आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्लॅटला दिले स्वप्नातल्या वाड्याचे रूप, सोलापूरच्या कल्पकतेला अव्वल पुरस्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - अंतर्गतगृह सजावटीत वातावरणनिर्मिती हा महत्त्वाचा घटक ठरतो. हल्ली आधुनिक वस्तूंचा देखावा घरात केला जातो. मात्र, या ट्रेंडला फाटा देत येथील विनय नारकर यांनी स्वत:च्या फ्लॅटमध्ये स्वप्नातला जुना वाडा साकारला आहे. त्यांच्या स्वप्नाला मूर्त रूप देण्याचे काम आर्किटेक्ट अमोल चाफळकर यांनी केले. छंद म्हणून कल्पकतेने केलेली ही कलाकृती देशपातळीवर अव्वल ठरली आहे. मुंबईच्या इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ आर्किटेक्ट्सतर्फे दोघांना केरळमध्ये सर्वोत्कृष्ट आर्किटेक्चरसाठी गौरवण्यात आले.

विनय यांचे वडील नाभीराज नारकर हे महापालिकेतून निवृत्त झाले आहेत, तर आई कुसुमश्री शिक्षिका होत्या. पत्नी श्रुताली वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक आहे. विधिज्ञ असलेल्या विनय यांना डिझाइनचा छंद आहे. त्यांनी साडी डिझाइन हे क्षेत्र निवडले आहे. विजापूर रोड भागात पलाश अपार्टमेंटमध्ये त्यांनी दोन फ्लॅट जोडून घेतले. घरात सर्वांचा विचार झाला आणि या फ्लॅटला वाड्याचा आकार देण्याचे त्यांनी ठरवले. आर्किटेक्ट चाफळकर यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली. पुरस्कारासाठी ५०० अर्ज आले होते. त्यातून रेसिडेन्शियल श्रेणीत नारकर यांच्या घराची निवड झाली.

कच्छच्या बाजारांतून भांडी, तीन वर्षे काम
घराच्या प्रवेशद्वारापासून प्रत्येक खोलीला ग्रामीण रूप देण्याचा प्रयत्न नारकर यांनी सातत्याने तीन वर्षे केला. भिंतींना आॅइल पेंटऐवजी शेण, डिंक, फेव्हिकाॅलच्या मिश्रणाचे लेप लावले आहेत. कापसाच्या गाद्या, त्यावर नारकर यांनी स्वत: डिझाइन केलेल्या कपड्यांचे आकर्षक अभ्रे, सुती पडदे, देशभरातून जमवलेल्या पेंटिंग्ज, कलात्मक वस्तू, पुस्तकांची अभिरुचीपूर्ण मांडणी त्यांनी केली आहे. वाडे, जुन्या इमारतींचे पाडकाम झाले तेथून दारे, खिडक्या, चौकटी, कमानी, पानपट्ट्या, खांब अशा वस्तू जमवल्या. कच्छ इतर शहरांतील जुन्या बाजारांतून माती, पितळ, तांब्याची भांडी आणून फ्लॅटमध्ये सजवण्यात आली आहेत.