आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

95 टक्के काम झाल्याचा दावा, जागेवर मात्र केवळ भिंतीच; स्वच्छ भारत अभियानातील शौचालयांची स्थिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेच्या वतीने नव्याने बांधण्यात येत असलेल्या शौचालयांचे काम ९५ टक्के पूर्ण असल्याची नोंद महापालिकेच्या दप्तरी अाहे. पण प्रत्यक्षात जागेवर केवळ शौचालयाच्या भिंतीच उभारलेल्या दिसताहेत. जी शौचालये बांधून पूर्ण आहेत त्याचा वापर सुरू केल्यामुळे त्याचीही दुरवस्था झाली अाहे. ती मोडकळीला अाली अाहेत. त्यामुळे शहर स्वच्छतागृहयुक्त करण्याचा संकल्प फक्त कागदावरच राहतो की काय, अशी शंका उपस्थित झाली आहे.
 
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात सोलापूर शहरात सार्वजनिक ठिकाणी शौचालये उभारण्याची योजना अंमलात अाणली जात अाहे. या योजनेतून जवळपास २५५ शौचालये उभारली जाणार अाहेत. त्यासाठी एक कोटी ३२ लाख ६० हजार रुपये इतका खर्च अपेक्षित अाहे. त्यात केंद्र सरकार ३९ हजार अाणि राज्य सरकार १३ हजार रुपये असे एकूण ५२ हजार रुपये प्रती शौचालय खर्च अाहे. इतका निधी खर्चूनही जागेवर मात्र एकही शौचालय पूर्ण झाल्याचे दिसत नाही. एकही शौचालय नागरिकांना वापरण्यायोग्य उभारण्यात अाले नाही.
 
जुने शौचालय पाण्याअभावी बंद होण्याच्या स्थितीत
कोयनानगर एमएसईबी केंद्रालगत, देगाव-मारुती मंदिर लगत, साठे नगर अंतर्गत, साठे पाटील वस्ती, जगताप हॉस्पिटल समोरील, रिलायन्स मॉल समोर, बुधवार पेठेतील वस्तीत, तेलंगी पाच्छा पेठ याठिकाणचे शौचालय पाण्याअभावी बंद पडण्याच्या स्थितीत आहेत. या शौचालयांच्या जवळ हौद बांधण्यात आले आहेत. मात्र तेथे पाण्याची सोय करण्यात आली नाही. त्यामुळे येथे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. दररोज शौचालय धुणे आवश्यक असताना आठवड्यातून एकदा फक्त ते सुद्धा ओरड झाल्यानंतर धुतले जाते. ते सुद्धा धुवून धुतल्यासारखे असते. म्हणून नाईलाजास्तव उघड्यावर शौचविधी होत आहे. त्यामुळे हागणदारीमुक्त शहर करण्याचा संकल्प अपूर्णच राहणार असल्याचे चित्र दिसते. एकदा असे शौचालय बंद पडले की ते पाडून जागा हडप करण्याचा नेत्यांचा डाव असतोच.

जय भवानी हायस्कूलच्या ठिकाणची जागाच चुकीची
जयभवानी हायस्कूल येथे बांधण्यात आलेल्या शौचालयाला एकही दरवाजा नाही. तसेच फक्त बांधकाम पूर्ण करून सोडल्यामुळे तोडफोड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे हे शौचालय मैदानाच्या एका कडेला, वस्तीच्या बाजूला असले असते तर याचा उपयोग झाला असता. मात्र मैदानाच्या मधोमध हे घेतल्यामुळे याचा वाली, वारस कोणीच नाही आणि त्याची तोडफोड झाली आहे. पावसाळ्यात या शौचालयात जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार, हे नक्की

परिवहनमधील चारही शौचालय अपूर्णच
परिवहनउपक्रमाकडील सात रस्ता कंट्रोल रुम, रेल्वे स्टेशन कंट्रोल रुम, सात रस्ता बस डेपो या तिन्ही शौचालयाच्या ठिकाणी अद्याप पाण्याची सोय, ड्रेनेज कनेक्शन जोडण्यात आले नाही तसेच राजेंद्र चौक बसडेपोमधील शौचालयाचे शंभर टक्के काम पूर्ण होऊनही त्याचा वापर होत नाही.
 
इतर ठिकाणीही नोंदीत बोंबाबोंबच दिसत आहे...
केगावपाण्याच्या टाकीजवळ ७० टक्के, बुधवार पेठ, मनपा शाळा क्रमांक ११ येथे ९५ टक्के, जय भवानी हायस्कूल येथे ९५ टक्के काम पूर्ण दाखवले. बुधवार पेठेतील या शौचालयात टाईल्स आणि दरवाजे तुटलेल्या स्थितीत आहेत. बाजूला हातपंप आहे मात्र पाणी नाही. मग हे ९५ टक्के काम म्हणता येईल का. जय भवानी हायस्कूलच्या येथे अशीच स्थिती आहे.
 
स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात नव्याने शौचालय बांधले जात आहेत. काही शौचालय बांधकाम पूर्ण झाल्याची यादी आमच्याकडे आली होती. ती आम्ही संबंधित झोनकडे पाठवली. याची पाहणी करून प्रत्यक्षात बांधकाम पूर्ण झाल्याचा अहवाल सादर करण्यासाठी सांगितले आहे. काम शिल्लक असतील ते पूर्ण करून घेतले जाईल.
- एस.आर. जोगदनकर, मुख्यसफाई अधीक्षक

नागरिकांच्या पैशाचा वापर प्रामाणिकपणेच व्हायला हवा
देगाव, डोणगावरोड, बाळे परिसरात अनेक नवीन शौचालये पाण्याअभावी बंद पडण्याच्या स्थितीत आहेत. तसेच नवीन शौचालय दर्जेदार बनवत नाहीत. जे पूर्ण केल्याचा दावा केला जात आहे ते सुद्धा प्रत्यक्षात अपूर्ण आहेत. निकृष्ट दर्जाचे आहेत. महापालिका प्रशासनामार्फत पूर्वी ज्या पद्धतीने काम केले जायचे तसे आता चालणार नाही. नागरिकांच्या पैशांचा वापर पारदर्शी आणि प्रामाणिकपणेच व्हायला हवा.
- गणेश वानकर, नगरसेवक, शिवसेना
 
बातम्या आणखी आहेत...