आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौरदिव्यांच्या प्रकाशात रेल्वे हाॅस्पिटल, फताटेवाडी रस्ते, सांगोला स्टेशन उजळले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पर्यावरण रक्षणाच्या हेतूने मध्य रेल्वेतील सोलापूर रेल्वे विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सोलापूर रेल्वे स्थानकापासून किमीवर असलेल्या टिकेकरवाडी रेल्वे स्थानक सांगोला रेल्वे स्थानकाचे कामकाज सौरऊर्जेवर चालते. सोलापुरातील रेल्वे हॉस्पिटलचे तर संपूर्ण कामकाजच बसविण्यात आलेल्या सौर पॅनलवर चालत आहे. सौरऊर्जेच्या वापरामुळे रेल्वे प्रशासनास वीज बिल पूर्वीच्या तुलनेने कमी येत आहे. तर दुसरीकडे पर्यावरणाचे रक्षण होत आहे. त्यामुळे या स्थानकांस ग्रीन स्थानक म्हणून ओळखले जात आहे. मध्य रेल्वेत पहिले ग्रीन स्थानक हाेण्याचा मान टिकेकरवाडी रेल्वे स्थानकास मिळाला आहे. दक्षिण मध्य रेल्वेतही अशा प्रकारे ग्रीन स्थानक करण्यासाठी प्रयत्न केले जात असून नुकतीच तेथील अधिकाऱ्यांनी टिकेकरवाडीची पाहणी केली आहे. याशिवाय फताटेवाडी परिसरातही एनटीपीसीने सौर पथदिवे बसविल्याने विजेची बचत होत आहे.
टिकेकरवाडी प्रकल्प
मध्यरेल्वेत पहिले ग्रीन स्थानक होण्याचा मान टिकेकरवाडीला मिळाला. या स्थानकावर सौरऊर्जेचे १४ पॅनल बसविण्यात आले. या माध्यमातून रोज साडेतीन किलो वॅटची ऊर्जा तयार होते. तयार झालेल्या ऊर्जेतून स्थानकावरील बुकिंग यंत्रणा, फलाटावरील २५ ट्यूबलाइट, पाण्याचे बोअर मशिन, स्टेशन मॅनेजरचे कार्यालय अादींचे कामकाज चालते. पॅननला बॅटरी जोडली असल्याने दिवसभरात उर्जा तयार होते. त्याचा वापर रात्री होतो.

निगराणीसाठी खास पथकाची नेमणूक
सोलापूर रेल्वेसाठी सौरऊर्जेचा प्रकल्प हा महत्त्वाकांक्षी असल्याने याच्या निगराणीसाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. साैरऊर्जेसंबंधी कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण झाली तर ही टीम काम करते. सेक्शन इंजिनिअर गिरीश नरेगलकर कुलदीप वर्मा यांच्यासह संपूर्ण टीम सौरऊर्जेचे काम बघते.

रेल्वे हॉस्पिटलचे सर्व काम सौरवर
सोलापूर रेल्वे हॉस्पिटलचे काम सौरऊर्जेवर चालते. यासाठी ४६ पॅनल बसविण्यात आले. यातून दररोज १० िकलो वॅटची ऊर्जा तयार होते. यातून ऑपरेशन थिएटर, विद्युत उपकरणे, आयसीयूतील काही यंत्रणा सौरऊर्जेवरच चालते.

सांगोला स्थानकावर २५ पॅनल बसविले, स्थानकावर २४ तास असते वीज
सांगोला रेल्वे स्थानकावरचे कामकाज सुद्धा सौरऊर्जेवर होते. येथे २५ पॅनल बसविले आहेत. यातून रोज साडेचार किलो वॅटची ऊर्जा तयार होते. सांगोला रेल्वे स्थानकावर सर्वत्र १०० हून अधिक एलईडी लाइट बसविण्यात आले असून यासाठी सौरऊर्जेचा वापर केला जातो. स्थानकावरील स्टेशन मॅनेजरचे कार्यालय, बुकिंग यंत्रणा, फलाटावरील लाइट, वेटिंग हॉलमधील लाईट पंखा आदी उपकरणे सौरऊर्जेवरच चालतात.

अडीच किलोमीटर रस्त्यावर सौर ऊर्जेवरील पथदिवे
रामदास काटकर | सोलापूर, एनटीपीसीने फताटेवाडी परिसरात अडीच किलोमीटरच्या रस्त्यांवर सौर ऊर्जेवरील पथदिवे बसवून हा परिसर उजळवून टाकला अाहे. गेल्या वर्षभरापासून हा प्रकल्प यशस्वीपणे कार्यान्वित अाहे. त्यामुळे विजेच्या बचतीसह मेंटेनन्सचीही किटकिट राहिली नाही. फताटेवाडीजवळील रेल्वे क्रॉसिंग गेट ते एनटीपीसी प्रकल्प या दरम्यान अडीच किलोमीटरच्या रस्त्यावर सौरऊर्जेवरील दिवे लावण्यात आले आहेत. त्यामुळे अाता या रस्त्यावर रात्रीची वर्दळही वाढली आहे. रस्त्यावरून रात्री येणाऱ्या-जाणाऱ्यांची सोय झाली आहे. अडीच किमीच्या रस्त्यावर सौरऊर्जेवरील २१० दिवे बसविले आहेत. त्यात २० व्होल्टचे बल्ब आहेत. प्रत्येक विद्युत दिव्यामधील अंतर २० फूट ठेवले आहे. फताटेवाडी, अाहेरवाडी, होटगी या गावामध्ये सोलार ऊर्जेवरील ४२० व्होल्टचे हायमास्ट दिवे बसविले आहेत. दोन दिवसांचा बॅटरी बॅकअप अाहे. हे पथदिवे अाणि हायमास्ट दिवे उभारण्यासाठी ५८ लाख रुपये खर्च आला आहे.

प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न
^प्रदूषणाचा वाढतास्तर कमी करण्यासाठी सौरऊर्जेचा अधिकाधिक वापर झाला पाहिजे. रेल्वे प्रशासन जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे सौरऊर्जेचा वापर करत आहे. स्थानकानंतर आता लेेव्हल क्रॉसिंग गेटवर सौरऊर्जेचा वापर करण्यात येत आहे. यामुळे वीज बचतही होत आहे. व्ही. के. सिंग, वरिष्ठविभागीय विद्युत अभियंता, सोलापूर