सोलापूर - मध्य आशियातील ‘अायसिस’चे भूत जगभरात घोंगावत अाहे. नुकताच पॅरिसवर मोठा हल्ला झाला. फ्रान्सने प्रतिहल्ला केला. पण ‘अायसिस’चा धोका भारताला नाही, असा निर्वाळा विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी रविवारी येथे दिला. अमेरिका, मुंबई, पॅरिसवरील हल्ला सारखाच अाहे. पद्धत अाणि उद्देश वेगळा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
एका खासगी कार्यक्रमासाठी रविवारी ते येथे आले होते. सकाळी त्यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. दहशतवादी हल्ल्याच्या तंत्राविषयी ते म्हणाले, की एकदम कुठेही हल्ला होत नाही. अगोदर नियोजन करून असे प्रकार होतात. पोलिसांनी तपास करताना काही तारतम्य बाळगावे. काही गोपनीय व तांत्रिक माहिती उघड करू नये. कारण त्याचे तपासात अडथळे येतात. एखादा संशयित अारोपी पुढील गुन्हा करताना सावध होतो. तपासात ‘क्लू’ मिळत नाही. एखाद्या चोराला पकडल्यानंतर पोलिस मोठ्या अाविर्भावात माध्यमांना माहिती देतात. तपासातील बारकावे सांगतात. ही बाब टाळावी, असे उज्ज्वल निकम म्हणाले.
पाकिस्तानातील सामान्यांना भारताविषयी प्रेम
पाकिस्तानात दहशतवाद वाढतोय. हे जरी खरी असले तरी तेथील सर्वसामान्य माणसाला भारताविषयी, ताजमहाल, मुंबई, दिल्ली याविषयी अाकर्षण अाहे. त्यांना भारतात यावेसे वाटते. येथे राजकीय सत्ता कुणाची अाहे? त्यांची भूमिका काय अाहे? याच्याशी तेथील सामान्य नागरिकांना काहीही देणे-घेणे नाही.
निकम यांचे मुद्दे
- दहशतवादी अाधुनिक प्रशिक्षित असतात
- छोटा राजनचा तपास चांगल्या पद्धतीने
- खटल्यांचा निपटारा होण्यासाठी जलदगती न्यायालये हवीत
- शिना बोरा हत्याकांड प्रकरणाला वारेमाप प्रसिद्धी
- ‘टाडा’, ‘पोटा’ कायद्याचा वापर चांगल्या पद्धतीने व्हावा
- अाहे त्या कायद्याची अंमलबजावणी करून चांगला तपास करावा
- ९० दिवसांनंतरही अारोपपत्र दाखल करण्यास मुभा द्यावी
- पोलिस वाईट काम करतात, चुकीचे वागतात अशी प्रतिमा चुकीची.
माध्यमांमध्ये ‘टीअारपी’ची स्पर्धा
इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांमध्ये ‘टीअारपी’ची स्पर्धा अाहे. ‘२६-११’चा हल्ला लाइव्ह केल्यामुळे दहशतवादी हँडलरना काही फायदा झाला. असा हल्ला होऊ शकतो, असे जगाने पाहिले. नेमके अापण काय दाखवावे, काय नाही याबाबत विचार व्हावा. माध्यमांना स्वातंत्र्य अाहे. दुसरी बाजू पाहिली तर टीव्हीमुळे नागरिकांना घटनेचे गांभीर्यही कळले हेही विसरून चालणार नाही. अनेक कामांत माध्यमांचे मोठे योगदान अाहे. पण, पॅरिसमधील मीडियांनी काही तारतम्य बाळगून हल्ल्याची माहिती भडकपणे दाखविली नाही. एखादी घटना घडली, गंभीर गुन्ह्याची सुनावणी सुरू असताना त्यावर अनुमान काढले जातात. ते नको.
दहशतवाद्यांचा मूळ उद्देश भीती
दहशतवाद्यांचा मूळ उद्देश म्हणजे नागरिकांत भीती निर्माण करणे असतो. अापल्या कृत्याचा प्रसार व्हावा, असा त्यांचा उद्देश असतो. युराेपीय देशात दहशतवाद्यांनी काही मुलांना अोलिस ठेवले. त्यावेळी त्यांनी पाच-सहा दिवसांची वर्तमानपत्रे मागितली. ती दिल्यानंतर मुलांना सोडण्यात आले. पण, त्यांच्या या कृत्याची वर्तमानपत्रात बातमीच नव्हती. याबद्दल त्यांनी पोलिसांना विचारले की ही बातमी का नाही? तर मुख्य पान वगळून वर्तमानपत्र देण्यात अाले होते. पोलिसांंनी तपास झाल्यानंतर हे सांगितले.