मोहोळ - भरधाव वेगात असलेल्या छोटा हत्ती गाडीने गुरुवारी राज्य राखीव पोलिस दलातील कर्मचाऱ्याचा बळी घेतला. दुचाकीला समोरासमोर धडक दिल्याने झालेल्या अपघातात कुरुल येथील भारत कृष्णदेव पाटील (30) यांनी प्राण गमावले. ही घटना कामती खुर्द ते शिंगोली रोडवर व्होनमाने वस्तीजवळ पहाटे 5.30 दरम्यान घडली.
कामती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुरुल येथील भारत कृष्णदेव पाटील हे सोलापूर येथील राज्य राखीव पोलीस दल क्र-१० मध्ये कार्यरत होते. सुट्टी असल्याने ते गावी आले होते. गुरुवारी कामावर जाण्यासाठी दुचाकीने ते पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान सोलापूरकडे निघाले. कामती खुर्द ते शिंगोली रोडवर व्होनमाने वस्तीजवळ आले असता 5.30 दरम्यान सोलापूरकडून कामतीकडे चुकीच्या बाजुने भरधाव वेगात येणाऱ्या एम.एच. 45-7588 या छोटा हत्ती चारचाकी गाडीने त्यांना समोरून धडक दिली. पाटील यांना या वाहनाने लांबवर फरफटत नेल्याने त्यांना गंभीर मार लागला. कामती पोलीस व स्थानिक नागरिकांनी त्यांना उपचारासाठी तात्काळ सोलापूर येथिल शासकीय रुग्णालयात नेले. त्यांना पुढील उपचारासाठी अश्विनी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पाटील यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे.
भरधाव वेग
माल वाहतूक करणारी ही गाडी एवढ्या भरधाव वेगात होता की, अपघातानंतर ही गाडी रोड सोडून खाली चारीत घसरली होती. मयत भारत पाटील यांच्यावर मुळगाव कुरुल येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)