आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solspur Municipal Collect Garbage Now Smart Container

कचरा गोळा करण्यासाठी मनपाचे आता स्मार्ट कंटेनर, आरोग्य विभागाचे प्रयत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सोलापूरशहराचे नाव स्मार्ट सिटीच्या यादीत समाविष्ट झाल्यानंतर महापालिकेतर्फे शहर स्वच्छ करण्यास स्मार्ट प्रयत्न करण्यात येत आहे. आता शहरातील सोसायटी, नगरातील कचरा गोळा करण्यास १.१ मीटर आकाराचे छोटे कंटेनर प्रभागनिहाय वाटप केले जाणार आहेत. याकरिता २८५ छोटे कंटेनर मागवण्यात आले आहेत. नागरिकांनी स्वच्छ सोलापूरसाठी सहकार्य करणे अपेक्षित आहे.

शहरात कुठेही कचरा पडू नये यासाठी महापालिकेकडून असे प्रयत्न करण्यात येत आहेत. शहरात १२०० ठिकाणी कचरा टाकण्याची व्यवस्था(कचराकुंडी) करण्यात आलेली आहे. पूर्वी सिमेंट कॉँक्रिटची कचराकुंडी होती. या कचराकुंडीतून कचरा उचलताना त्रास होत होता. कचराकुंडी तुटत होत्या. त्यानंतर लोखंडी कचराकुंडी आल्या. त्याला कंटेनर संबोधण्यात येते. २०१४ ते २०१५ या काळात २०७ कंटेनर मागवण्यात आले होते. हे कंटेनर मोठे होते. मात्र कंटेनर बसवताना सिमेंट कट्टे बांधले गेले नाहीत. त्यामुळे पाणी लागून कंटेनर खालच्या बाजूला खराब झाले.
नव्या कंटेनरला चाके असल्याने ते एका ठिकाणाहून दुसरीकडे हलवता येईल.

झोननिहाय होणार वाटप
मोठ्याकंटेनरला पर्याय म्हणून छोटे कंटेनर मागवण्यात येत आहेत. छोटे कंटेनर सोलापुरातच तयार होत असून पहिल्या टप्प्यात १५० कंटेनर उपलब्ध होणार आहेत. या कंटेनरचे प्रभागनिहाय वाटप होणार आहे. या कंटेनरला खाली चाके लावण्यात आली आहेत. यामुळे खालून ते खराब होणार नाही. तसेच एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवण्यास ते सोपे जाणार आहे. या कंटेनरची कचरा साठवणूक क्षमता सुमारे ३५० ते ४०० किलो आहे. याचे वजन १४० किलो असून १९,९८५ इतकी किंमत आहे.

नागरिकांनी सहकार्य करावे
सध्या१५० छोटे कंटेनर येत असून त्याचे वाटप झोननिहाय केले जात आहेत. प्रत्येक झोनला २० दिल्यानंतर प्रभागास तीन कंटेनर मिळतील. ज्या ठिकाणी अंत्यत गरज आहे आणि जेथे कचरा साचला जात आहे, अशा ठिकाणीच हे छोटे कंटेनर ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी कचरा कंटेनरमध्ये टाकून सहकार्य करावे. प्रदीपसाठे, उपायुक्त, महापालिका