आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुळजापुरात कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुळजापूर - कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीच्या मंचकी निद्रेस रविवारी सायंकाळी प्रारंभ झाला. सायंकाळच्या अभिषेक पूजेनंतर धार्मिक विधी करून तुळजाभवानीची मूर्ती सिंहासनावरून पलंगावर निद्रिस्त करण्यात आली. रविवारी (१७) पहाटे देवी मंचकी निद्रा संपवून सिंहासनावर विराजमान होईल.

तुळजापूर येथे रविवारी (दि.१०) सकाळपासूनच सेवेकरी पलंगे कुटुंबातील तानाजी पलंगे, बब्रुवान पलंगे, जगदीश पलंगे, अर्जुन पलंगे, सुनील पलंगे, भाऊसाहेब पलंगे, विनोद पलंगे, लक्ष्मण पलंगे आदींनी देवीच्या पलंगावरील गाद्या बाहेर काढून पलंग धुऊन स्वच्छ केला. त्यानंतर पलंगाला नवीन नवार बांधून देवीच्या मंचकी निद्रेसाठी पलंग सज्ज केला.
दरम्यान, पलंगाच्या गाद्यांमधील कापूस पिंजण्याचा मान मुस्लिम कुटुंबातील शम्मू शेख यांनी बजावला. त्यानंतर पंचक्रोशीतील शेकडो आराधी महिलांनी कापूस पिंजण्यास मदत केली. या वेळी आराधी महिलांनी हलगी-झांजांच्या तालावर आराधी गीते गायली. मंदिर संस्थानचे धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी, जयसिंग पाटील, मंदिर संस्थेचे कर्मचारी, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर पलंगावरच देवीची धूपारती व प्रक्षाळ पूजा करण्यात आली.

पौष प्रतिपदा ते सप्तमी या कालावधीतील देवीच्या मंचकी निद्रेस भोग निद्रा असे संबोधतात. या कालावधीत नवीन पिके, कडधान्ये, काढणीला आलेली असतात. या पिकांचा, पदार्थांचा भोग घेण्याची इच्छा देवीला होत असल्याने या निद्रेस भोग निद्रा असे म्हणतात. संपूर्ण भारतात एकूण ५१ शक्तिपीठे असून महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी तीर्थक्षेत्र तुळजापूर प्रमुख शक्तिपीठ आहे. तुळजापूरची तुळजाभवानीची मूर्ती ही शक्तिपीठांपैकी एकमेव चलमूर्ती आहे. इतर ठिकाणी मूळ मूर्ती न हलवता उत्सवमूर्ती हलवण्याची परंपरा असते. परंतु तुळजापूरची तुळजाभवानीची मूर्ती वर्षातून तीन वेळा २१ दिवस गाभाऱ्याबाहेर असते.