आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोधक : कचरा मक्ता रद्दच करा! सत्ताधारी : दुरुस्तीत त्रुटी दूर करू...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरातील घनकचरा संकलन करणाऱ्या कंपनीचा मक्ताच रद्द करा, अशी मागणी भाजपा-शिवसेना आणि बसपच्या नगरसेवकांनी केली. महापालिका स्थायी समितीच्या सभेत त्यांनी ही भूमिका मांडली. सत्ताधारी काँग्रेसने मात्र हा मक्ता देताना काही त्रुटी राहिल्याचे सांगत, फेरदुरुस्त करण्याचा प्रस्ताव पुढे केला.
सोमवारी सायंकाळी स्थायीची सभा झाली. तीत स्थायी सभेस उशिरा येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पगारातून २५ रुपये तर गैरहजर असणाऱ्याच्या पगारातून १०० रुपये दंड म्हणून वसूल करण्याचेही ठरले. अन्य १७ विषय सोडले तर केवळ घनकचरा व्यवस्थापन या विषयावर बराच रणकंदन झाला. घराघरातून कचरा गोळा करणे, वाहतूक करण्याचा मक्ता यशश्री एंटरप्रायझेसला देण्यात आला. तो खूप अल्प किमतीत दिला गेला. त्यावेळी शहर अजून स्वच्छ दिसत होते. घराघरापर्यंत घंटागाड्या जाऊन कचऱ्याचे संकलन व्हायचे. आता नव्याने देण्यात आलेल्या मक्तेदाराला पैसे जास्त देऊनही शहर स्वच्छ दिसत नाही, अशी मते विरोधी पक्षांनी मांडली.

सत्ताधारी अाणि विरोधकांत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्या तरी शहर स्वच्छतेच्या मूळ प्रश्नावर अद्याप तोडगा नाही. काही भागात अद्यापही दिवाळीचा कचरा जशाच्या तसाच आहे. त्याची विल्हेवाट लावणार कोण, अशी विचारणा नागरिकांतून होत अाहे.

हा तर खिसे भरण्याचा प्रकार : बसप नगरसेवक चंदनशिवेंचा थेट घाला
प्रतिटनकचऱ्याला १६९० रुपये देऊनही कामात त्रुटी आहेत. हा स्वच्छतेचा विषय नाही. खिसे भरण्याचा प्रकार असल्याची टीका बसपचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी केली. त्यावर उत्तर देताना स्थायीचे सभापती रियाज हुंडेकरी म्हणाले, “मुळात हा मक्ता सादर करताना यात त्रुटी आहेत असे निरीक्षकांनी सांगितले होते. १५ टक्के सेवाकरासह याची रक्कम देण्यात आली. हे चुकीचे आहे. सरकारी नियमानुसार यास सेवाकर लागू होत नाही. त्यामुळे चार दिवसांनी परत हा प्रस्ताव दुरुस्त करून येणे अपेक्षित अाहे.”

कामगार नेत्यांची घोषणाबाजी
स्थायीच्या सभेत हे रणकंदन सुरू असतानाच, बाहेर कामगार नेते अशोक जानराव जोरदार घोषणाबाजी करत होते. ‘दिलेला मक्ता रद्द करा’ असा नारा त्यांनी दिला. त्यानंतर स्थायी सभेत येऊन त्यांनी सभापतींसमोर म्हणणेही मांडले. एकूण गोंधळात मक्ता रद्द करा, ही मागणी केंद्रस्थानी होते. परंतु सत्ताधारी काँग्रेस मात्र सारवासारव करण्याच्या भूमिकेत होते. पदाधिकारी आणि विरोधकांतील ही स्थिती असताना, मूळ शहर स्वच्छतेकडे मात्र दुर्लक्षच होत आहे. दिवाळीनंतरचा कचरा अद्यापही काही ठिकाणी तसाच पडून आहे.
बातम्या आणखी आहेत...