सोलापूर - सोलापूर शहरावर आलेले जलसंकट टाळण्यासाठी आलमट्टी (कर्नाटक) धरणातून पाणी मिळवता येणे शक्य आहे. त्यासाठी जिल्हा काँग्रेस मदतीचा हात पुढे करेल, अशी खात्री काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागांचा पाहणी दौरा केल्यानिमित्त पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले. येत्या १५ सप्टेंबरनंतर दुष्काळ निवारणासाठी ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले असल्याने तोपर्यंत काँग्रेस पक्ष संयमाची भूमिका घेईल, असेही त्यांनी सांगितले.
दुष्काळाच्या नैसर्गिक संकटावर मात करण्यासाठी दर्जाहीन राजकारण काँग्रेस पक्षातर्फे कधीच होणार नाही. या नैसर्गिक संकटावर मात करण्यासाठी सरकारच्या खाद्यांला खांदा लावून मदतीचा हात देईल. उजनीतून बंदिस्त जलवाहिनीद्वारे पाणी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे एनटीपीसीची पाइपलाइन झाली असून तीच सोलापूरकांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे, त्यांनी सांगितले.
राज्य सरकारकडून दुष्काळ नियोजनासाठी भरीव निधी आणण्यासाठी स्थानिक प्रशासनाने चांगले नियोजन करणे आवश्यक आहे. सध्या, नियोजनाद्वारे लोकप्रियता मिळवलेले जिल्हाधिकारी मुंढे यांनी दुष्काळाचे चांगले नियोजन, सर्व तालुके शेतकऱ्यांना सारखा न्याय देऊन नागरिकांची वाहवा मिळवावी.
जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांची तहान अगोदर भागवली पाहिजे. आम्हाला पाणी दिल्यानतंर पुढे काहीही करा, ही भूमिका आमची आहे. त्याबाबत स्वत: राणे यांच्याशी बोललो असून त्यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे.
कृष्णा नदीवरील आमलट्टी धरणामध्ये पाण्याची पातळी चांगली आहे. त्या धरणाचे बॅकवॉटर इंडी तालुक्यातील चडचण, उमराणीमार्गे सादेपूर येथे भीमा नदीत सोडता येते. २००२-०३ मध्ये त्या पद्धतीने पाणी आणले होते. सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी आैज बंधारा भरून घेण्यापुरते पाणी आलमट्टीमधूून आणणे शक्य आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने कर्नाटककडे प्रस्ताव पाठवणे गरजेचे आहे. शासनाचा प्रस्ताव गेल्यानंतर काँग्रेसतर्फे त्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. कर्नाटकात काँग्रेसची सत्ता असून जलसंपदा मंत्री एम. बी. पाटील हे विजापूरचे पालकमंत्री आहेत. त्यांच्याकडे काँग्रेसचे शिष्टमंडळ पाठपुरावा करून पाणी मिळण्यासाठी निश्चित प्रयत्न करेल. दुष्काळातील ‘भीमा’च्या मदतीसाठी निश्चितच ‘कृष्णा’चे पाणी येईल, असा विश्वास जिल्हाध्यक्ष पाटील यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री राज्य मंत्रिमंडळातील अनेक महत्त्वाची खाती विदर्भातील मंत्र्यांकडे आहेत. त्याभागास मोठ्या प्रमाणावर निधी मिळतोय. विदर्भाप्रमाणेच पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी मदत करावी.