आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्घाटनात सोलापूरचा ठसा, केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केला गौरव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेत पहिल्या टप्प्यात सहभागी असलेल्या २० शहरातील कामाचा शुभारंभ पुण्यातून शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. तेथे सोलापूर शहराचा विशेष ठसा दिसून आला. स्टाॅल भेट, केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सोलापूर शहराचा उल्लेख आणि सिद्धेश्वर मंदिर तलाव सुशोभीकरणाचा मुद्दा चर्चेला आला.

पुण्यात बालेवाडी येथे २० स्मार्ट शहराचे स्टाॅल लावण्यात आले होते. त्यात सोलापूर शहराचा समावेश होता. त्या स्टाॅलला पंतप्रधान मोदी यांनी भेट दिली. यावेळी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीचे चेअरमन मिलिंद म्हैसकर, नगर विकास खात्याचे सचिव मनीषा म्हैसकर, कंपनीचे सीईओ अमिता दगडे-पाटील उपस्थित होते. उद््घाटनापूर्वी स्मार्ट सिटीचे सादरीकरण केंद्रीय नगर विकास खात्याच्या वतीने करण्यात आले. त्यात सोलापूर शहरातील सिद्धेश्वर तलाव सुशोभीकरणाचा मुद्दा अग्रक्रमाने मांडण्यात आला. त्याचे छायाचित्र दाखवण्यात आले. नगरविकास मंत्री नायडू यांनी आपल्या भाषणात सोलापूर शहराचा उल्लेख करत स्तुती केली. सोलापूरसारख्या लहान शहराचा यात समावेश गौरवाचे असल्याचे ते म्हणाले.

हाॅलमध्ये विना व्यत्यय कार्यक्रम : योजनेच्या उद््घाटन कार्यक्रमाचे पुण्याहून थेट प्रक्षेपण करण्यात आले. देशातील १८ शहरांत एकाच कार्यालयात थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले. सोलापूर मात्र त्यास अपवाद ठरले. हजार लोकांसमोर कार्यक्रम दाखवण्यात अाला. असा कार्यक्रम देशात एकट्या सोलापुरात झाल्याचे आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी सांगितले.

नागरिकांचा प्रतिसाद
रंगभवन येथील कार्यक्रमास नागरिकांचा सहभाग होता. पालकमंत्री विजयकुमार देशमुख, महापौर सुशीला आबुटे, उपमहापौर प्रवीण डोंगरे, कुलगुरू एन. एन. मालदार, एनटीपीसीचे प्रबंधक एन. एन. राॅय, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार, माजी आमदार नरसिंग मेंगजी, निर्मला ठोकळ, नगरसेवक, नगरसेविका आणि निमंत्रित व्यक्ती उपस्थित होते.

नागरिकांच्या अाशेवर पाणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरातील नागरिकांशी आॅनलाइन संवाद साधण्याची शक्यता आहे, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले. त्यानुसार तयारी करण्यात आली होती. पण ते संवाद साधले नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या अाशेवर पाणी फेरले.

तिन्ही खासदारांची कार्यक्रमाला दांडी
स्मार्टसिटी योजनच्या शुभारंभ कार्यक्रमास खासदार अॅड. शरद बनसोडे, माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड हे अनुपस्थित होते. त्याचप्रमाणे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार प्रणिती शिंदे, दत्तात्रय सावंत यांचीही नावे कार्यक्रम पत्रिकेत होती. पण, तेही गैरहजर होते.

आमदार सुभाष देशमुख : स्मार्ट सिटी योजनेमुळे सोलापूरच्या विकासाला पुन्हा ऊर्जितावस्था येण्यास मदत होईल. हद्दवाढ भागामध्ये अनेक अडचणी असल्याने या भागापासून योजनेची सुरवात करावी. बेरोजगारीचा प्रश्न मोठा असल्याने छोटे-मोठे उद्योग व्यवसाय सुरू करावेत, अशी अपेक्षा त्यांनी मांडली.
पालकमंत्री विजयकुमार देशमुख: केंद्र शासनातर्फे रस्ते विकासासाठी ११०० कोटी रुपयांचा निधी मिळाला. शहरात दोन नवीन उड्डाणपूल, कुंभारी येथे अद्ययावत आैद्योगिक वसाहत उभारणे. एस. टी. बसस्थानकाची सुधारणा लवकरच होईल. विकासासाठी आणखी निधी आणण्याकरिता प्रयत्नशील आहेच.
बातम्या आणखी आहेत...