आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहारच्या निकालाने भाजप नेत्यांचा उन्मत्तपणा उतरेल- सुशीलकुमार शिंदे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या गतीने लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले. त्याच गतीने खाली येतील. भाजपने जाती-धर्माचे विष पेरणी करून सत्ता मिळवली. भाजप नेत्यांचा उन्मत्तपणा बिहार निवडणुकीच्या क्रांतिकारी निकालामुळे निश्चितच उतरला आहे, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली.
शिंदे म्हणाले, बिहार निवडणूक निकालानंतर देशात तत्काळ परिवर्तन होणार नाही. पण त्याची सुरुवात निश्चित झाली आहे. भाजपने सत्तेवर येण्यासाठी जात-धर्माचा आधार घेत लोकांच्या भावाना भडकवल्या. बिहारच्या निवडणुकीत भाजपच्या आश्वासनांना जनता भुलली नाही. लालूप्रसाद यादव व नितीशकुमार हे दोघे परस्परांचे राजकीय विरोधक धर्मांध शक्तींना विरोध करण्यासाठी एकत्र आले. त्यांच्या एकजुटीमुळे बिहारच्या राजकारणात वेगळा इतिहास घडला. धर्मांधांच्या हातामध्ये सत्तेची सूत्रे न जाऊ देणारे लालू नितीश हिरो आहेत, असे सांगत लालूंचे कौतूक केले.
काँग्रेसची वाढतीय ताकद-
बिहारच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या जागांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पूर्वी चार ते पाच जागांवर असलेल्या काँग्रेसला या वेळी 25 पेक्षा जास्त जागा मिळाल्या, ही चांगली सुरवात आहे. ज्या वेळी काँग्रेस सत्तेपासून बाजूला राहिली त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये मोठ्या ताकदीने पुन्हा सत्तेत आली, हा इतिहास आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून उत्साहाने पक्षकार्यात सक्रीय असावे, असा सल्ला त्यांनी दिला.
राहुल गांधीच नेतृत्व करतील-
बिहारमध्ये सर्वांधिक जागा जिंकूनही लालूप्रसाद यादव यांनी नितीशकुमार यांनाच मुख्यमंत्री म्हणून घोषित करून मनाचा मोठेपणा दाखवला आहे. राष्ट्रीय पातळीवर धर्मांध शक्तींच्या विरोधात नेतृत्व लालूप्रसाद करणार असून, त्यांच्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. राहुल गांधी यांच्या रक्तामध्येच नेतृत्वाचे गुण आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी केलेले मनोगत, कसदार मुरब्बी नेत्याप्रमाणेच होते. मार्च 2016 मध्ये पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होणार असून, राहुल गांधी पक्षाचे यशस्वी नेतृत्व करतील, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले.
दुष्काळाबाबत राज्यकर्त्यांनी सतर्क असावे
सोलापूरचा समावेश राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये नसल्याबाबतच्या प्रश्नावर बोलताना माजी मंत्री शिंदे म्हणाले की, अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे त्या संदर्भातील माहिती व्यवस्थित पोचली नसेल तर, त्यांचे वरिष्ठ काय करीत होते? असा प्रतिप्रश्न उपस्थित केला. राज्य शासनाने स्थानिक परिस्थितीचा स्वतंत्र अभ्यास करून येथील दुष्काळग्रस्तांना दिलासा दिलाच पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
चांगल्या कामास सहकार्य
खासदार शरद बनसोडे यांनी सोलापूरच्या विमानसेवेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सोलापूरच्या विकासासाठी होणाऱ्या प्रयत्नांना माझाही हातभार असेल, असेही त्यांनी सांगितले. एनटीपीसीचे कामकाज योग्य पद्धतीने सुरू आहे. स्थानिकांना मिळणा-या नोक-यांबाबत मला फार समाधान वाटते. एनटीपीसीमुळे सोलापूरचा चांगला विकास होईल, असेही त्यांनी सांगितले.