आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीपूर्वी बिल द्या, अन्यथा मालमत्ता जप्ती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - दिवाळीपूर्वी एफआरपीनुसार ऊसदर दिल्यास साखर कारखान्यांच्या पदाधिकारी संचालकांच्या वैयक्तिक मालमत्ता जप्त करून शेतकऱ्यांचे पैसे देऊ. कोणी कितीही मोठा, जवळचा असला तरी गय करणार नाही, असा इशारा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिला. तसेच मुख्यमंत्र्यांनी सहकाराच्या शुद्धीकरणाची सोपवलेली जबाबदारी चांगल्या प्रकारे पाडणार असल्याचेही त्यांनी म्हटले.
रविवारी (दि. १६) सहकारमंत्री देशमुख यांनी मुंढेवाडी येथील दुर्घटनाग्रस्त कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. तत्पूर्वी येथील श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सहकारमंत्री देशमुख म्हणाले, राज्यातील साखर कारखान्यांकडील थकित ऊसबिलाचा कालच आढावा घेतला आहे. दुर्भाग्याने सोलापूर जिल्ह्यातील आठ कारखान्यांनी अद्याप एफआरपीप्रमाणे संपूर्ण रक्कम दिली नाही. दिवाळीआधी ऊसबिल देण्याची तंबी त्या कारखान्यांना दिली आहे. मात्र, त्यांनी बिल दिल्यास त्यांच्या वैयक्तिक मालमत्तांवर टाच आणू. तसेच ५५ लोकांकडे जिल्हा बँकेचे अर्धे कर्ज वाटप झाले आहे, ही शोकांतिका असल्याचे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटले. या बँकेत कोणत्या पक्षाचे किती प्रतिनिधी आहेत, सर्वांनी तपासावे. काहीनी न्यायालयात धाव घेतलेली आहे. त्याच्या निकालानंतर चौकशी करून दोनतीन दिवसांत संबंधितांवर कारवाई करू, असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांची काळजी आहे. उजनीच्या पाण्याच्या नियोजनासाठी पाटबंधारेमंत्री गिरीश महाजन हे सक्षम आहेत. पाण्याचा दुरुपयोग होणार नाही. चोऱ्या होणार नाहीत. प्रथम पिण्यासाठी, नंतर शेतीसाठी आणि त्यानंतर उद्योगासाठी असेे पाण्याचे नियोजन केले जाईल, असे देशमुख यांनी सांगितले. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, सौदागर मोळक, वाईकर उपस्थित होते.

राज्य सहकारी बँकेमार्फत कर्ज
राज्यातील गावोगावच्या विकास सोसायट्यांत पदाधिकारी, संचालकांचेच कुटुंबीय, आप्त, कार्यकर्ते यांना सभासद करण्याची पद्धत प्रचलित आहे. ती बंद करून सर्वसामान्य शेतकऱ्यांना सभासदत्व देण्याची संस्थेच्या अध्यक्षांना विनंती करू. त्यानंतरही त्यांना सभासदत्व दिल्यास अशा सोसायट्यांवर कारवाई करू. या सभासदांना मध्यवर्ती बँकेने कर्ज दिल्यास एमएससी बँकेमार्फत कर्ज देण्यासाठी प्रयत्न करू, असेही सहकारमंत्री देशमुख यांनी सांगितले.

तहसीलदार घटनास्थळी फिरकलेच नाहीत
मुंढेवाडीत माळवद कोसळून मृत्यू झालेल्या बशीर हुसेन शेख यांच्या कुटुंबीयांची सहकारमंत्री देशमुख यांनी भेट घेतली. या वेळी शेख बंधू राजू शेख यांना रडू कोसळले. तो काही दिवसांत घराचे बांधकाम करणार होता, मात्र, त्याच्यावर काळाने घाला घातल्याचे त्याने सांगितले. त्यावर त्यांच्या आई महताबी शेख यांनाही रडू कोसळल्याने सहकारमंत्र्यांसह उपस्थित भावूक झाले होते. वाळू ठिकाणांना भेटी द्यायला तहसीलदार रात्रीही येतात. मात्र, या दुर्घटनेनंतर ते अद्याप इकडे फिरकल्याची ग्रामस्थांनी तक्रार केली.
बातम्या आणखी आहेत...