आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॅटऱ्या दिवे चोरी असे प्रकार, प्रशासकीय निरुत्साहाची भर,

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ग्रामीण भागात लावलेल्या सौर पथदिव्यांना अवकळा आली आहे. निकृष्ट दर्जाच्या साहित्यांचा पुरवठा, बॅटऱ्या दिवे चोरी असे प्रकार आहेत. त्यात प्रशासकीय निरुत्साहाची भर आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणचे सौरदिवे त्यामधील बॅटऱ्या स्वघोषित पुढाऱ्यांनी स्वत:च्या वस्त्यांवर घरांमध्ये बसवले आहेत. कोट्यवधी रुपये खर्च होऊनही विकासाचा अंधार अाहे.
कृषी विभागाने मागील सहा वर्षांमध्ये सहा कोटींपेक्षा जास्त रुपयांचा खर्च केला आहे.
जिल्ह्यातील १०३० ग्रामपंचायतींपैकी काहींची आर्थिक स्थिती डबघाईस आलेली असून, विकासकामे ठप्प पडलेली आहेत. अनेक ग्रामपंचायतींकडे वीज कंपनीचे वीजबिल थकलेले आहे. त्या बिलात दिवाबत्तीचा मोठा वाटा आहे. सौरपथ दिव्यांच्या माध्यमातून वीजबिलांची कपात व्हावी यासाठी शासनाने योजना राबविली. पण, अनास्थेमुळे योजनाच काळोखली.

विजेची वाढती मागणी अन् उपलब्धतेमधील तफावत दूर करण्यासाठी २००९-१० मध्ये ग्रामपंचायत क्षेत्रात सौरदिवे लावण्याचा निर्णय घेण्यात आला. एका सौरपथ दिव्यासाठी केंद्र शासनाकडून नऊ हजार ६०० राज्य शासनाकडूनही तेवढेच अनुदान देण्यात आले. इतर लागणारा निधी ग्रामपंचायतींनी १३ व्या वित्त आयोग तरतुदी, स्वनिधी किंवा इतर उपलब्ध निधीतून खर्चास मंजुरी होती. दिवे बसविताना पाच वर्षे देखभालीची जबाबदारी संबंधित उत्पादकाची योजनेचे संनियंत्रण जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे (ग्रामपंचायत) होते.
जिल्हा परिषद कृषी विकास, समाजकल्याण ग्रामपंचायत विभागातर्फे जिल्ह्यात दरवर्षी किमान एक हजार सौरदिवे बसविण्यात आले. समाजकल्याण विभागातर्फे फक्त दलित वस्त्यांमध्ये सौर दिवे लावण्यात आले. तसेच, राज्य शासनातर्फे मंजूर करण्यात आलेल्या निधीतून सौरदिवे बसविण्यात आले. दलित वस्तीमध्ये दरवर्षी किमान पाचशे पेक्षा जास्त दिवे लावल्याची नोंद दप्तरी आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून कृषी विभागातर्फे गावोगावी पथदिवे बसविण्यात आले. निधी थेट तालुकास्तरावर पाठवून पंचायत समितीमार्फत सौरदिव्यांची खरेदी झाली.

चालू वर्षातील दिवे बसवत असताना गतसाली बसवलेले दिवे बंद अवस्थेत असल्याने “पुढे पाठ मागे सपाट’ अशी स्थिती या दिव्यांची झाली आहे. त्यावर खर्च केलेले हजारो रुपये अल्पावधीत वाया जात आहेत. हे दिवे बंद होण्यास ग्रामपंचायत दिवे बसवणाऱ्या पुरवठाधारकाची अनास्था कारणीभूत दिसते. योग्य देखभालीअभावी किरकोळ कारणांमुळे हे दिवे बंद होत असल्याने पर्यावरण रक्षणाच्या मूळ हेतूलाच सुरूंग लागला. शासनाची पर्यावरण संतुलित ग्रामसमृद्ध योजना प्रत्येक गावात राबविण्यात आली. त्यामध्ये सौर ऊर्जेस प्राधान्य देण्यासाठी गुणांकन होते. या योजनेमध्ये पुरस्कार मिळालेल्या रकमेतून काही भाग सौर ऊर्जेवर खर्च करणे बंधनकारक होते.

अक्कलकोटमध्ये नवे दिवे नाहीत
अक्कलकोट तालुक्यात कुरनूर धरणाच्या परिसरात बसविण्यात आलेले सौरदिवे बंद असून काहींच्या बॅटऱ्या सौरपॅनेल चोरीला गेलेत. गेल्या दोन वर्षांपासून तालुक्यात एकही नवीन सौरपथ दिवा बसविण्यात आला नसल्याचे गटविकास अधिकारी उत्तम वाघमोडे यांनी सांगितले.

पोलिसांकडे तक्रार करा
^जिल्हा परिषदेतर्फे सौरदिव्यांच्या खरेदीसाठी निधी दिला. ग्रामपंचायतींकडे हस्तांतरित झालेल्या त्या दिव्यांची जबाबदारी त्यांनी पाहावी. किरकोळ दुरुस्ती करण्याबरोबर अडचणी असल्यास संबंधित ठेकेदाराकडून दुरुस्ती करावी. दिवे चोरीला गेले असल्यास ग्रामपंचायतींनी पोलिसांकडे तक्रार करावी.” राजेंद्र अहिरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग

तातडीने बैठक घेऊ
^ग्रामीण भागात भार नियमनावर अडचणीवर मात करण्यासाठी सौरदिव्यांची चांगली योजना राबविण्यात आली. पण, त्याबाबतचा आढावा आम्ही घेतला नाही. कोट्यवधी रुपये खर्चूनही त्याचा फायदा होत नसल्यास आम्ही त्याबाबतचा तातडीने विशेष बैठक घेऊन तपासणी करू.” पोपटबनसोडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

मंगळवेढ्यातील पथदिवे भंगारात
मंगळ वेढा तालुक्यात बसविण्यात आलेल्या अनेक साैरदिव्यांचा थांगपत्ताच नाही. काहींच्या बॅटऱ्या, बल्ब सौरपॅनेलची चोरी झाली. सौरपथ दिव्यांचे खांब भंगारात पडले असून प्रशासकीय अनास्थेमुळे तालुक्यात चांगल्या योजनेला हरताळ फासला आहे. आंधळगाव येथील शिंदे वस्तीवर समाजकल्याणमार्फत आठ सौर दिवे लावले होते. ते सर्व दिवे बंद आहेत. तसेच गोणेवाडी येथील पाच, मरवडेतील नऊ, सिद्धापूर येथील चार, ब्रह्मपुरी येथील तीन दिवे बंद आहेत. बार्शी तालुक्यात बसविण्यात आलेले साैरदिवे दोन ते तीन महिन्यांमध्येच बंद पडले.

बहुतांश सौरदिवे बंदच
गावोगावी बसविण्यात आलेले बहुतांश दिवे बंद अवस्थेत आहेत. गेल्यावर्षी वेगळाच पुरवठादार, तर चालू वर्षी वेगळ्याच पुरवठादाराला हे काम दिले गेले आहे. प्रशासकीय अधिकारी पदाधिकाऱ्यांनी मर्जीतल्या ठेकेदारास कामाचे कंत्राट देण्यासाठी केलेल्या खटाटोपांची अनेकदा चर्चा रंगली. ठेकेदाराने पुरवठा केलेले ‘दिवे’ लागले का? याकडे मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांची डोळेझाक होत आहे. यामुळे विकास योजनेचा अंधार झाला.

योजनेचा आढावा घेणे गरजेचे
पैशाच्या अपव्ययाबरोबरच चांगल्या उद्देशालाही सुरूंग लागत आहे. या योजनेचा आढावा घेऊन प्रत्येक गावात किती दिवे बसवले, चालू किती, चोरीस गेलेले साहित्य किती आदींचा आढावा घेणे गरजेचे आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी गटविकास अधिकाऱ्यांनी केलेल्या सोईस्कर दुर्लक्षाबरोबर पदाधिकाऱ्यांची अनास्था यास कारणीभूत आहे.


दिव्यांची संख्या साहित्य चोरीस
सौर दिव्यांमध्ये सुरुवातीस एलईडी प्रकारातील बल्ब, तर आता सीएफएलचे बल्ब असणारे दिवे आहेत. सौर पॅनलद्वारे सौर ऊर्जा घेऊन ती साठवण्यासाठी खांबाच्या मधोमध बॉक्समध्ये बॅटरी आहे. या बॅटरीमधे डिस्टिलरीचे पाणी टाकणे गरजेचे असते; पण या पाण्याअभावी बॅटऱ्या खराब होऊन बंद आहेत. काही ठिकाणी या बॅटऱ्यांच्या बॉक्सला कुलूप नसल्याने चोरट्यांनी डल्ला मारून अनेक ठिकाणच्या बॅटऱ्या गायब केल्या आहेत. पुरवठादार एजन्सीचा कर्मचारी दिवे बसवून गेल्यानंतर देखभालीसाठी कानाडोळा तसेच ग्रामपंचायतींच्या अनास्थेमुळे हे दिवे बसवल्यानंतर सहा महिन्यांपर्यंत ठीकठाक चालून नंतर बंद पडतात अथवा बॅटऱ्या चोरीस जातात.

समन्वयच नाही
दिवे खरेदीसाठी जिल्हा परिषदेने निधी दिला. पंचायत समितीतर्फे खरेदी झाली. बसवणे आणि दिव्यांची देखभाल दुरुस्ती ग्रामपंचायतींनी करावी, हे धोरण त्यामधील समन्वयाच्या अभावामुळे योजनेला घरघर लागली. वरिष्ठ पातळीवर टक्केवारी ठरते. आम्ही फक्त सांभाळ करायचा का? या ग्रामपंचायतीची मानसिकताही त्यास कारणीभूत आहे.

सौरदिवे देखभाल नसल्याने बंद
^दामाजीनगरग्रामपंचायतीचे एकूण २४ पथदिवे आहेत. त्यापैकी दहा दिवे बंद असून देखभाल नसल्याने बंद आहेत. तत्काळ दुरुस्त होणे गरजेचे आहे. सौरदिव्यांची गुणवत्ता तपासणे आवश्यकच आहे.” दिलीप वाडेकर, सामाजिक कार्यकर्ते, दामाजीनगर, मंगळवेढा
बातम्या आणखी आहेत...