आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur District Cooperative Bank In Safe Zone, But Uncertainty To Mohite, Sopal

जिल्हा बँकेत तूर्त बचावले; मोहिते, सोपल यांच्या जिल्हा बँक संचालकपदावर टांगती तलवार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - बरखास्त करण्यात आलेल्या सहकारी बँकांच्या संचालकांना पुन्हा निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्याच्या निर्णयाने खासदार विजयसिंह मोहिते आणि आमदार दिलीप सोपल यांना शिखर बँकेत दणका बसला. मात्र जिल्हा बँकेत थोडक्यात बचावले. मुंबई उच्च न्यायालयाने ऑक्टोबर २०१५ रोजी तीन आठवड्यांत जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचे आदेश दिले होते. त्याला सर्वोच्च न्यायालयाने १६ नोव्हेंबर रोजी स्थगिती दिली. त्यावर १२ जानेवारीला सुनावणी आहे.

सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला. त्यानंतर सहकार खात्याने संचालक मंडळ बरखास्त केले तर मात्र मोहिते आणि सोपल यांच्यासह नुकत्याच झालेल्या निवडणुकीपूर्वीचे सर्व संचालक १० वर्षांसाठी अपात्र ठरतील, अशी माहिती राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली. कोल्हापूर, सातारा, सांगली येथील जिल्हा बँकांचे संचालक मंडळ बरखास्त झाले होते. कोल्हापूर जिल्हा बँकेची नुकतीच निवडणूक झाली. तेथील संचालक मात्र अपात्र ठरतील. त्याला फक्त सोलापूर अपवाद आहे. कारण, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ बरखास्त झालेले नाही. राज्य शासनाचा निर्णय हा बरखास्त झालेल्या राज्य आणि जिल्हा बँकांसाठीच असल्याचे श्री. पाटील यांनी स्पष्ट केले.

शिखर बँकेबरोबर जिल्हा बँकेतही अनियमितता
कर्ज वाटपात अनियमितता असल्यामुळे शिखर बँकेची चौकशी सुरू झाली. त्यात मोहिते अाणि सोपल यांच्या सदस्यत्वावर गंडांतर आले. शिखर बँकेप्रमाणेच सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्ज वाटपात अनियमितता असल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. मोहिते आणि सोपल यांच्याशी संबंधित असलेल्या संस्थांना याच पध्दतीने कर्ज वाटप करण्यात आले होते. मोठ्या प्रमाणावर कर्ज थकल्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यात अडचणी येत आहेत.

गैरव्यवहार नाहीच
बरखास्तीचा मुद्दा येतो केव्हा? गैरव्यवहार झाला तरच. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत दिलेल्या कर्जांची वेळेत वसुली नाही. त्यामुळे थकबाकी वाढली. हा काही गैरव्यवहार नाही. त्यामुळे हे संचालक मंडळ बरखास्त होऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयात अामचे म्हणणे आहे. राज्याच्या निर्णयाचा या संचालक मंडळावर कुठलाच प्रभाव पडणार नाही. अॅड.सारंग आराध्ये, बँकेचे वकील

बरखास्त झाले तरच...
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ बरखास्त झालेले नाही. त्यामुळे मंत्रिमंडळात झालेला निर्णय या बँकेला लागू होत नाही. परंतु बरखास्त करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यात उच्च न्यायालयाचा निर्णय कायम झाला तर सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ बरखास्त होऊ शकते. त्यानंतर संबंधित संचालक अपात्र ठरतील. चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री