आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'शिकार, कीटकनाशकांच्या वापरामुळे पाखरांना ‘माहेर’घरीच ‘सासूरवास’!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूरच्या सभोवताली असलेल्या पाणवठ्यांवर दरवर्षी हजारोंच्या संख्येने स्थलांतरीत पक्षी येतात. ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ (कै.) सलीम अली यांनी सोलापूरला स्थलांतरित पक्ष्यांचे माहेरघर अशी उपाधी दिली. पण, गेल्या काही वर्षांपासून स्थानिक स्थलांतरीत पक्ष्यांच्या शिकारी मोठ्या प्रमाणावर होत अाहेत. पक्षी प्रेमींनी अनेक शिकाऱ्यांना पकडून वनविभागाकडे दिले. पण, माफीनामा घेऊन त्यांना सोडण्यात येते. पिकांवर फवारलेल्या कीटकनाशकांमुळे गेल्यावर्षी चार सायबेरियन क्रौंच पक्षी मृत्युमुखी पडले. द्राक्षबागांच्या संरक्षित जाळ्यांमध्ये अडकून अनेक पक्षी मृत्युमुखी पडतात. शिकाऱ्यांच्या वाढत्या उच्छादामुळे पाखरांचे माहेरघर असुरक्षित झाले आहे.
झूलॉजिकल सोसायटी ऑफ लंडन तसेच येल युनिव्हर्सिटी यांच्या वतीने अहवाल जारी करण्यात आला आहे की, २०५० पर्यंत हजारापेक्षा जास्त पक्ष्यांच्या जाती नष्ट होतील. यात सर्वात जास्त पीडित पक्ष्यांच्या जाती १०० असून पैकी १५ जाती भारतातील आहेत. बदलत्या जलवायुप्रमाणेच मानवी हस्तक्षेपामुळे पक्ष्यांच्या अस्तित्वावर धोक्याची सावली आहे. या सुंदर जीवांच्या १२८ प्रजाती अगोदरच लुप्त झाल्या आहेत. या पक्ष्यांना जर योग्य वातावरण उपलब्ध करून दिले नाही तर येणाऱ्या १०० वर्षात या प्रजातींच्या १२ टक्के म्हणजे ११८३ प्रजाती पूर्णपणे नष्ट होतील, असा भीती व्यक्त होतेय.

पक्ष्यांची नावे मराठीत
लोकांच्यामनामध्ये पक्ष्यांची आेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत पक्ष्यांची प्रचलित नावे प्रसिद्ध करण्यात आलीत. शास्त्रीय नाव किचकट असल्याने लोकांना त्याची गोडी वाटत नाही. बीएनएचएस महाराष्ट्र पक्षीमित्र मंडळाने त्यासाठी विशेष पुढाकार घेतला. ५७७ पेक्षा जास्त पक्ष्यांची मराठीतील नावे प्रसिद्धी केली.

५० प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर
^महाराष्ट्रातील एकूण५४० पैकी ५० प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. यात स्थानिक प्रजातींप्रमाणेच इतर प्रदेशातून स्थलांतर करून भारतात येणारे सायबेरियन क्रोंच, पिंक हेडेड डक (गुलाबी डोक्याचे बदक), जर्डस कोर्सर या तीन प्रजातींचाही समावेश आहे. तर, प्रसिद्ध माळढोक, तणमोर, सारस या पक्ष्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे. -डॉ. राजू कसांबे, पक्षी अभ्यासक

पक्षी पर्यटन प्रस्तावास हवी मंजुरी
^अधिवास असलेल्या प्रसिद्ध ठिकाणी आढळणारे बहुतांश पक्षी सोलापूर परिसरातील पाणवठ्यांवर आढळतात. पक्षी पर्यटनाचे उत्कृष्ट ठिकाण अशी सोलापूरची ओळख वाढविण्यासाठी पक्षी पर्यटन केेंद्राबाबतचा प्रस्ताव तयार केला आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी तो शासनाकडे सादर केला. त्याच्या पाठपुराव्याची गरज असून तसे झाल्यास सोलापूरच्या वैभवात भर पडेल. -डॉ. व्यंकटेश मेतन, पक्षीमित्र, सोलापूर

बार्न शॅलो, वायरटेल शॅलो, रेड रम्पड् शॅलो, हाऊस मार्टीन हे पक्षी आफ्रिका खंडातून येतात. सोलापूर जिल्ह्यात ऑक्टोबर ते फेब्रुवारी दरम्यान आढळतात. आकाराने लहान असूनसुद्धा संपूर्ण हिंदी महारासागर आेलांडून ते येतात, हे विशेष.

भर उन्हाळ्यात दिसणारा गोल्डन आेरिआेल (हळद्या) हा पक्षी युरोप खंडातून येतो.
युरोपियन रोलर (नीळकंठ) हा वीणीच्या हंगामात (सप्टेंबर -ऑक्टोबर) युरोपमधून आफिक्रा खंडात जातो. परतीच्या वेळेत (नोव्हेंबर दरम्यान) तो दहा ते पंधरा दिवसांपुरतेच सोलापूर परिसरातही दिसतात.

फक्त समुद्र परिसरातील दलदलीत आढळणारे रिफ इग्रेट (समुद्री बगळा) हा पक्षी गेल्यावर्षी पहिल्यांदाच सोलापुरातील पाणथळावर आढळला. हा पक्षी युरोप खंडातून स्थलांतरित होतो.
अमुर फालकन (अमूर ससाणा) हा चीन रशियाच्या सीमेवरील अमूर नावाच्या नदीकाठावर याचा विणीचा हंगाम असतो. हिवाळ्यात तिकडून तो दक्षिण भारतात येतो. पुढे आफ्रिकेपर्यंत जातो. गेल्या काही वर्षांपासून सोलापुरातील पाणवठ्यावर त्यांचा अधिवास अाहे.

बारहे डेड गीज : हे पक्षी मध्य आशिया आफ्रिका खंडातून येतात. काळा- पांढरा रंग, डोक्यावर काळ्या रंगाची रेष असते. सर्वात उंचावरून हे पक्षी उडतात. पाणथळ भागातील किडे हे यांचे प्रमुख खाद्य.

दमझाएल क्रेन (कांडया करकोचा) : तेलबिया खाण्यासाठी हे प्रामुख्याने आपल्याकडे हे पक्षी येतात. तब्बल चार ते साडेचार फूट उंचीचा पक्षी ताकदवान असतो.
बातम्या आणखी आहेत...