आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलर फिडर बसवण्यास सोलापुरातून सुरुवात, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेतकऱ्याने कूपनलिका पुनर्भरणाची माहिती दिली, मुख्यमंत्र्यांनी ती रेकॉर्ड करायला लावली - Divya Marathi
शेतकऱ्याने कूपनलिका पुनर्भरणाची माहिती दिली, मुख्यमंत्र्यांनी ती रेकॉर्ड करायला लावली
सोलापूर- शेतकऱ्यांनी गटशेती करावी, यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी २०० कोटींची तरतूद केली अाहे. गटशेती करणाऱ्या शेतकऱ्यास शासन संपूर्ण मदत करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी सोलर फिडर बसवणार अाहे. त्याची सुरुवात सोलापुरात करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. बुधवारी (दि. २४) दुपारी नांदणी (ता. दक्षिण सोलापूर) येथे कृषी विभागाने राबवलेल्या जलयुक्त शिवार योजनेतील कामांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. 

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोमेश्वर स्वामी यांच्या कूपनलिका पुनर्भरण मुत्तण्णा बंडे यांचे शेततळे गांडूळ खत प्रकल्पाची पाहणी केली. तसेच कम्पार्टमेंट बंडिंगची कामेही पाहिली. शेतकऱ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘दुष्काळी स्थिती पाण्याची कमतरता लक्षात घेता शेतकऱ्यांनी गटशेती करण्याची गरज आहे. कमी जमीन पाणी असताना चांगले काम करता येईल. शेतकऱ्यांनी गटशेतीकडे वळावे, यासाठी शासन सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे.’ 

मुरमाड जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना शेततळ्याचे अनुदान वाढवून देण्याची मागणी केली. त्यावर विचार करू, असे सांगितेल. तसेच विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने सोलर फिडर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विजेचा प्रश्न सुटेल. त्याचा शेतकऱ्याला फायदा होईल, असेही म्हटले. कृषी संजीवनी विकास शेतकरी गटाचे अध्यक्ष संजय देवकते, सचिव नागनाथ धानगोंडे, माजी सरपंच पांडुरंग टेळे, शिवानंद बंडे, नागण्णा बनसोडे यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. 

पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी नांदणी गावाजवळील पाझर तलावाच्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली. या तलावामुळे गावचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. या वेळी माजी सरपंच चिदानंद सुरवसे, उपसरपंच शिवानंद शिवशरण यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. तसेच वनविभागाच्या कामांची पाहणी केली. 

मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकला ठणकावले 
देशातजय महाराष्ट्र म्हणायला कोणीही अडवू शकत नाही. हा आमचा घटनात्मक अधिकार आहे. कर्नाटकच्या मंत्र्यांनी केलेल्या विधानाचा निषेध करतो, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकला खडसावले. अशा वक्तव्यामुळे देशातील वातावरण खराब होणार आहे. याबद्दल आम्ही नाराजी व्यक्त करू. तसेच, केंद्र सरकारलाही कळवू, असेही मुख्यमंत्री फडणवीस सांगोला तालुक्यात सांगितले.
 
नांदणी येथील कार्यक्रमात सोमेश्वर स्वामी यांनी कूपनलिका पुनर्भरणाचे काम चांगले झाल्याचे सांगितले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी स्वामींकडेे पुनर्भरणाची चांगली माहिती आहे. त्यांच्या बोलण्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याची सूचना केली. रेकॉर्डिंग पूर्ण होईपर्यंत स्वामी यांनी दिलेली माहिती मुख्यमंत्र्यांनी ऐकून घेतली. 
बातम्या आणखी आहेत...