आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुवर्ण सिद्धेश्वरमुळे वाढेल सोलापूरचा लौकिक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांचे पुरातन मंदिर सोने-चांदीने मढवण्याची दिव्य मराठीची संकल्पना अतुलनीय आहे. एखाद्या वृत्तपत्राने असे अभियान घेतल्याचे आजवर वाचनात आले नाही. भाविकांचा या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी ही संकल्पना पुर्णत्वास नेऊन पुण्य वाटून घ्यावे. सुवर्ण सिध्देश्वर संकल्पना प्रत्यक्षात उतरल्यावर सोलापूरचा नावलौकिक अजून वाढेल, पर्यटनात वाढ होईल, रोजगारनिर्मिती वाढेल. त्यामुळे सोलापूरचे भविष्य उज्ज्वल असेल, असे उद्गार काशीपीठाचे जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य यांनी काढले.

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्यास उपस्थित राहून काशी जगदगुरू नुकतेच सोलापुरात आले आहेत. सुवर्ण सिध्देश्वर महाअभियानासह सिंहस्थ कुंभमेळ्यात आलेले अनुभव त्यांनी सांगितले. यावेळी सिद्धय्या स्वामी हिरेमठ, मंद्रूपचे श्री. रेणुक शिवाचार्य, करजगीचे श्री. शिवानंद स्वामीजी, महेश हिरेमठ, बाबूराव मैंदर्गीकर, सरिता हिरेमठ, सोनाली हिरेमठ, वैशाली गुंड-पाटील आदीजण उपस्थित होते. यंदाच्यावर्षी शाहीस्नानाच्या दिवशी महास्वामीजींची अड्डपालखी नाशकात साधुग्रामपासून कुशावर्त कुंडापर्यंत काढण्यात आली. यात वडांगळी, नागणसुर, धारेश्वर, वाई, माढा, औसा, चिटगुप्पा, मागणकेरी, होटगी, अंबाजोगाई, बाळापूर, गडगा आदी वेगवेगळ्या ठिकाणांहून शिवाचार्यगण सहभागी झाले होते. नवग्रहामध्ये पूर्वग्रह ज्यावेळी सिंहराशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा नाशिक क्षेत्रातील गोदावरी नदीला आणि त्र्यंबकेश्वर देवालयाजवळ असलेल्या कुशावर्त कुंडाला कुंभ पर्व प्राप्त होते. म्हणून यास देश - विदेशातून लाखो श्रद्धाळू मंगलस्नान करण्यास येतात. या शाहीस्नानावेळी दशनामी संप्रदायातील सर्व मंडलेश्वर आणि महामंडलेश्वर आपल्या शिष्य, नागा साधूंबरोबर उत्साहाने सहभागी झाल्याचे जगद्गुरुंनी सांगितले.

पहिला टप्पा लवकरात लवकर सुरू करावा
सोलापूरच्याविकासात हातभार लावणारा सुवर्ण सिद्धेश्वर महाअभियानातील पहिल्या टप्प्यातील निधीचे संकलन अल्पावधीत चांगले झाले आहे. या महाअभियानात अनेक टप्पे असल्याने पहिल्या टप्प्याची सुरुवात एखादा चांगला मुहूर्त पाहून लवकरात लवकर करण्यात यावी, अशी भावना जगद्गुरू डॉ. चंद्रशेगर शिवाचार्य यांनी दिव्य मराठीकडे व्यक्त केली.

कुंभमेळ्यात शाहीस्नानापश्चात उपस्थितांना मार्गदर्शन करताना काशीपीठाचे जगद्गुरू श्री १००८ डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी अन्य आखाड्यांचे प्रतिनिधी