आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Swabhimani Shetkar Sanghtna Morcha In Pandharpur Sadabhau Khot

मंत्र्यांच्या गाड्या फिरू देणार नाही, सदाभाऊ खोत यांचा भाजपला इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - ‘राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांसमाेर दाेनच पर्याय अाहेत. एक म्हणजे आत्महत्या करून मरणे किंवा लढुन मरणे. मात्र, आमचा शेतकरी हा आत्महत्या करणार नाही हे सरकारने ध्यानात ठेवावे. येत्या काळात पिण्याच्या पाण्याचे टँकर तसेच चारा छावण्या सुरू न केल्यास साेलापूर जिल्ह्यात कोणत्याही मंत्र्यांच्या लाल दिव्यांच्या गाड्या फिरू देणार नाही,’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी बुधवारी दिला. या माेर्चात सत्ताधारी भाजपचे मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष व शिवसेनेचे कार्यकर्ते माेठ्या संख्येने सहभागी झाले हाेते.
खोत म्हणाले, ‘आम्ही सत्तेत असलो तरी सत्ता आमची नाही. जनतेच्या प्रतीच आमची निष्ठा आहे. सध्या राज्याची परिस्थिती दुष्काळामुळे बिकट बनली आहे. एकीकडे दुष्काळावर उपाययोजना करण्यात राज्य सरकार कमी पडू लागले आहे. मात्र, दुसरीकडे भाजपमधील नेतेमंडळींत बारामतीची वारी करण्याची स्पर्धा लागली आहे. बारामती म्हणजे ‘देवाची आळंदी’ नव्हे, तर ती ‘चोरांची आळंदी’ आहे, असा सल्ला त्यांनी दिला. ‘सत्तेत असताना ठगांनी भ्रष्टाचार कसा केला याचे मार्गदर्शन करण्यासाठी बारामतीत प्रशिक्षण केंद्र सुरू केले की काय हे समजत नाही. त्यामुळेच भाजप नेत्यांची त्या ठिकाणी गर्दी हाेत अाहे,’ असा टाेलाही खाेत यांनी लगावला.
या वेळी रविकांत तुपकर, डॉ.बी.पी.रोंगे, साईनाथ अभंगराव, महावीर देशमुख, रासपाचे बालाजी पाटील, संभाजी शिंदे, दीपक भोसले आदींंनीही सरकारच्या धाेरणावर टीका केली.

जिल्हाधिकाऱ्यांना काळे फासणार
‘मस्तवाल जिल्हाधिकारी स्वत:ला हिटलर समजतात, त्यांना सत्तेची नशा चढली आहे. टँकर, छावण्या सुरू न केल्यास या जिल्हाधिकाऱ्यांचे मुंडण करू. वीज दिली नाही आणि पाणी सोडले नाही तर त्याच्या तोंडाला काळे फासू,’ असा इशाराच खाेत यांनी तुकाराम मुंडे यांचे नाव न घेता दिला. ‘वाळूच्या गाडीखाली स्वत: पडून जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिद्धी मिळवली,’ असा अाराेपही खाेत यांनी केला.