आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपलब्ध पाण्यामुळे उत्तर सोलापुरात कांद्याचे क्षेत्र वाढणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तर सोलापूर - संपूर्ण खरीप वाया गेल्यामुळे रब्बीचा पेरा वाढणार असल्याचे चित्र सध्या तालुक्यात दिसत अाहे. त्यात कांदा पिकाचा तोरा जास्त दिसत आहे. चालू वर्षात गतसप्ताहापर्यंत पूर्ण पावसाळा कोरडा गेल्यामुळे तालुक्यात झालेल्या जवळपास सर्व पेरण्या वाया गेल्या आहेत. रब्बीसाठी मोठे क्षेत्र असणाऱ्या तालुक्याच्या लागवड क्षेत्रात खरीप क्षेत्राचीही भर पडल्यामुळे रब्बीचे क्षेत्र वाढणार आहे. रब्बी पिकात ज्वारी, गहू यांच्यानंतर कांदा पिकाखाली मोठे क्षेत्र आहे. तालुक्यातील रानमसले, वडाळा, अकोलेकाटी परिसरात कांद्याचे मोठे उत्पादन घेतले जाते. तालुक्यात उत्तरा नक्षत्र बरसले असून, गत सप्ताहात जवळपास १५८ मि. मी. पाऊस पडला आहे. पडलेल्या पावसाचा उपयोग करून शेतकऱ्यांनी कांदा लागवड चालू केली आहे. या वर्षी बहुतांश शेतकरी कांद्यासाठी ठिबक सिंचन, सुक्ष्मसिंचनाचा वापर करत आहेत. कांद्याच्या सध्याच्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांचा ओढा कांदा पिकाकडे आहे. समाधानकारक पावसामुळे कांदा रोपाचे दर वाढले अाहेत. लागवडीसाठी महिलांच्या मजुरीत वाढ झाली असून, त्यांच्या हाताला काम मिळत आहे.

इतर रब्बी पिकासाठीही शेतकरी तयारी करत आहेत. या वर्षी शासनाने हात आखडता घेतला आहे. दरवर्षी शासनाकडून होणारा मोफत बियाणे निविष्ठा पुरवठा अद्याप झालेला नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी आहे. दुष्काळाने आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीला आलेला शेतकरी शासनाकडे आस लावून पाहत आहे.

खत, बियाणे वाटपाची अद्याप सूचना नाही
^यावर्षी मोफत बियाणे खत वाटप कार्यक्रमाबाबत वरिष्ठ पातळीवरून कोणतीही सूचना अद्याप आम्हाला देण्यात आलेली नाही. खासगी बाजारात मात्र बियाणांचा साठा मोठ्याप्रमाणात आहे. एन.बी. पाचकुडवे, तालुका कृषी अधिकारी