आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिसाद नसल्याने एसटीची अश्वमेध सेवा बंद, महिन्यातच बंद पडली मुंबई ते हैदराबाद सेवा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सध्या रेल्वेचा उन्हाळी हंगाम असल्याने सोलापूर स्थानकावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना दोन ते तीन महिन्यांचे वेटिंग आहे. तर दुसरीकडे सर्वसामान्य प्रवाशांसाठी महत्त्वाची ठरणारी एसटीची अश्वमेध शिवनेरी वातानुकूलित गाड्यांची सेवा प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने बंद करण्याची वेळ आली आहे.
महाराष्ट्राची जीवनरेखा समजली जाणारी एसटी नवनव्या सुविधा घेऊन प्रवाशांच्या सेवेत रुजू होऊ पाहत आहे. परंतु यास फारसा प्रतिसाद लाभत नसल्याने अश्वमेध शिवनेरीसारख्या महत्त्वाच्या गाड्या बंद करण्याची नामुष्की एसटी प्रशासनावर ओढावली आहे. १४ जानेवारी रोजी सुरू झालेली मुंबई -हैदराबाद व्हाया सोलापूर धावणारी अश्वमेध एसटी १६ फेब्रुवारीला बंद झाली. अवघ्या एक महिन्यातच सेवा बंद झाली. सोलापूर ते पुणे दरम्यान दिवसातून तीन फेऱ्या करणारी शिवनेरीदेखील अल्प प्रतिसाद लाभल्याने तोट्यात गेली आहे. त्यामुळे शिवनेरीने सोलापूर ते पुणे दरम्यान दोन फेऱ्या बंद करण्याचा निर्णय घेतला. आता सकाळची एकच फेरी सुरू आहे.

प्रवाशांना चांगली सेवा मिळावी, वातानुकूलित गाडीतून प्रवास व्हावा, प्रवासात मोफत वाय फाय सेवेचा लाभ घेता यावा म्हणून एसटी प्रशासनाने कोट्यवधी रुपये खर्चून या गाड्यांची निर्मिती केली. मात्र त्यास सोलापुरात अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.

^अन्य गाड्यांच्यातुलनेने अश्वमेध शिवनेरीसारख्या गाड्यांचे तिकीट दर खूप जास्त आहेत. प्रवासी सुविधा जास्त असल्या तरी प्रशासनाने अशा गाड्यांचे दर आणखी कमी करणे गरजेचे आहे. तिकीट दर कमी केल्यास गाड्यांना चांगला प्रतिसाद लाभेल. संजय पाटील, अध्यक्ष,प्रवासी सेवा संघ.सोलापूर

गाड्या बंद पडण्यामागची कारणे
अन्य गाड्यांच्या तुलनेने सुविधा जास्त असल्याने तिकीट दरही जास्त होते. अश्वमेधचा प्रवासी रात्रीचा असल्याने रात्रीच्या रातराणीचे अतिरिक्त दर याला लागू होते. त्यामुळे तिकीट दर आणखीनच वाढले. परिणामी प्रवाशांनी पाठ फिरवली.

तिकीट दर असे
अश्वमेध: मुुंबईते हैदराबाद एकूण १७३४ रुपये, मुंबई ते सोलापूर ११०६ रुपये तर सोलापूर ते हैदराबाद ६२८ रुपये. साध्या एसटीस सोलापूर ते मुंबई ५२२ रुपये, सोलापूर ते हैदराबाद निमआराम ३७७ रुपये असा दर आहे. दरात मोठी तफावत असल्यानेच प्रवाशांनी पाठ फिरवली आहे.

^एसटीची सेवानियमितपणे सुरू राहण्यासाठी त्याचे भारमान चांगले असणे महत्त्वाचे आहे. सोलापूरकरांचा अश्वमेध शिवनेरीस अपेक्षेपेक्षा खूप कमी प्रतिसाद राहिला. काही काळ तोटा सहन करूनही सेवा सुरू ठेवली. मात्र, भारमान काही केल्या वाढेना. तेव्हा मध्यवर्ती कार्यालयाकडून सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. रा.गं. महाजन, विभागीयवाहतूक अधिकारी, सोलापूर विभाग राज्य परिवहन