आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्याची मदार उजनीवरच, पाच योजना दुरुस्तीचे आदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जिल्ह्यात सरासरीच्या निम्म्यापेक्षा कमी पाऊस झाल्याने जानेवारीपासून जिल्ह्यात टंचाईच्या झळा बसत आहेत. ५३ पैकी ५० लघुप्रकल्प आताच कोरडे पडले आहेत तर प्रकल्पामध्ये ३८ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. सोलापूर महापालिका, नगरपालिका ४०० पेक्षा अधिक गावांना उजनी धरणावर अवलंबून आहेत, उर्वरित गावांना स्थानिक पाणीपुरवठा योजना तर इतर गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात १० टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असला तरी पुढील महिन्यापासून यामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे यंदा उजनी धरणावरच पाणीपुरवठ्याची भिस्त अवलंबून आहे.

सोलापूर महापालिका नगरपालिकांना उजनी धरणातील पाणी उपलब्ध होते. एनटीपीसीची जलवाहिनीचे काम मार्चपर्यंत लांबणीवर पडल्याने उजनीतून किमान १० टीएमसी पाणी पिण्यासाठी घ्यावे लागणार आहे. अक्कलकोट शहराला पाणीपुरवठा करण्याच्या चार योजना असूनही पाणीपुरवठा विस्कळित आहे. पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, बार्शी, कुर्डुवाडी या नगरपालिकांना उजनी धरणातूनच पाणीपुरवठा केला जात आहे. दुधनी मैंदर्गी येथे स्थानिक पाणीपुरवठा योजनांवरच मदार असणार आहे, मार्चपासून याठिकाणी टंचाई जाणवणार आहे.

टँकर मंजुरीचे तहसीलदारांना अधिकार
विभागीय आयुक्तांनी दुष्काळाच्या उपाययोजनासंबंधी तहसीलदारांना अधिकार दिले आहेत, त्यानुसार करमाळा तालुक्यात पांडे येथे टँकर मंजूर करण्यात आला आहे. आता यापुढे गावातील परिस्थिती पाहून तातडीने टँकर मंजूर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मुंढे यांनी दिले आहेत.

जीवन प्राधिकरणच्या योजनांची दुरुस्ती
महाराष्ट्रजीवन प्राधिकरणच्या तांत्रिक कारणामुळे थकबाकी असल्याने बंद असलेल्या पाच योजना ३० जानेवारीपर्यंत सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार नंदूर, आंधळगाव, कासेगाव, भाळवणी खर्डी या पाच योजनांमुळे ५१ गावांचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. यामध्ये खर्डीची योजना सुरू होण्यास थोडा अवधी लागणार आहे.

जिल्ह्यातील ४४७ गावे टंचाईसदृश
भूजलपातळीमध्ये घट झालेली आणि पर्जन्यमान कमी असलेली ४४७ गावे टंचाईसदृश म्हणून जाहीर केली आहेत. या गावांमध्ये उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणार असल्याने प्रशासनाने आतापासूनच उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. उत्तर सोलापूर १८, दक्षिण सोलापूर २७, अक्कलकोट ४५, बार्शी ७६, माढा ५७, मोहोळ ४६, करमाळा ४१, पंढरपूर ३८, सांगोला ३७, मंगळवेढा २३ माळशिरस ३९ अशी तालुकानिहाय गावे आहेत.

टँकर शेवटचा पर्याय म्हणून उपलब्ध करावा
टंचाई आढावा बैठकीत सर्व विभागप्रमुख तहसीलदारांना पाणीटंचाईसंबंधी तत्काळ निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. टँकर देण्यापूर्वी अधिग्रहणासंबंधी कार्यवाही करावी. शेवटचा पर्याय म्हणून टँकर उपलब्ध करावा. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या बंद असलेल्या योजना सुरू होतील, यामुळे ५० गावांचा प्रश्न सुटेल. ज्याठिकाणी गरज आहे, कोणताच पर्याय नाही त्याठिकाणी टँकर देण्यात येतील. तुकाराम मुंढे, जिल्हाधिकारी