सोलापूर - ग्रामदैवतश्री सिद्धेश्वर यात्रेस बुधवापासून प्रारंभ होत अाहे. ११ ते १६ जानेवारी दरम्यान ६८ लिंगांना यण्णीमज्जन, अक्षता सोहळा, अग्निहोम प्रदीपन, शोभेचे दारूकाम यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात राहील. नंदीध्वज मिरवणूक मार्गावरील वाहतूक मार्गात बदल करण्यात येणार आहे. एकूण तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार अाहे. सीसीटीव्हीची नजर, नऊ वाॅच टाॅवर, फिक्स पाॅइंट नेमल्याची माहिती पोलिस उपायुक्त अपर्णा गीते यांनी दिली.
दोन उपायुक्त, सात सहायक अायुक्त, २९ निरीक्षक, ७४ सहायक निरीक्षक, फौजदार, १२९८ पोलिस तर ११६ महिला पोलिस अाहेत. ५०० होमगार्ड, एक राज्य राखीव दलाची तुकडी नेमण्यात अाली अाहे. १९ ठिकाणी फिक्स पाॅइंट राहतील. बाहेरील जिल्ह्यातून ३०० पोलिस अधिकारी कर्मचारी येणार अाहेत.
मिरवणूकमार्गावर वाहनांना बंदी : नंदीध्वजमिरवणूक मार्ग - हिरेहब्बू वाडा, बाबा कादरी मशिद, अॅड. केळकर घर, दाते गणपती मंदिर, खाटीक मशिद, कसबा चौक, माणिक चौक, विजापूर वेस, पंचकट्टा, रिपन हाॅल ते सिद्धेश्वर मंदिर संमती कट्टा. मिरवणूक पुढे गेल्यानंतर काही वेळाने वाहतूक सुरू राहील.
नोपार्किंग झोन : १२ते १६ जानेवारी या दरम्यान, सिद्धेश्वर मंदिर परिसर, मल्लिकार्जुन मंदिर, संमती कट्टा, रेवणसिद्धेश्वर मंदिर भागात नो पार्किंग झोन अाहे.
वाहनांनाबंदी राहील : १२ते २६ जानेवारी या दरम्यान, विजापूर वेस, लक्ष्मी मार्केट, पंचकट्टा, ट्रेझरी शाखा, मार्केट पोलिस चौकी या मार्गावरून होम मैदानावर येणारी वाहतूक अडवण्यात अाली अाहे. पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे अावाहन पोलिस अायुक्त रवींद्र सेनगावकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली अाहे.
ग्रामदैवतश्री सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेनिमित्त विविध धार्मिक विधींना सुरुवात झाली आहे. त्याच्या सविस्तर माहिती नंदीध्वज मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
१० जानेवारी रोजी योगदंड पूजन हा महत्त्वाचा विधी असून, शुक्रवार पेठेतील शेटेवाड्यात अॅड. रितेश थोबडे अॅड. महेश थोबडे यांच्या हस्ते पूजनाचा कार्यक्रम होत आहे. तसेच ११ जानेवारीला मध्यरात्री सव्वाबारा वाजता शिवानंद हिरेहब्बू यांच्या वाड्यात मानाच्या पहिल्या दुसऱ्या नंदीध्वजास साज चढवण्याचा कार्यक्रम होईल. १२ जानेवारीला सकाळी आठ वाजता हिरेहब्बू वाड्याजवळ सर्वच नंदीध्वजांचे पूजन होत आहे. तेथून हे नंदीध्वज तैलाभिषेक करण्यासाठी निघणार आहे. याचदिवशी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ सरकारी आहेर करण्यात येणार आहे.
१३ जानेवारी रोजी सकाळी सात वाजता बाळीवेस येथून नंदीध्वज निघत असून, संमती कट्ट्याजवळ दुपारी एकच्या सुमारास अक्षता सोहळा होणार आहे. १४ जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता हिरेहब्बू देशमुख यांच्या हस्ते पूजा होऊन सगळ्याच नंदीध्वजांना करमुटगी लावून तलावातील पाण्याने स्नान घातले जाते. सायंकाळी पाच वाजता जुनी फौजदार चावडी येथे पहिल्या नंदीध्वजास नागफणा बांधण्यात येणार आहे. तसेच दोन ते सात नंदीध्वजांना बाशिंग बांधण्यात येणार आहे. रात्री आठच्या सुमारास होम विधी होत असून, मध्यरात्री एक वाजता वासराची भाकणूक होणार आहे.
१५ जानेवारीला शोभेचे दारूकाम होणार आहे. १६ जानेवारीला बाळीवेस हिरेहब्बू वाड्यातून योगदंड शुक्रवार पेठेतील देशमुख वाड्यात पूजेसाठी निघतात. तेथे मानकरी सोमशंकर देशमुख कुटुंबीयांच्या वतीने योगदंडाचे पूजन होत खोबरे खारीकचा प्रसाद वाटून महाप्रसादाने विधींची सांगता करण्यात येते. पत्रकार परिषदेवेळी हिरेहब्बू परिवारातील शिवानंद, मनोज, जगदीश, विनोद, प्रदीप, विकास, संतोष, धनेश आदींसह मानकरी सोमनाथ मेंगाणे, तम्मा मसरे, सुधीर थोबडे, संदेश भोगडे मास्तर यांची उपस्थिती होती.
अशी असेल सज्जता
-मंदिर मैदानपरिसरात सीसीटीव्ही
-घातपातविरोधीपथक
-साध्यावेषातीलडीबी पथक
-अारसीपीक्यूअारटीपथक (शीघ्रकृती दल)
-बाॅम्बशोधक-नाशकपथक
-होम मैदानावर तात्पुरते पोलिस ठाणे
-संपूर्ण मैदानावर सूचना एेकवण्यासाठी माइकची सोय
-फिरते पेट्रोलिंगपथक
-हरवलेली मुले शोधण्यासाठी मदतीसाठीे खास पथके
-हाॅकर्सविरोधीस्काॅड,दामिनी, बीट मार्शल सज्ज