आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरेश जैन यांचे जंगी स्वागत! आकाशवाणी चौकात चाहत्यांचा गराडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - साडेचार वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर स्वगृही परतणारे माजी आमदार सुरेश जैन यांचे शनिवारी शहरात जंगी स्वागत करण्यात आले. दुपारी वाजता शहराच्या वेशीवर आगमन होताच जैन यांनी कपाळाला माती लावून देवाचे नामस्मरण केले आणि त्यानंतर शहरात प्रवेश केला. शहरात प्रवेश केल्यानंतर आकाशवाणी चौक ते शिवाजीनगरातील त्यांच्या बंगल्यापर्यंत ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, गुलाब पाकळ्यांची उधळण करीत समर्थकांनी जैन यांच्या आगमनाचा आनंद साजरा केला. वाढते वय आणि प्रवासाचा क्षीण यामुळे सायंकाळी घरी पोहोचल्यानंतर सुरेश जैन यांच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत होता.
घरकुल घोटाळ्यातील संशयितांपैकी सर्वात शेवटी जैन यांचा शुक्रवारी जामीन झाला. शनिवारी दुपारी १२ वाजून ५५ मिनिटांनी ते धुळे कारागृहातून बाहेर पडले. स्वागतासाठी कुटुंबीयांसह धुळ्यातील शिवसैनिक भगवे फेटे घालून हजर होते. बाहेर पडल्यानंतर थोड्या वेळातच त्यांनी जळगावचा प्रवास सुरू केला. धुळ्यातून सुमारे २५ चारचाकींच्या ताफ्याने जैन हे कुटुंबीय, नातेवाईक कार्यकर्त्यांच्या ताफ्याने जळगाव कडे निघाले.

रस्त्यात मुकटी, पारोळा, एरंडोल, पाळधी, बांभाेरी, खोटेनगर यासह लहान-मोठ्या खेड्यागावात नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. अनेक ठिकाणी ढोलताशांसह फुलांचा वर्षाव केला. जैन यांचा बांभोरीतून जळगावात प्रवेश हाेताच महामार्गावर वाहतुकीची कोंडी होत होती. त्यांनी जळगाव गाठल्यानंतर दादावाडी येथील पार्श्वनाथ मंदिरात दर्शन घेतले. त्यांच्या स्वागतासाठी येथे माजी खासदार विजय दर्डा यांच्यासह परिसरातील नागरिक हजर होते. मंदिर परिसरात महिलांनी दांडिया नृत्य करून आनंदोत्सव साजरा केला. जैन येथे पोहोचल्यानंतर त्यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

प्रभात चौकात पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांनी दोन्ही बाजूची वाहतूक थांबवल्याने सुमारे दीड तास महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली. दुपारी ४.१५ वाजता त्यांचे आकाशवाणी चौकात आगमन होताच जंगी स्वागत करण्यात आले. त्यांचे स्वागत करण्यासाठी, बघण्यासाठी सर्वांनी एकच गर्दी केली. कार्यकर्त्यांच्या गराड्यात जाऊन त्यांनी शुभेच्छा स्वीकारल्या. धुळे ते जळगावातील आकाशवाणी चौक हे अंतर पार करण्यासाठी त्यांना तब्बल चार तास लागले. आकाशवाणी चौक ते शिवाजीनगरपर्यंत त्यांचे चौकाचौकांत उत्सवी स्वागत झाले. स्वागतासाठी युवाशक्ती फाउंडेशनतर्फे ‘वी लव्ह यू दादा’ असे बॅनर लावले होते. रांगोळ्याही रेखाटल्या होत्या. दुपारी वाजेपासून कार्यकर्त्यांसह सुरेश जैन यांचे चाहते आकाशवाणी चौकात जमले हाेते. चाहते ढोलताशांच्या गजरात नाचून आनंदोत्सव साजरा करीत होते. शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्या मंगला बारी, शोभा चौधरी यांच्यासह इतरांनीही ठेका धरला. प्रभात चौकापासून ते आकाशवाणी चौकापर्यंत त्यांचे चाहते उजव्या बाजूने उभे होते. सुरेश जैन यांची कार येताच जमाव महामार्गावर आला. महापौर नितीन लढ्ढा, उपमहापौर ललित कोल्हे, माजी महापौर सदाशिवराव ढेकळे, करीम सालार, खाविआचे नगरसेवक उपस्थित होते.
जैन यांची तब्येत थोडी खालावली
आपल्याविशिष्ट शैलीतील आवाज आणि एनर्जेटिक म्हणून सुरेश जैन यांची ख्याती आहे. पण, साडेचार वर्षांपूर्वीचे त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि आताचे जैन यांच्या देहबोलीत काहीसा फरक जाणवला. वाढते वय, साडेचार वर्षांचा तुरुंगवास आणि मानसिक ताणतणाव यामुळे पूर्वीपेक्षा त्यांची तब्येत खालावलेली दिसून आली. कारागृहातून बाहेर पडल्यानंतर सध्या राजकारणाबद्दल काहीच विचार केला नसल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. पण भव्य स्वागत आणि कार्यकर्त्यांचा असा अनोखा जल्लोष पाहून मलाही ऊर्जा आली आहे, असेही सुरेश जैन या वेळी म्हणाले.
अब शांत रहेजो : जैन यांना आजीबाईंचा सल्ला
जैनयांची प्रतीक्षा करीत अनेक नातेवाईक दादावाडीतील पार्श्वनाथ मंदिरात थांबले होते. त्यात समाजातील एक वयोवृद्ध आजीबाईदेखील होत्या. जैन जळगावात नसल्यामुळे कुटुंबीयांसह समाजाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जैन मंदिरात पोहोचल्यानंतर त्या आजीबाईंना त्यांनी नमस्कार केला. या वेळी आजीबाईंनी डोक्यावरून हात फिरवत ‘अब शांत रहेजो’ असा वडिलकीचा सल्ला दिला. त्यावर कार्यकर्त्यांनी ‘आता शांती नाही, क्रांती करणार’ असे उत्तर आजींना दिले. आकाशवाणी चौकात समर्थकांच्या गराड्यात सुरेश जैन. या वेळी प्रत्येकाची त्यांना पाहण्यासाठी छबी टिपण्यासाठी चढाओढ सुरू होती.
गिरीश महाजनांच्या संपर्क कार्यालयासमोरही स्वागत
शिवतीर्थमैदानासमोरील जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयासमोर जैन यांची कार थांबली. तेथे कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. नेहरू चौकात त्यांची कार येताच फटाक्यांची आतषबाजी केली. मनपासमोर रिंकेश गांधी कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतषबाजीत गुलाब पाकळ्यांचा वर्षाव करीत स्वागत केले. टाॅवर चौक, पत्र्या हनुमान मंदिराजवळ फटाक्यांची आतषबाजी करीत गुलाब पाकळ्यांचा वर्षाव करून कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. गेंदालाल मिल परिसरातही स्वागत केले. शनिवारी सायंकाळी पावणेपाच वाजता जैन बंगल्यात पोहोचले. कुटुंबातील महिलांनी त्यांचे औक्षण केले. या वेळी शेकडो कार्यकर्ते भेटण्यासाठी गर्दी करीत होते. प्रवासात झालेले स्वागत कार्यकर्त्यांच्या गर्दीतून वाट काढत थकल्यामुळे काही मिनिटांतच जैन एका खोलीत जाऊन बसले. सुमारे पाऊणतास ते खोलीबाहेर आलेच नाही. थोडे फ्रेश झाल्यानंतर कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी अंगणात आले. त्यांनी हात वरती करून अभिवादन केले. या वेळी सर्वांच्याच चेहऱ्यावर जल्लोष जाणवत होता. आपले प्रेम माझ्यावर सदैव राहू द्या, असे सांगत आभार मानून अर्धा तास त्यांनी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. हा सारा आनंदोत्सव जैन यांच्या कुटुंबीयांनी मोबाइलमध्ये फोटो, व्हिडिओ रेकॉर्डिंग करून कैद केला. जैन यांच्या चेहऱ्यावरील हास्य कार्यकर्त्यांच्या जल्लोषामुळे कुटुंबीयदेखील गहिवरले होते.

बातम्या आणखी आहेत...