आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘लोकमंगल’चा जल्लोष, भाजपमध्ये सन्नाटा, देशमुखांनी देशमुखांचे अभिनंदन केले नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - आमदार सुभाष देशमुख यांच्या रूपाने सोलापुरास कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्याचा आनंद पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये दिसून आलाच नाही. काही ठराविक कार्यकर्ते जल्लोष साजरा करत होते. शहर भाजप कार्यालयात तर दिवसभर सन्नाटा होता. तर दुसरीकडे देशमुख यांची पर्यायी यंत्रणा असलेल्या लोकमंगल समूहाने मात्र रस्त्यावर उतरत जल्लोष साजरा केला. एकीकडे उत्साह तर दुसरीकडे शांतता असे विरोधाभासी चित्र आज पाहायला मिळाले. दरम्यान ना. देशमुख शनिवारी दुपारी सोलापुरात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शहर दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांना राज्यमंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती. पण, त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. देशमुख यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच लोकमंगल समूहातील दूध डेअरी कर्मचारी संघ, शीलरत्न गायकवाड मित्र परिवार, लोकमंगल महाविद्यालय, लाेकमंगल बँक, पतसंस्था तसेच शहर दक्षिणच्या वतीने जल्लोष करण्यात आला. लोकमंगल बँकेच्यावतीने मुख्य शाखा आणि शिवाजी चौकात जल्लोष साजरा करण्यात आला. शहर दक्षिण मतदार संघात बापूचे समर्थक असलेले डाॅ. शिवराज सरतापे, माजी नगरसेवक बाबूराव घुगे, महेश देवकर यांनी मोटारसायकल रॅली काढून आनंदोत्सव साजरा केला. तसेच दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यात निवडीचे जोरदार स्वागत करण्यात आले.
देशमुख आज शहरात : मंत्रिपदाचीशपथ घेतल्यानंतर सुभाष देशमुख प्रथमच शहरात येत आहेत. शनिवारी दुपारी ते शहरात येतील. लोकमंगल बँकेत नागरिकांना भेटतील, असे त्यांचे निकटवर्ती अविनाश महागावकर यांनी सांगितले.

दोन देशमुखांत तुलना : जिल्ह्यालाआणखी एक मंत्रिपद मिळाल्याने विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांनी काय केले याविषयी चर्चा सुरू आहे. विजय देशमुख यांनी आमदार परिचारक यांना निवडून आणण्यासाठी काम केले. पण प्रशासकीय अधिकाऱ्यांशी त्यांचे खटके उडाले. सुभाष देशमुख भाजपकडून निवडून आले असले तरी लोकमंगल म्हणत राहिले. पक्ष वाढीसाठी शहरात प्रयत्न केले नाहीत. पक्षापेक्षा त्यांनी पर्यायी यंत्रणा वाढवण्यावर भर दिला. मात्र, सामाजिक काम त्यांची जमेची बाजू आहे.

मंत्रिपदाबाबत बोलण्यास नकार
सुभाष देशमुख जेव्हा विधिमंडळाच्या मुख्य गेटबाहेर पडले, तेव्हा बाहेर थांबलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना उचलून घेत घोषणा दिल्या तसेच काही अंतर मिरवणूकही काढली. मंत्रिपदासंदर्भात विचारले असता, देशमुखांनी काही बोलण्यास नकार दिला. मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष यांचा विश्वास मला सार्थ करायचा आहे, इतकेच उत्तर त्यांनी दिले.

लोकमंगल जल्लोष करत असताना शहर आणि जिल्हा भाजप कार्यालयात मात्र सन्नाटा होता. कार्यालयाकडून कार्यकर्त्यांना आनंदोत्सवसाठी निरोप देण्यात आले नाहीत. त्यामुळे पक्षाकडून अधिकृतपणे जल्लोष साजरा झालाच नाही. पक्ष कार्यालयात पदाधिकारी असूनही शांतता दिसत होती. भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार मुंबईत असल्याने जिल्हा पदाधिकारी कार्यालयाकडे फिरकले नाहीत. महानगरपालिकेत भाजपचे नगरसेवक जगदीश पाटील यांनी पेढे वाटले. शुक्रवारी दिवसभर शहरातील वातावरण पाहता भाजपने आनंद राखून ठेवला आहे तर ‘लोकमंगल’ने साजरा केला.

मनपा, जिल्हा परिषद निवडणुकीवर लक्ष
सोलापूरसाठी दोन मंत्री पद देऊन भाजपने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. महापालिका निवडणुकीची जबाबदारी राज्यमंत्री विजय देशमुख यांच्याकडे तर जिल्हा परिषदेची निवडणूक जबाबदारी कॅबिनेट मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे असणार आहे.

पालकमंत्री खात्याविषयी उत्सुकता
ना. देशमुख यांना काेणते खाते मिळते या विषयी उत्सुकता आहे. शनिवारी दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस खाते वाटप करणार असल्याचे सांगण्यात आले. सार्वजनिक बांधकाम आणि सहकार खात्याबाबत चर्चा सुरू आहे. सुभाष देशमुख यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्याने पालकमंत्री पद दिले जाते का? याविषयी चर्चा सुरू आहे.

विशेष प्रतिनिधी मुंबई
लोकमंगल समूहाचे संस्थापक सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. शपथविधीनंतर बाहेर पडल्यानंतर अनेकांनी सुभाष देशमुखांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. मात्र त्यांच्याच जिल्ह्यातले त्यांच्याच पार्टीतील राज्यमंत्री असलेले विजयकुमार देशमुख शपथविधीनंतर बाहेर पडताना सुभाष देशमुखांसमोरून जाऊनही त्यांच्याकडे पाहता शुभेच्छा देताच तसेच पुढे गेल्याचे दिसले. आज सकाळी नऊ वाजता घाईघाईत झालेल्या शपथविधीला मोजके कार्यकर्ते हजर होते. त्यातही अनेकांना पास मिळाल्याने विधिमंडळाबाहेरच अनेकांना थांबावे लागले. या शपथविधी समारंभास सुभाष देशमुख यांचे मोजके कार्यकर्ते सेंट्रल हाॅलमध्ये हजर होते. पहिल्यांदा कॅबिनेट मंत्र्यांचा, त्यानंतर राज्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडला. राज्यपाल महोदय यांनी सेंट्रल हाॅल सोडल्यानंतर सर्व दहा नव्या मंत्र्यांनी हातात हात घालून छायाचित्रकारांना एकत्रितपणे पोझ दिली. त्यानंतर आपापल्या नेत्यांना शुभेच्छा देण्यासाठी सभागृहातील कार्यकर्ते, पाठीराख्यांनी एकच धाव घेतली.
सुभाष देशमुख शपथविधीनंतर सभागृहाबाहेर पडले. तेव्हा त्यांचे अनेक ज्येष्ठ मंत्री, आमदार यांनी अभिनंदन केले. देेशमुख जेव्हा अभिनंदनाचा स्वीकार करत होते. तेव्हा त्यांच्या अगदी समोरून सोलापूर जिल्ह्यातले राज्यमंत्री विजयकुमार देशमुख गेले. मात्र त्यांनी सुभाष देशमुख यांच्याकडे पाहिलेही नाही, की त्यांचे अभिनंदनसुद्धा केले नाही. सुभाष देशमुख पहिल्यांदा भाजप कार्यालयात गेले. तेथे कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी कडकडून मिठी मारून त्यांचे स्वागत केले.
नव्या मंत्र्यांचे खातेवाटप उद्या, शनिवारी जाहीर होणार आहे. शक्यतो कोणत्याही मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता नाही. मात्र सोलापूरला आता दोन मंत्री झाले आहेत. सध्या राज्यमंत्री विजय कुमार देशमुख सोलापूरचे पालकमंत्री आहेत. आता सुभाष देशमुखांना कॅबिनेट मिळाल्याने पालक मंत्रीपद त्यांच्याकडे जाणार, अशी चर्चा शपथविधीनंतर विधिमंडळ परिसरात होती.
बातम्या आणखी आहेत...