आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेवटच्या पात्र शेतकऱ्यास लाभ मिळेपर्यंत योजना सुरूच राहणार, पालकमंत्री देशमुख यांची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - राज्य सरकारने जाहीर केल्यानुसार दिवाळीपूर्वी कर्जमाफीचा लाभ दिला. शेतकरी कुटुंबास कर्जमुक्त झाल्याचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. पहिल्या टप्प्यामध्ये एखादा शेतकरी राहिला असला तरी त्याच्या अर्जातील त्रुटी दूर करून लाभ दिला जाईल. प्रत्येक गावातील शेवटच्या पात्र शेतकऱ्यांस लाभ मिळेपर्यंत ही योजना सुरू राहणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी केले. 
 
जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात जिल्हा प्रशासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील पात्र शेतकरी कुटुंबाचा पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते बुधवारी सन्मान करण्यात आला. या वेळी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, सहकार विभागाचे अप्पर निबंधक शैलेश कोतमिरे, जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख, जिल्हा विशेष लेखापरीक्षक सुरेश काकडे, अग्रणी बँक व्यवस्थापक सुरेश श्रीराम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, शहर उपनिबंधक कुंदन भोळे, जिल्हा बँकेचे व्यवस्थापक किसन मोटे आदी मान्यवर उपस्थित होते. 
 
राज्य शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय जूनमध्ये घेतला. यासाठी जिल्ह्यातून लाख २० हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले. राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या या निर्णयाची सोलापूर जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेत पात्र ठरलेल्या प्रत्येक शेतकऱ्यास लाभ मिळेल. शेवटच्या शेतकऱ्यास लाभ होईल, याची काळजी जिल्हा प्रशासन आणि सहकार विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांनी घ्यावी, अशी सूचनाही पालकमंत्री यांनी केली. 
 
पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात जिल्ह्यातील २५ शेतकऱ्यांना कर्जमाफी प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील गुरूशांत कन्नी सुमंगला कन्नी, कुमठे येथील निंगण्णा अरवत अर्चना अरवत, हन्नूर येथील राजेंद्र केशवराव पाटील मल्लम्मा पाटील, उत्तर सोलापूर तालुक्यातील हिप्परगे येथील मनीषा सुरवसे, एकुरके येथील भीमा शंकर सोनवणे, पाथरी येथील कृष्णा अरुण बंडगर, करमाळा तालुक्यातील विश्वंभर मनोहर गोंडगिरे सुभद्रा गोंडगिरे, पुनवर येथील चंद्रकांत सावंत रुक्मिणी सावंत, दक्षिण सोलापूर तालुक्यातील शांतप्पा तुकाराम पाटील इंदुमती शांतप्पा पाटील, औराद येथील नीलकंठ मारुती वाले मंगल वाले, पंढरपूर तालुक्यातील निवृत्ती महादेव खरात सुमन खरात, भोसे येथील बाळू रामचंद्र काशीद शोभा बाळू काशिद, बार्शी तालुक्यातील दहिटणे येथील आबासाहेब महादेव काशिद ज्योती काशीद, वाणेवाडी येथील शशिकांत गायकवाड कुंदा गायकवाड, माढा तालुक्यातील माढा येथील रामलिंग मगन देवकर मेघना देवकर, केवड येथील आप्पा भिका धर्मे सुमन धर्मे, माळशिरस तालुक्यातील मळोली येथील सुरेश कृष्णाजी गुरव राजाबाई गुरव, फडतरी येथील शिवाजी सूर्यवंशी राजाबाई सूर्यवंशी, मोहोळ तालुक्यातील सोहाळे येथील प्रताप जनार्दन घुले, पापरी येथील मैनाबाई सुरेश सावंत, मंगळवेढा तालुक्यातील हिवरगाव येथील दगडू भाऊ खांडेकर कल्पना दगडू खांडेकर, डिकसळ येथील शंकर शिंदे मालन शिंदे, सांगोला तालुक्यातील बलवडी येथील तुकाराम कोकरे मंगल कोकरे, सांगोला येथील सरकोद्दीन मुजावर, नाझरे येथील नामदेव वाघमोडे शहाबाई वाघमोडे यांचा सन्मान करण्यात आला. 

कर्जमाफी प्रमाणपत्रासोबत मुख्यमंत्र्यांचा लिखित संदेश 
देशाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या कर्जमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना आज मला अतिशय आनंद होत आहे. बळीराजाला आम्ही नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. शेतीतील गुंतवणूक वाढवून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा ध्यास आम्ही घेतला. जलयुक्त शिवार, शेततळी, शेतीपंपाना वीज ही क्षेत्रात अतिशय भरीव कामे तीन वर्षांत आपल्या सरकारने केली. या सर्व प्रयत्नातून सतत नकारात्मक असलेल्या आपल्या शेतीक्षेत्राचा विकास दर प्रथमच दुहेरी आकड्यावर गेला. सरकारच्या उपायांना बळीराजाच्या कष्टाची सुद्धा मोठी साथ मिळाली आणि त्याचा यात मोलाचा वाटा आहे. या सर्व सुविधा निर्माण होत असताना तुमच्या थकित कर्जाचे खाते आज निरंक होतेय. तुमचा सात-बारा कोरा होतोय. याचा मला अधिक आनंद हाेतोय. भविष्यात सुद्धा शेतीच्या गंुतवणुकीत कुठेही कमतरता येणार नाही आणि माझे शेतकरी बांधव कायमचे कर्जमुक्त राहण्यासाठी मी सतत प्रयत्नशील राहीन, याची ग्वाही देतो. धन्यवाद. 
बातम्या आणखी आहेत...