळाल्यास शेतकऱ्यांना जादा दूध दर देणे शक्य आहे. परंतु, संचालकांनी स्वत:च्या राजकीय ब्रँडिंगकडे लक्ष दिल्याने दूध संघावर मालमत्ता विक्रीची वेळ येऊन ठेपली आहे. 
जिल्हा दूध संघाचे दूध दर्जेदार आहे. दुधाबरोबरच तूप, खवा, पेढा, आइस्क्रीम, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, लस्सी, बटर, दही आदी पदार्थांची विक्री केली जाते. २०११ ते २०१६ यादरम्यानच्या आर्थिक वर्षांत प्रतिवर्षी कोटींचे उत्पन्न मिळालेले आहे. परंतु, यातील बहुतांश पदार्थ अनेकदा उपलब्ध नसल्याच्या तक्रारी ग्राहक करतात. उन्हाळ्यात आइस्क्रीमचा तुटवडा असतो, तर सण, उत्सव, परीक्षा निकालाच्या काळात पेढ्यांचा तुटवडा जाणवतो. ही उत्पादने चांगली असल्याने लोक दूध पंढरीची विक्री केंद्रे शोधत येतात. यासाठी संचालक मंडळाची एक समिती असणे अपेक्षित होते. या समितीने अमूल, गोकुळ अशा संस्थांच्या धर्तीवर जिल्हा दूध संघाचे ब्रँडिंग केले असते तर आज परिस्थिती वेगळी असती. 

सुगंधी दूध :राज्याबाहेर अनेक दूध संस्था बॉटलिंग करून वेगवेगळ्या चवीचे सुगंधी दूध विकतात. जिल्हा दूध संघाचे सुगंंधी दूधही उत्तम आहे. ते पाकिटात विकले जाते. किमान संचालकांनी ठरवले तर तालुक्याच्या ठिकाणी या दुधाची विक्रमी विक्री होऊ शकते. परंतु, इच्छाशक्तीचा अभाव दिसतो. शेजारच्या इंदापूर तालुक्यातील सोनाई दूध संघाचे तूप शिर्डीच्या मंदिर समितीला विकले जाते. हीच परंपरा जिल्हा दूध संघाने जपणे गरजेचे होते. 

चांगला पेढा ज्याचा नेहमीच जाणवतो तुटवडा 
१९९०च्या दरम्यान जिल्हा दूध संघाने पेढा निर्मितीला सुरुवात केली. गोड, रवाळ असलेला हा पेढा बाजारपेठेत सर्वोत्तम पेढा म्हणून ओळखला जातो. वारी काळात पंढरपुरात या पेढ्याला खूप मागणी असते. परंतु, संचालक मंडळाला या पेढ्याचे ब्रँडिंग करता आलेले नाही. सोलापूर, पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट येथील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी पेढ्याला प्रचंड मागणी आहे. या भागात वाहतूक करण्यासही फार खर्च येत नाही. पेढ्याची विक्री वाढल्यास संघाला मोठा फायदा होणार आहे. परंतु, या पेढ्याचाही अनेकदा बाजारात तुटवडा असतो. 

मलई मिळत नाही म्हणून 
एकामाजी संचालकाने सांगितले की, दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीतून दूध संघाचा फायदा होताे. त्यातून शेतकऱ्यांना जादा दूध दर देणे शक्य आहे. परंतु, पुढाऱ्यांना मलई मिळत नाही. त्यामुळेच ते याकडे फारसे लक्ष देत नाहीत. त्याऐवजी ते पशुखाद्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या निविदेकडे लक्ष देऊन असतात. येथे काही पुढाऱ्यांना घरपोच रसद पुरवली जाते. 
बातम्या आणखी आहेत...