सोलापूर - करमाळ्याच्या निवडणुकीनंतर १९७८ मध्ये उत्तर सोलापूर तालुका राखीव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यावेळी माझी आणि तात्यांची पहिली भेट झाली. तेव्हापासून आम्ही एकत्र होतो. जणू कोठे आणि शिंदे कुटुंब एकच होते, असे हे नाते जुळले होते, अशी भावना माजी केंद्रीय मंत्री तात्या कोठेंचे जवळचे स्नेही सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली. श्री. शिंदे यांनी ‘दिव्य मराठी’जवळ विष्णुपंत कोठे यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला.
राजकारणात पदे मिळत गेली तसा मी मोठा होत गेलो. सोलापुरातील सर्व सूत्रे तात्यांच्या हाती होती. मला दोन आई. त्यांची काळजीदेखील तात्या घ्यायचे. शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्यानंतर त्यांनीच सेवा केली. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी ते माझ्यासोबत राहायचे. काम करायचे. राजकीय जीवनात आलेल्या अडचणीप्रसंगी तात्यांची मला खंबीर साथ लाभली. तात्यांसोबतचा तेव्हापासून आज अनंतात विलीन होईपर्यंतचा प्रवास माझ्या सदैव स्मरणात राहणारा आहे.
मी राजकारणात असताना तात्या हे माझ्या आई- वडिलांच्या नावाने शैक्षणिक संस्था काढत होते. त्यावेळी खूप अडचणी यायच्या. तात्यांची मात्र सदैव साथ लाभली. त्यांची आणि माझी अभेद्य मैत्री होती. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी त्यांचा अतिशय चांगला सहयोग लाभायचा. २००९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी मात्र काही लोकांनी तात्यांच्या मनात माझ्याविषयी गैरसमज िनर्माण करण्याचा प्रयत्न केला. आम्ही दोघांनीही त्याकडे दुर्लक्ष केले. नंतर मात्र महेश आणि प्रणिती विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उभे राहिले. त्यावेळी मात्र आमची मैत्री तुटली ते शेवटपर्यंत. त्यानंतर आम्ही कधीच जुळलो गेलो नाही. मैत्री तुटल्यानंतरही त्यांची काँग्रेस पक्षावरची निष्ठा कायम होती. ते अखेरपर्यत काँग्रेसवासी राहिले. तात्या शेवटपर्यंत म्हणायचे मी साहेबांचा आणि काँग्रेसचा आहे.
पार पाडली
निवडणुकांमध्येतात्या कोठे यांना जी काही जबाबदारी देण्यात येई, ती सर्व पूर्ण करत. सोलापुरात प्रायोगिक रंगभूमीसाठी स्वतंत्र असे ठिकाण हवे असे ठरले. ते संपूर्ण वातानुकूलित हवे. तिथे चित्रप्रदर्शन भरवता आले पाहिजे. गाण्यांचे कार्यक्रम झाले पाहिजे, असे एखादे ठिकाण तयार करण्याचे आमचे ठरले. यावेळी त्याची संपूर्ण जबाबदारी आम्ही काही मित्रांनी तात्या कोठे यांच्याकडे दिली. डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह उभारून तात्यांनी ती जबाबदारीदेखील पूर्ण केली.