आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमेदवारीत पक्षश्रेष्ठींच्या आप्तांची जमली मांदियाळी, कौटुंबिक लोकशाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - स्वत: राजकारणात अनेक पदे भूषवली असली तरी, सध्या सत्तेत असले तरी यंदाच्या पालिका निवडणुकीत आणि एकंदर आजवरच्या राजकारणात विविध पक्षांत पुढची पिढी उतरल्याचे चित्र आहे. यात भाजपसह काँग्रेस, शिवसेना, माकपचा समावेश आहे. पक्षात दबदबा असलेल्या बहुतांश नेत्यांनी आपल्या नातेवाइकांना उमेदवारी मिळवण्यासाठी वजन खर्ची घातले आहे.
 
काँगेस
काँग्रेेस पक्षाचा कारभार पाहणारे माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांचे चिरंजीव मनोज, दिलीप माने यांची भावजय प्रिया, हणमंतीबाई करगुळे यांची सून वैष्णवी, हेमू चंदेले यांच्या भावजय नलिनी, परिवहनचे माजी सभापती केशव इंगळे यांच्या पत्नी, माजी महापौर बंडप्पा मुनाळे यांचे नातू सिद्धेश्वर सुभाष मुनाळे, नगरसेवक उमेश मामड्याल यांच्या पत्नी अंबिका, माजी शहराध्यक्ष व नगरसेवक धर्मा भोसले यांचे चिरंजिव विनोद, माजी महापौर नारायणदास राठींचे चिरंजिव रमेश हे यंदा यामध्ये आहेत.
 
राष्ट्रवादी काँगेस व इतर
राष्ट्रवादीचे नेते मनोहर सपाटे यांच्यासह पुतण्या ज्ञानेश्वर, मुलगा अॅड. बाबासाहेब, वहिनी रेखा सपाटे यांची यादी आहे. परिवहनचे माजी सभापती विश्वनाथ कंदकुरे यांच्या भावजय, शिवाजी पिसे यांची सून सारिका, नगरसेवक सुनील खटके यांच्या पत्नी ज्योती, शिवसेनेचे माजी आमदार शिवशरण पाटील यांच्या सून राजश्री याही निवडणूक लढवत आहेत. माजी नगरसेविका सुषमा घाडगे यांचे चिरंजिव श्रीकांत हे यंदा निवडणूक लढवणार आहेत.
 
भाजप
भाजपमध्ये पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचे चिरंजीव डॉ. किरण, नगरसेवक जगदीश पाटील यांचे चिरंजिव अमित हे पहिल्यांदा नशीब आजमावत अाहेत. सुरेश पाटील यांचे बंधू राजू हेही या माध्यमाने निवडणुकीत आहेत. तसेच अक्कलकोटचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्या कन्या व माजी महापौर विश्वनाथ बनशेट्टींच्या सूनबाई नगरसेविका शोभा बनशेट्टी उमेदवार आहेत.
 
शिवसेना व मनसे 
शिवसेनेचे नूतन जिल्हाप्रमुख महेश कोठे यांच्यासह त्याचे पुतणे देवेंद्र, मुलगा प्रथमेश, जावई विनायक कोंड्याल, बहीण कुमुद अंकाराम, विहीण श्रीकांचना यन्नम हे अख्खे कुटुंब निवडणूक रिंगणात आहे. मनसेकडून आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात लढलेले अनिल व्यास यांचे वडील छोटेलाल व्यास हेदेखील रिंगणात आहेत.
 
माकप 
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे येथील सर्वेसर्वा माजी आमदार नरसय्या आडम यांच्या पत्नी कामिनी, मुलगी अरुणा गेंट्याल (आडम) या यंदा रिंगणात आहेत.