आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DM SPL: झेडपी शिक्षकाने टॅब-थंब मशिनद्वारे बनवले मतदान यंत्र; ओळखपत्र, शाईची नाही गरज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माढा (सोलापूर) - निवडणुका अधिक पारदर्शी सोयीस्कर व्हाव्यात यासाठी परितेवाडी येथील कदम वस्तीवरील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी टॅब, थंब मशीनचा वापर करून मतदान यंत्र तयार केले आहे. मुंबई येथे राज्याचे निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांच्या कार्यालयात डिसले यांनी याचे सादरीकरण केले. 
 
डिसले हे तंत्रस्नेही शिक्षक म्हणून सर्वत्र परिचित आहेत. त्यांनी डिजिटल तंत्रज्ञानाच्या आधारे प्राथमिक शिक्षणात केलेल्या प्रयोगांची दखल मायक्रोसॉफ्टने घेतली होती. तसेच प्रयोगशील शिक्षकांच्या जागतिक कार्यशाळेसाठी कॅनडा येथे त्यांना आमंत्रित केले होते. तसेच, नुकतेच राज्यपाल, शिक्षणमंत्री यांनी त्यांना सन्मानित केले. आता डिजिटल तंत्रज्ञानाच्या आधारे सुधारित पद्धतीने मतदान करण्याविषयीचे काही पर्याय त्यांनी निवडणूक आयोगाला सूचविले आहेत. मतदान प्रक्रियेच्या खर्चात भरमसाट वाढ झाली आहे. स्वातंत्र्यानंतर ५२ वर्षांत निवडणुकीवर होणाऱ्या खर्चात १०० हून अधिक पटीने वाढ झाली आहे. ते नियंत्रणात आणणे शक्य असल्याचा दावा डिसले यांनी केला आहे. निवडणूक प्रकियेवरील खर्च ४७ टक्क्यांनी कमी करता येणार आहे. मनुष्यबळही कमी लागेल. मतमोजणी सुलभ होईल. मतदान केंद्रामध्ये लागणाऱ्या साहित्यात घट होईल, असे त्यांनी सांगितले. मतदारांच्या बायोमेट्रिक नोंदी घेतल्याने ओळखपत्रे छापण्याचा खर्च वाचेल. डिजिटल याद्यामुळे यात बदल करणे सोयीचे ठरेल. प्रत्येकवेळेस याद्या छापाव्या लागणार नाहीत. बोगस मतदानाला आळा बसेल. शाईवरही खर्च करावा लागणार नाही. 
 
...तर मतदान कक्ष पेपरलेस होईल 
मतदार यादी असलेला टॅब थंब मशीनला जोडावयाचे आहे. मतदाराला मतदान करतेवेळी अनुक्रमांक किंवा आधार क्रमांक सांगावा लागणार आहे. त्यानंतर मतदाराने आपली ओळख पटवून देण्यासाठी अंगठा स्कॅन करावयाचा आहे. त्यानंतर क्षणार्धात मतदाराची माहिती टॅबवर दाखवेल. ओळख पटविण्याच्या या पध्दतीमुळे १७ प्रकारचे अहवाल सादर करणे वाचेल. 
 
हे होतील फायदे 
कागदी मतदार याद्यांऐवजी टॅबमध्ये डिजिटल यादी बनवून ठेवता येईल. त्यामुळे दरवेळेस मतदारयाद्या नवीन बनवण्याची गरज भासणार नाही. मतदाराच्या आधार क्रमांकाची जोड बायोमेट्रिकला दिल्यास क्षणात अंगठ्यामुळे ओळख पटणार आहे. यामुळे वेळेची बचत होणार आहे. मतदान ओळखपत्राची शाईची गरज भासणार नाही. 
 
टॅबला बायोमेट्रिकमशीन जोडून मतदान प्रक्रिया राबवल्यास खर्च कमी होणार आहे. या सोप्या प्रक्रियेमुळे मतदान प्रक्रियाही वेगाने होईल. केवळ यासाठी बोटांच्या ठशांचे बायोमेट्रिक स्कॅनिंग करावे लागेल. निवडणूक आयुक्तांना ही संकल्पना आवडली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर मी या संकल्पनेवर काम केले. याचा अवलंब झाल्यास निवडणूक पद्धतच बदलेल. 
- रणजित डिसले,शिक्षक, परितेवाडी 
बातम्या आणखी आहेत...