आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री दौऱ्यानंतर ‘कमळ’ फुलले, ‘घड्याळ’ बिघडलेलेच: साेलापूर जि.प, पंचायत समिती निवडणुक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - राष्ट्रवादी काँग्रेसचा बोलबाला असलेल्या सोलापूर जिल्ह्यात भाजपने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सत्ताधारी राष्ट्रवादीसमोर आव्हान उभे केले आहे. जिल्हा परिषदेच्या ६८ पैकी ५१ जागांवर व पंचायत समितीच्या १३६ पैकी १०२ ठिकाणी भाजपने उमेदवार उभे केले अाहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप व महाआघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ झाल्यानंतर पक्षात उत्साह वाढला असून, ‘राष्ट्रवादी’ला मात्र प्रचारासाठी नेत्यांची वाट पाहण्याची वेळ अाली अाहे.  

जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी भाजपने पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवार उभे केले असून इतर ठिकाणी स्थानिक आघाड्यांच्या नेत्यांनी त्यांच्या मर्जीतील उमेदवार दिलेत. राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्याचा निर्धार महाआघाडीच्या नेत्यांनी जाहीर केला. बार्शी येथील शिवसेनेचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. प्रमुख पक्षांपेक्षाही व्यक्तिनिष्ठ व गटातटाच्या राजकारणाचा वरचष्मा असलेल्या बार्शी तालुक्यात राऊत यांचा भाजप प्रवेश पक्षाला फायदेशीर ठरू शकताे.  

भाजपशी जवळीक साधलेले आमदार प्रशांत परिचारक व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संजय शिंदे यांनी ‘राष्ट्रवादी’ विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला. जिल्हा बँकेची बदलती परिस्थिती व कर्जाची न केलेली परतफेड या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे नेते खासदार विजयसिंह मोहिते यांना टार्गेट करण्याचा इरादा शिंदेंनी जाहीर केला. जिल्हा परिषदेत सध्या राष्ट्रवादीचे फक्त ३५ सदस्य असून त्यांच्याकडे काठावर बहुमत आहे. एकीकडे माजी आमदार राऊत व माळशिरसचे माजी उपसभापती उत्तम जानकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पण आमदार परिचारक व  शिंदेंनी भाजपमध्ये प्रवेश करण्याऐवजी अद्याप काठावर राहणे पसंत केले. मोहिते व भाजपमधील जवळिकीमुळे  या दोघांनी ‘वेट अँड सी’ भूमिका घेतल्याची चर्चा आहे.  

अक्कलकोटमध्ये भाजपचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचा मुलगा शिवानंद यांनी पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे अपक्ष उमेदवारी दाखल केली. दक्षिण सोलापूर तालुक्यात भाजपने काँग्रेसच्या नाराज इच्छुकांना उमेदवारी देऊन गट व गणात लढत रंगवली. माळशिरस तालुक्यात उत्तम जानकर यांच्या भाजप प्रवेशामुळे पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष राजकुमार पाटील यांचा गट अस्वस्थ झाला असून त्यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला अाहे. मोहोळ तालुक्यात माजी आमदार राजन पाटील व राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे यांच्यातील दुरावा वाढला आहे. शिवसेना स्वतंत्र लढत असून महाआघाडी व राष्ट्रवादीच्या लढाईचा फायदा घेत पुढे सरकण्याच्या प्रयत्नात आहे. ११ पैकी तीन तालुक्यांमध्ये राष्ट्रवादीशी आघाडी केलेल्या काँग्रेसने उर्वरित तालुक्यांत स्वबळावर लढवण्याची घोषणा केली अाहे. मात्र माढा, मोहोळ, सांगोला तालु्क्यात त्यांना उमेदवारांसाठी शाेधाशाेध करावी लागली.  दक्षिण,  उत्तर सोलापूर व अक्कलकोट तालुक्यात काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली. 
 
नेत्यांच्या कुटुंबीयांचा अध्यक्षपदावर डाेळा  
जिल्हा परिषद अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी असल्याने नेतेमंडळींनी कुटुंबातील सदस्यांना उमेदवारीची खिरापत वाटली आहे. खासदार विजयसिंह मोहिते व माढ्याचे आमदार बबनराव शिंदे कुटुंब आघाडीवर आहे. या दाेघांच्या कुटुंबातील चार ते पाच जणांना उमेदवारी मिळाल्याने निष्ठावंत कार्यकर्ते मात्र नाराज अाहेत. राष्ट्रवादीने ऐनवेळी शिवसेनेचे भारत शिंदे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे दुखावलेल्या शिवाजी कांबळेंनी बंडखोरी केली.  
बातम्या आणखी आहेत...