आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लष्कर, केंद्रीय रुग्णालयांत सोलापुरी चादरी पोहोचवणार!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मागणी घटल्याने संकटात असलेल्या सोलापुरी चादरीचे अस्तित्व टिकवण्यासाठी खासदार अॅड. शरद बनसोडे यांनी पुढाकार घेतला. लष्कर आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीतील रुग्णालयांमध्ये या चादरी पोहोचवण्याचा संकल्प केला. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या भेटींचे नियोजन केल्याचे त्यांनी सांगितले. हा संकल्प चादर उत्पादकांसमोर मांडताना, ते म्हणाले, “हे माझे स्वप्न आहे. त्याला साकारण्यासाठी तुम्हीच प्रार्थना करा..!”
अक्कलकोट रस्त्यावरील आैद्योगिक वसाहतीत यंत्रमागधारक संघाच्या कार्यालयात बनसोडे यांनी सोमवारी हा संकल्प मांडला. लोकसभा निवडणूक प्रचारासाठी श्री. मोदी सोलापुरात आले होते. होम मैदानात झालेल्या सभेत त्यांनी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना उद्देशून म्हणाले होते, की पोलिसांच्या गणवेशासाठी सोलापुरात उत्पादित होणारी वस्त्रे पुरवली असती तरी येथील यंत्रमाग उद्योग वाढला असता. पंतप्रधानांना हाच शब्द आता खरा करून दाखवण्याची संधी असल्याची आठवण करून देणार असल्याचे श्री. बनसोडे म्हणाले. संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांनी स्वागत केले.

या वेळी प्रेसिडेंट धर्मण्णा सादूल, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष विश्वनाथ करवा, एमआयडीसी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष तिलोकचंद कांसवा, टेक्स्टाइल डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष सत्यराम म्याकल, उपाध्यक्ष श्रीनिवास बुरा, सचिव जयंत आकेन, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रभाकर वनकुद्रे, उद्योगपती मुरलीधर अरकाल, निर्यातदार जगदीशप्रसाद खंडेलवाल, अंबादास बिंगी आदी उपस्थित होते. राजू राठी यांनी सूत्रसंचालन केले.

यंत्रमागधारक संघाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत बोलताना खासदार शरद बनसोडे.
लष्करातील जवानांना रजई देण्यात येते. त्याचे उत्पादन उत्तर भारतात होते. एका रजईची किंमत १६०० रुपये आहे. त्याच्या बदल्यात ४०० रुपये किमतीची १३०० ग्रॅम वजनाची ‘सोलापुरी चादर’ दिल्यास जवानांचे थंडीपासून संरक्षण होईल काय, हा प्रश्न आहे. त्याची चाचपणी करण्यासाठी चादरीचे काही नमुने घेऊनच संरक्षणमंत्री श्री. पर्रीकर यांची भेट घेण्याचे या वेळी ठरले. पण रजईच्या बदल्यात चादर संरक्षण खात्याला मान्य होणे कठीण आहे. पण खासदार बनसोडे यांचे हे एक स्वप्न आहे.

केंद्रीय असो की राज्य शासनाच्या अखत्यारीतील रुग्णालये. तिथे हलक्या चादरी लागतात. पानिपत येथील लाइटवेट (कमी वजनाच्या) चादरींनी त्याची बाजारपेठ काबीज केलेली आहे. हरियाणातील काही उद्योजकांची मोठी लॉबीच दिल्लीत बसून काम करते. ती तोडणे शक्य आहे काय? या प्रश्नावर खासदार बनसोडे यांचे म्हणणे आहे, पंतप्रधान मोदी आता सर्व लॉबी मोडून काढत आहेत. अगदी जवळच्या मंत्र्यांकडून येणारे दलालही झुगारून लावत आहेत. त्यामुळे आपल्या प्रामाणिक प्रयत्नांना यश येईल.