आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर महापालिकेसाठी 59.56 टक्के मतदान, मात्र चुरस नाही; काँग्रेस-भाजपात मुख्य लढत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर महानगरपालिकेच्या १०२ जागांसाठी २६ प्रभागांतून मंगळवारी ५९.५६ टक्के मतदान झाले. शहरातील एकूणच वातावरण पाहता बहुमताची मॅजिक फिगर गाठणे काँग्रेस अाणि भाजपलाही कठीण गेल्याचे दिसते. प्रचारात जी चुरस होती, ती मतदानात दिसली नाही. काँग्रेस व भाजप यांच्यातच मुख्य लढत असल्याचे स्पष्ट झाले अाहे. गुरुवारी दुपारी एक वाजेपर्यंत सर्व प्रभागांतील मतमोजणीचे निकाल हाती येतील. 
 
सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली असली तरी दुपारनंतर मतदानाचा अोघ कमी झाला होता. उन्हाचाही परिणाम जाणवला. कोणीही निवडून अाला तरी काय फरक पडतो? असे म्हणत सोलापूरकरांनी मतदानातील चुरस कमी केली. मात्र अाजच्या मतदानात प्रभागातील स्थानिक संदर्भच जास्त चर्चेत होते. देशाच्या किंवा राज्याच्या पातळीवरील काही मुद्दे चर्चेत राहतील, असे वाटले होते. पण तसे फारसे झाले नाही. तसा प्रभावही जाणवला नाही. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाचा 
टक्का वाढला. 
 
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, अामदार प्रणिती शिंदे यांच्या दृष्टीने ही निवडणूक खूपच प्रतिष्ठेची बनली अाहे. काँग्रेसने नवीन चेहरे देऊन लोकांमध्ये स्वच्छ प्रतिमेने जाण्याचा दावा केला अाहे. मात्र अनेक मोहरे पक्ष सोडून गेल्याचा परिणाम किती होतो? हे उद्याच्या निकालात स्पष्ट होईल.  काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून पुन्हा पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात अाहे.
 
सत्ता खेचून घेण्यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख अाणि पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचे जोरदार प्रयत्न दिसले. पालकमंत्री देशमुख यांचे चिरंजीव किरण हे निवडणूक लढवत असल्याने प्रभाग क्रमांक दोनमधील निकालाकडे अाता सर्वांचे लक्ष लागून राहिले अाहे.
 
एकूणच वातावरणाचा अाणि संघर्षाचा परिणाम भाजपला सत्तेपर्यंत नेण्यात अडथळा ठरतो का? की वर्षानुवर्षे काँग्रेसच्या सत्तेमुळे असलेल्या नाराजीचा फायदा भाजपला सत्तेपर्यंत पोहोचवतो, हे गुरुवारी निकालातून स्पष्ट होईल. राष्ट्रवादी काँग्रेस अाणि शिवसेना हे दोन्ही पक्ष फार मजल मारतील, अशी शक्यता नाही. त्यामुळे शहरातील लढत ही काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच दिसली. मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाने अापल्या हक्काच्या तीन, चार जागा मिळवल्या तरी भरपूर कमावल्यासारखे अाहे. एमअायएम फॅक्टरही काँग्रेसला मतदानात अडचणीचा दिसला. 

उद्या मतमोजणी 
गुरुवारी सकाळी दहा वाजता रामवाडी येथील शासकीय गोदामात मतमोजणीला सुरुवात होणार अाहे. पतपेट्यांचे सील उघडल्यानंतर काही मिनिटांतच निकाल कळणार अाहेत. साधारणत: दुपारी एक वाजेपर्यंत सर्व २६ प्रभागांतील निकाल हाती येतील, असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा महापालिका अायुक्त विजयकुमार काळम यांनी सांगितले.

मतदानासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
सोलापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ८ मधील ग. ल. कुलकर्णी प्रशालेत मतदानासाठी गेलेले ज्येष्ठ नागरिक गंगाधर शेटे (वय ७५, उत्तर कसबा) यांचा चक्कर येऊन पडल्यामुळे मृत्यू झाला. ही घटना दुपारी घडली. मतदान करण्यापूर्वीच हा प्रकार घडला.
 
मतदान केंद्रातील फरशी गुळगुळीत असल्यामुळे पाय घसरल्याचा संशय व्यक्त होत आहे. खाली पडल्यानंतर त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. पण त्यापूर्वी मृत्यू पावल्याचे सांगण्यात अाले. या घटनेनंतर मतदान केंद्रात जाऊन पाहणी केली असता सतरंजी व मॅट टाकण्यात येत होते. याबाबत कुणाची तक्रार नसल्याचे  पोलिसांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...