आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवसमाज निर्मितीची दृष्टी भगतसिंगांची

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भगतसिंग या प्रगल्भ क्रांतिकारक विचाराच्या तरुण देशभक्तास स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नवसमाज निर्मितीची दृष्टी होती. केवळ २४ वर्षे अायुष्य लाभलेल्या या युवकाने अनेक विषयांवर मूलभूत चिंतन केलेले अाहे. अस्पृश्यता ही भारतातील एक क्लिष्ट अशी समस्या अाहे. या प्रश्नावर १९२८ मध्ये ‘कीर्ती’च्या जूनमधील अंकात त्यांनी अापले विचार मांडलेले अाहेत. त्यांच्यावर अार्य समाजाचा प्रभाव होता.
अस्पृश्यतेच्या प्रश्नाचेस्वरूप भगतसिंग स्पष्ट करतात. ते लिहितात, ३० कोटी लोकसंख्या असलेल्या देशात कोटी लोकांना अस्पृश्य समजून त्यांंना मंदिरात प्रवेश करण्यास बंदी, विहिरीतून पाणी काढण्यास बंदी असे अधिकारसुध्दा नाकारले जातात. अापल्या अध्यात्मवादी देशात अापण माणसाला माणसाचा दर्जा नाकारत अाहोत. ते पुढे असा सवाल विचारतात, की इंग्रज अापल्याला दुय्यम वागणूक देतात. समानतेने वागवत नाही, म्हणून अापण तक्रार करतो. अस्पृश्यांना जर अापण समानतेने वागवत नसू तर अाम्हास इंग्रजांप्रमाणे समान वागणूक द्या, अशी तक्रार करण्याचा अधिकार नाही. जेव्हा तुम्ही दुसऱ्या माणसाला समान अधिकार देण्यास नकार देता, तेव्हा तुम्हाला समानतेने वागवण्याचा अधिकार नाही हे या तरुण क्रांतिकारकाचे अात्मपरीक्षण अाहे.

अस्पृश्यतेच्या समस्येवर विचार व्यक्त करताना भगतसिंग लिहितात, सर्व माणसे समान अाहेत. कोणीही जन्माने किंवा श्रम विभागणीमुळे वेगळा नाही. त्यांच्या मते एखादी व्यक्ती भंगी जातीत जन्मली म्हणून तिने जन्मभर मैला साफ करण्याचे काम करावे? इतर काम करण्याचा त्या व्यक्तीस अधिकार नाही हे म्हणणे अर्थहीन ठरते. अापल्या पूर्वज अार्यांनी त्यांच्याशी अन्यायकारक व्यवहार केला. ते हलकी कामे करतात, म्हणून त्यांचा तिरस्कार केला. एवढेच नव्हे तर त्यांनी प्रतिकार किंवा बंड करू नये. म्हणून पुनर्जन्माच्या तत्त्वाचा प्रचार केला. हीन कामे करावी लागणे हे पूर्वजांच्या पापाचे फळ अाहे, ते करत राहा, असा उपदेश केला. अशा अमानवी गोष्टीबाबत भगतसिंग प्रतिपादन करतात की, अाम्ही माणसाच्या मनातील मानवतेलाच नष्ट केले. मानवी हक्कांचे दमन केले, अन्याय केला. अाज त्याचे प्रायश्चित्त घेण्याची वेळ अाली अाहे. संवेदनशील चिंतनशील अशा क्रांतिकारकांच्या मनातील हे विचार अाहेत. स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यापेक्षा भगतसिंगांना अस्पृश्यतेच्या प्रश्नावर मूलगामी व्यापक दृष्टी होती, असे स्पष्ट दिसून येते.

भगतसिंग केवळ अस्पृश्यतेच्या प्रश्नाचे स्वरूप स्पष्ट करीत नाहीत तर हा प्रश्न सोडवण्यासाठी अस्पृश्यांना सल्लाही देतात. ते लिहितात, जोपर्यंत अस्पृश्य जाती स्वत:ला संघटित करणार नाहीत, तोपर्यंत हे काम होणार नाही. ते अस्पृश्यांना स्वत:ची वेगळी संघटना स्थापन करण्याचे सूचवितात. समस्या सोडवण्यासाठी कायदेमंडळात स्वत:चे प्रतिनिधीत्व असावे. त्यांच्या विकासासाठी अधिकचे अधिकार देण्याची गरज अाहे. अधिकारप्राप्तीशिवाय त्यांना नागरी हक्क प्राप्त होणार नाहीत. विधानसभेत प्रतिनिधित्व म्हणजे निर्णयप्रक्रियेत सहभाग असावा. शाळा-महाविद्यालयात प्रवेश मिळाला पाहिजे. १९३० मधील देशातील राजकीय घडामोडीचा विचार करता चोवीस वर्षाचा क्रांतिकारक अस्पृश्य वर्गाच्या प्रभावी राजकीय प्रतिनिधित्वाचे प्रतिपादन करतो, ही बाब दूरदृष्टी स्पष्ट करणार अाहे.

भगतसिंग हे स्वतंत्र विचाराचे होते. त्यांनी मार्क्ससह सर्व प्रमुख विचारांचा अभ्यास केला होता. ते पोथीनिष्ट मार्क्सवादी नव्हते. ते अस्पृश्यांना अस्सल सर्वहारा मानतात. तुम्ही संघटित व्हा. तुमचे नुकसान होणार नाही, उलट गुलामांच्या बेड्या तुटून पडतील. उठा. प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात बंड पुकारा. हळूहळू होणाऱ्या सुधारणेमुळे काही साध्य होणार नाही. सामाजिक अांदोलनातून क्रांती उभी करा. राजकीय अार्थिक क्रांतीसाठी कंबर कसा. तुम्हीच तर देशाचे मुख्य अाधार अाहात. निद्रिस्त सिंहानो, उठा बंड पुकारा असे ते अावाहन करतात.
भगतसिंगांच्या ८५ व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने असे म्हणावे वाटते की, शहीद भगतसिंग यांना अापण त्यांच्या समग्र विचारांसह स्वीकारले अाहे काय? त्यांच्या स्मृतीस अभिवादन.
{
इतिहासाकडे वळून पाहा...
अस्पृश्य म्हटल्या जाणाऱ्या सर्व खऱ्या लोकसेवकांनो अाणि बंधूंनो, जागे व्हा.. उठा.. अापल्या इतिहासाकडे पाहा. गुरू गोविंदसिंगांच्या फौजेची खरी शक्ती तुम्हीच होता. छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या जोरावरच सारे काही करू शकले. त्यामुळेच त्यांचे नाव अाजही घेतले जाते. तुमची बलिदाने सुवर्णाक्षरामध्ये लिहिलेली अाहेत. तुम्ही सदैव सेवा देऊन जनतेचे जीवन सुखी अाणि सुरक्षित करत अाहात, त्याची अाम्हाला जाण नाही.
बातम्या आणखी आहेत...