आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटी सेवा ठप्प; स्थानकातून प्रथमच धावली खासगी वाहने, ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - वेतनवाढ निश्चिती सातवा वेतन आयोग लागू करावा या प्रमुख मागण्यांच्या पूर्ततेसाठी मंगळवारी महाराष्ट्र एसटी कर्मचारी आयोग संयुक्त कृती समितीने राज्यव्यापी संप पुकारला. सोलापुरातदेखील संपाला १०० टक्के पाठिंबा मिळाला. 

सोलापूर स्थानकावरून रोज ११८१ एसटी गाड्यांची वाहतूक होते. मंगळवारी एकही एसटी स्थानकातून बाहेर पडली नाही. विभागातून केवळ पाच गाड्या धावल्या. संपामुळे प्रवाशांचे हाल झाले. आरटीओ पोलिसांनी खासगी बसेसची उपलब्धता करून संपाची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न केला. बस स्थानकाच्या बाहेर उभारलेल्या वाहनांतून खासगी वाहतूक मोठ्या प्रमाणात झाली. 
 
कृती समितीने ४१ दिवसांपूर्वी राज्य सरकारला संपाची नोटीस दिली होती. त्याची फारशी दखल घेतली गेली नाही. परिणामी सोमवारी मध्यरात्रीपासून संपाला सुरुवात झाली. दिवाळीच्या काळात संप सुरू झाल्याने गावांकडे परतणाऱ्या प्रवाशांना याचा सर्वाधिक फटका बसला. 
एरवी प्रवासी गाड्यांची गजबज असलेल्या सोलापूरच्या बसस्थानकावर मंगळवारी मात्र शुकशुकाट जाणवत होता. विभागातून १३९१ गाड्यांपैकी केवळ पाच गाड्या धावल्या. यात सांगोला -घेरडी, सांगोला -चडचण , मंगळवेढा -बठाण, मंगळवेढा - पंढरपूर मंगळवेढा - सोलापूर या गाड्यांचा समावेश होता. 
 
१५ ते २० हजार प्रवाशांना आपले घर गाठता आले 
बस स्थानकावर अडकून पडलेल्या प्रवाशांची सोय व्हावी याकरिता आरटीओ पोलिसांनी खासगी वाहने, एसएमटी बस, रिक्षा, मिनी बस आदींची मोठ्या प्रमाणात व्यवस्था केली. हैदराबाद, पुणे, उमरगा आदी शहरांकडे महामार्गावरून जाणाऱ्या ट्रॅव्हल्स गाड्यांना सोलापूर बसस्थानकावर आणण्यात आले. संबंधित शहराला जाणाऱ्या प्रवाशांनी या ट्रॅव्हल्स गाडीतून प्रवास केला. मोहोळ, पंढरपूर, अक्कलकोटला जाणाऱ्या प्रवाशांसाठी ट्रॅक्स, क्रुझरची सोय करण्यात आली. पर्यायी व्यवस्थेमुळे सुमारे पंधरा ते वीस हजार प्रवाशांना आपले घर गाठता आले. यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांच्यासह आरटीओचे कर्मचारी, पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्यासह सुमारे ५० पोलिसांचा फाैजफाटा उपस्थित होता. 
 
बसला ८० लाखांचा फटका 
सोलापूरबस स्थानकावरून रोज ११८१ गाड्यांची ये जा होते. यात कर्नाटक आंध्र प्रदेशमधून येणाऱ्या गाड्यांचाही समावेश आहे. संपामुळे मंगळवारी मंगळवेढा - सोलापूर वगळता एकही एसटी दाखल झालेली नाही. सोलापूर बसस्थानकावरून झालेल्या वाहतुकीतून एसटी प्रशासनाला सुमारे ६० लाखांचे उत्पन्न मिळते. दिवाळीच्या काळात मात्र हा आकडा ८० लाखांच्या घरात पोहचतो. त्यामुळे दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सोलापूर एसटीला किमान ७० ते ८० लाखांचा फटका बसला. 
 
संप शांततेत सुरू 
संपात जवळपास ४५०० कर्मचारी सहभागी झाले.परिणामी एकही एसटी सोलापूर स्थानकाच्या बाहेर पडली नाही. संप शांततेत सुरू आहे. सोलापूर विभागात कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. 
- रमाकांत गायकवाड, विभाग नियंत्रक, सोलापूर 
 
पोलिस आयुक्तांनी केली पाहणी 
संपावेळी सोलापूर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी बस स्थानकावर कडक बंदाेबस्त ठेवला होता. सायंकाळी सातच्या सुमारास पोलिस आयुक्त महादवे तांबडे अन्य पोलिस अधिकाऱ्यांनी बस स्थानकावरील स्थितीचा आढावा घेतला. 
बातम्या आणखी आहेत...