आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर महापालिका: सुरेश पाटील सभागृह नेता, विरोधी पक्षनेता महेश कोठे; महापौर सव्वा वर्षासाठी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिकेत सभागृह नेतेपदी भाजपचे सुरेश पाटील आणि विरोधी पक्षनेता म्हणून शिवसेनेचे महेश काेठे यांची निवड झाली. स्थायी समितीचे १६ तर परिवहन समितीचे १२ सदस्य निवडीची घोषणा महापौर शोभा बनशेट्टी यांनी केली. विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेनेेने अपेक्षेप्रमाणे कोठे यांच्या नावाची घोषणा केली. कोठे हे महापौर ते विरोधी पक्षनेतेपदापर्यंत महापालिकेत कामकाज पाहिलेले. महापौर, सभागृह नेता आदी पदे त्यांना मिळाली. याशिवाय जिल्हा प्रमुख पदावर ते आहेत. स्थायी समितीतही त्यांचे नाव आहे. 
 
शासकीय विश्रामगृहात झाली बंद दाराआड चर्चा 
महापौरनिवडीपूर्वी सकाळी दहा ते पावणे अकरा वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृहात बंददारात खलबते झाली. शोभा बनशेट्टी यांच्यासाठी सव्वा वर्षाची मुदत ठरवण्यात आली. पहिली अडीच वर्षे महिलांसाठी पद राखीव आहे. भाजपच्या निर्णयाने दोन महिला महापौर होऊ शकतील. 
 
बैठकीस पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, संघटक रवी अनासपुरे, महिला संघटक उमा खापरे, शहराध्यक्ष अशाेक निंबर्गी यांची उपस्थिती होती. 
पालकमंत्र्यांनी सभागृह नेतेपदी सुरेश पाटील यांच्या नावाची शिफारस केली. दुसऱ्या गटाने श्रीनिवास करली यांच्या नावाची शिफारस केली. पालकमंत्र्यांनी अनुभवाचा मुद्दा सांगत मागणी फेटाळून लावली. स्थायी समितीमध्ये संजय कोळी यांच्या नावावर चर्चेत अडचणी आल्या. सुरेश पाटील आणि कोळी हे एकाच प्रभागात असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. पालकमंत्र्यांनी तो मुद्दा बाजूला करत कोळीचे नाव निश्चित केले. त्यानंतर लगेच पालकमंत्री बाहेर पडले. ‘थांबा सगळे मिळून जाऊ’, असा काहीनी दिलेला सल्ला त्यांनी ऐकला नाही. 

चंदनशिवे व पाटील यांच्यात संघर्ष 
सभागृहाबाहेर मित्र असलेले बसपचे आनंद चंदनशिवे आणि भाजपचे सुरेश पाटील यांच्यात पहिल्या सभेत संघर्ष झाला. बसपकडून परिवहन समितीसाठी संजय गायकवाड यांच्या नावाची शिफारस करण्यात आली. ते नाव वगळले. त्यास चंदनशिवे यांनी हरकत घेतली. याशिवाय राष्ट्रवादीचे राजन जाधव यांचे नाव वगळले. 

स्थायी समिती सभापतीसाठी संजय कोळी आणि नागेश वल्याळ यांची नावे चर्चेत येऊ शकतील. कोळी यांच्या नावास सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी विरोध केल्यास रवी गायकवाड यांचे नाव ऐनवेळी पुढे येऊ शकते. परिवहन समितीसाठी वीरेश उंबरजे, दैदीप्य वडापूरकर यांच्या नावाची चर्चा होऊ शकते. पालकमंत्री हे उंबरजे तर सहकारमंत्री हे वडापूरकर यांच्या नावाचा आग्रह धरू शकतात. 
 
नवी परिवहन समिती 
भैरण्णाभैरामडगी, वीरेश उंबरजे, गणेश जाधव, मल्लेश सरगम, संतोष कदम, दैदीप्य वडापूरकर (सर्व भाजप), तुकाराम मस्के, विजय पुकाळे, परशुराम पिसे (सर्व शिवसेना), जाकीरहुसेन सागरी (एमआयएम), भीमाशंकर टेकाळे, नितीन भोपळे (काँग्रेस). 
 
नवी स्थायी समिती 
संजयकोळी, रवी गायकवाड, नागेश वल्याळ, मीनाक्षी कंपली, मनीषा हुच्चे, राजश्री बिराजदार, श्रीनिवास करली, श्रीनिवास रिकमल्ले (सर्व भाजप), महेश कोठे, विठ्ठल कोटा, गुरुशांत धुत्तरगावकर (सर्व शिवसेना), नरसिंग कोळी, प्रवीण निकाळजे (काँग्रेस), तौफिक शेख (एमआयएम),आनंद चंदनशिवे (बसप), नागेश गायकवाड (राष्ट्रवादी). 
 
भाजपकडून महिलांना प्राधान्य 
महापालिकेत सत्ताधारी भाजपने महिला दिनाच्या दिवशी महिलांना झुकते माप दिले. महापाैर उपमहापाैरसह स्थायी समितीसाठी मनीषा हुच्चे, मीनाक्षी कंपली, राजश्री बिराजदार यांना संधी दिली. शिवसेना, बसप, काँग्रेस, राष्ट्रवादीने महिलांना संधी दिली नाही. 
 
दोन मंत्री वेगवेगळ्या दिशेने सभागृहात 
विश्रामगृहातीलबैठकीनंतर पालकमंत्री तेथून घरी परतले. तिथे सकाळी नऊ वाजल्यापासून पालकमंत्री यांच्या निवासस्थानावर भाजपचे ८५ टक्के नगरसेवक उपस्थित होते. त्यांना घेऊन पालकमंत्री महापालिकेत आले. सहकारमंत्री सुभाष देशमुखही आले. सभेचे कामकाज सुरू होताच दोघे तेथून बाहेर गेले. महापौर निवड झाल्यानंतर पुन्हा दोघे वेगवेगळ्या दिशेने आत आले आणि महापौरांचा सत्कार करून वेगवेगळ्या दिशेने बाहेर गेले. 
 
बातम्या आणखी आहेत...