आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात आदिवासी धनगर साहित्य संमेलन, आमदार गणपतराव देशमुख यांना जीवनगौरव पुरस्कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 सोलापूर : पहिले आदिवासी धनगर साहित्य संमेलन शनिवार (दि. ७) रविवारी (दि. ८) सोलापुरात आयोजिले आहे. त्यानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या समाजातील ज्येष्ठांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. संमेलनाच्या निमित्ताने चर्चासत्र, परिसंवाद यासह बौद्धिक कार्यक्रम आयोजिल्याची माहिती, संयोजक डॉ. विष्णूपंत गावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
 
डॉ. गावडे म्हणाले, “हुतात्मा स्मृती मंदिरात होणाऱ्या संमेलनाचे उद्घाटन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते होईल. या वेळी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मंत्री अण्णा डांगे, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, सहकारमंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आदी उपस्थित राहणार आहेत. संमेलनाच्या निमित्ताने ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. छगनशेट पाटील यांच्या हस्ते दिंडीचे उद्घाटन होईल. 
 
या संमेलनाच्या निमित्ताने आमदार गणपतराव देशमुख यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात येईल. त्याचप्रमाणे माधव गडदे यांना विठोजीराव होळकर क्रांतिरत्न पुरस्कार, अभियंता अशोक बन्नेनवर यांना (स्व.) बी. के. कोकरे ‘समाजभूषण’ पुरस्कार, अशोक मोटे यांना महाराजा यशवंतराव होळकर ‘समाजरत्न पुरस्कार’), डॉ. व्यंकटेश चामणर यांना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार, हेमंत पाटील यांना मल्हारराव होळकर समाजसेवा पुरस्कार, संभाजी सूळ यांना समाजसेवक पुरस्कार, अभिमन्यू शेंडगे यांना राजमाता अहिल्यादेवी होळकर ‘सामाजिक कृतज्ञता’ पुरस्कार, आर. डी. शेंडगे यांना लोकमाता राजमाता अहिल्यामाई होळकर सामाजिक कृतज्ञता पुरस्कार, अशोक यमगर यांना आहिल्यामाई होळकर सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल. 
 
साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. संजय सोनवणी यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होईल. गौरव ग्रंथ, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले. या पत्रकार परिषदेला संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. अभिमन्यू टकले, अमोल पांढरे, जयसिंग शेंडगे आदी उपस्थित होते.
 
या विषयांवर आहेत परिसंवाद 
संमेलनाच्या निमित्ताने विविध परिसंवाद आयोजिले आहेत. आदिवासी धनगर : पुरातनाचे एक वास्तव, धनगर समाजाच्या महिलांसमोरील समस्या आणि नवयुगातील आव्हाने, धनगर समाजाचा इतिहास, माध्यमांमधील धनगर समाजाचे चित्रण, मराठी साहित्यात धनगर दुर्लक्षित का, धनगर समाजाच्या उज्ज्वल भवितव्याचा राजमार्ग या विषयांवरील परिसंवादांमध्ये अनेक मान्यवर अभ्यासक सहभागी होत आहेत. रविवारी (दि. ८) परिसंवादाचा समारोप जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते होईल. या वेळी खासदार राजू शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती आहे. 
बातम्या आणखी आहेत...