आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परवाना काढण्यासाठी तरुणांचा ओघ अधिक, यंत्रणेची डोकेदुखी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूरच्या आरटीओमध्ये कामे कमी, बाहेरच्या एजंटांकडेच बहुतांश कार्य होत असल्याने शहाणी माणसे आरटीओची पायरीच चढत नसल्याचे दिसून येते. चार हेलपाटे मारण्यापेक्षा एजंट गाठून कामे करावी लागत आहेत. आपले आपण म्हणजे एजंटविना लायसन्स मिळविणे दुरापास्तच असल्याचे चित्र अजूनही कायम आहे. कशाला जास्त झंझट करून घेता, एजंट गाठा, लायसन्स मिळवा, असा सल्ला झेरॉक्स सेंटरपासून ते आरटीओ आवारात कोणाकडूनही सहज मिळतो.
शहर जिल्ह्यातील तरुणांची आकडेवारी पाहिली गेली तर लक्षात येते की दरवर्षी सुमारे ५० हजार मुले बारावीच्या परीक्षेला बसतात. हीच मुले पुढच्या वर्षापासून म्हणजे वयाच्या १८ व्या वर्षापासून लायसन्स काढण्यासाठी पात्र होत असतात. म्हणजे प्रति महिना चार हजार लायसन्स मिळण्याची क्षमता हवी आहे. प्रत्यक्षात रोज ९० कच्चे परवाने देण्याची कोटा पद्धत आहे. आठवड्यातील पाच दिवस कामकाज. त्यामुळे ४५० जणांना आठवड्यात लायसन्स मिळते. म्हणजे महिन्याला १८०० इतकीच क्षमता आहे. या गतीने वर्षभरात केवळ २१ हजार ६०० जणांनाच लायसन्स मिळू शकते. ही सर्वोच्च क्षमता झाली. याच्या ७५ टक्केच काम पूर्ण होत असते. म्हणजे उर्वरित नागरिकांची वेटिंग लिस्ट आणखी वाढतच जाणार हे चित्र स्पष्ट आहे.

आरटीओ कार्यालयात लर्निंग लायसन्स काढण्यासाठी जी आवश्यक कागदपत्रे लागतात, त्याची लिस्ट लावण्यात आली आहे. ती वाचून प्रत्येकाने आपणच लायसन्स काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.

आजच नंबर लावला, स्वप्रयत्न करणार
लर्निंग लायसन्स काढण्यासाठी परमेश्वर पांढरे हा युवकही आला हाेता. सर्व प्रक्रिया आपण स्वत:च पार पाडणार आहोत, पक्के लायसन्सच्या वेळीही असाच प्रयत्न करू , असे मत त्याने व्यक्त केले. आरटीओची यंत्रणा किचकट आहे.

अपाॅइंटमेंट मिळवताना करावी लागते कसरत
आरटीओ कार्यालयात एक युवक फार्म घेण्यासाठी आलेला. बाहेरून ऑनलाइन नंबर लावता आलेला नव्हता. मात्र आरटीओच्या जवळच्या झेरॉक्स सेंटरवरून नंबर लावला. १२ जानेवारी तारीख मिळाली. ती घेतली. तेव्हा स्वत:च लायसन्स काढणार आहे, अशी प्रतिक्रिया इरफान जहागीरदार याने दिली.
पक्के लायसन्स काढण्यासाठी उपप्रादेशिक कार्यालयात खास ट्रॅक आहे. ड्रायव्हिंग लायसन्स देण्यापूर्वी जी चाचणी होते, चार चाकी म्हणजे कार असेल तर पाहणीसाठी निरीक्षक त्यात स्वत: बसतात. पण रिक्षाची चाचणी घेताना मात्र रिक्षात बसणे टाळतात.