आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पीएम’मध्ये दोष निघाल्यास ताडीचा परवाना करणार रद्द

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरातील ताडी दुकानांच्या परिसरात तिघांचा संशयास्पद मृत्यू झाला. याबाबत शवविच्छेदन अहवाल मागवले आहेत. त्यात रासायनिक ताडीचा अंश आढळून आल्यास संबंधित दुकानांचे परवाने रद्द करणार असल्याचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी सांगितले.
न्यू पाच्छा पेठ आणि मोदी येथील ताडी दुकानांच्या परिसरात तिघांचा संशयास्पद मृत्यू झाला. पहिली घटना १५ सप्टेंबरला घडली. न्यू पाच्छा पेठेतील विनस कंपनीचा परवानाधारक असलेल्या नरेंद्र हरिपंत कुलकर्णी यांच्या ताडी दुकानात एक जण बेशुद्धावस्थेत होता. जेलरोड पोलिस ठाण्याचे फौजदार कुंदन सोनोने यांनी त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली. परंतु मृताची अाेळख पटली नाही. बेवारस मृतदेह म्हणून पोलिसांनीच त्याच्यावर अंतिम संस्कार केले.

दुसरी घटना १५ सप्टेंबर रोजीच रात्री साडेसातच्या सुमारास मोदी ताडी दुकान आणि केंद्रीय विद्यालयासमोरील दुभाजकावर घडली. तिथे अंदाजे २२ वर्षाच्या तरुणाचा मृतदेह पडलेला होता. त्याच्या नातेवाइकांनी कुठलीच तक्रार नसल्याचे सांगून त्याला ताब्यात घेतले. या दोन्ही घटना घडल्यानंतर शनिवारी (दि. १९) सकाळी तिसरी घटना घडली. मोदी ताडी दुकानाच्या जवळच राहणाऱ्या विलास सिद्राम माढेकर २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या सर्व घटनांची नोंद पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क खात्याने केली. ताडीचे नमुने घेतले. त्याच्या रासायनिक पृथ:करणासाठी मुंबईच्या प्रयोगशाळेकडे पाठवले. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असते. त्यासंबंधी विचारणा केली असता, त्यांनी मृतांच्या शवविच्छेदनाचे अहवाल आल्यानंतरच कारवाईची दिशा ठरणार असल्याचे स्पष्ट केले.

शहर आणि जिल्ह्यातील परवानाधारक ताडी दुकानांतून दरमहा ताडीचे नमुने घेतले जातात. ते हाफकिनच्या प्रयोगशाळेकडे पाठवण्यात येतात. त्यात आतापर्यंत कुठलाच दोष आढळलेला नाही. परंतु गेल्या आठवड्यात झालेल्या तिघांच्या संशयास्पद मृत्यूमध्ये रासायनिक ताडीचा अंश आढळल्यास संबंधित परवाने रद्द करून दोषींवर गुन्हा दाखल करू.

ताडी दुकानांच्या परिसरात झालेल्या घटनांची पोलिस चौकशी सुरू आहेच. शिवाय राज्य उत्पादन शुल्क खात्यानेही दोन्ही दुकानांतील ताडीचे नमुने घेतले आहेत. त्यातही दोष आढळल्यास परवानाधारकांवर कारवाई होऊ शकते. त्यासाठी आता अहवालांची प्रतीक्षा आहे. दोष आढळून आल्यास दोषींची हयगय केली जाणार नाही.

होय, जिल्हाधिकारीच कारवाई करू शकतात
ताडीविक्रीवर राज्य उत्पादन शुल्क खात्याचे नियंत्रण असले तरी त्याच्यातील दोष पडताळून कारवाई करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनाच आहेत. कारण जिल्हाधिकारीच ताडी दुकानांचे लिलाव करतात. दोष आढळल्यास परवाने रद्दही करू शकतात.