आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्हेत्रे-काळेंना बँकेत घ्या, आम्ही पाठीशी उभे राहू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - दिलीपराव,तुम्ही विधान परिषदेसाठी जसे इच्छुक आहात, तसे आमदार सिद्धाराम म्हेत्रे कल्याण काळे हे जिल्हा बँकेवर जाण्यासाठी इच्छुक आहेत. जिल्हा बँक बाजार समितीचे अध्यक्षपद तुमच्याकडे, खासगी कारखानेही तुमचेच, आता पुन्हा विधानपरिषदेसाठी इच्छुक आहात. तुम्ही त्यांना बँकेच्या संचालक मंडळावर घ्या. विधानपरिषदेसाठी आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असे आवाहन वजा सल्ला आमदार भारत भालके यांनी काँग्रेसच्या बैठकीत दिलीप माने यांना दिला.

विधान परिषद निवडणूक नागपूरमधील हिवाळी अधिवेशनावर काँग्रेसतर्फे काढण्यात येणाऱ्या मोर्चाचे नियोजन करण्यासाठी शनिवारी काँग्रेस भवन येथे पक्षाची बैठक झाली. यावेळी शहराध्यक्ष प्रकाश यलगुलवार, जिल्हाध्यक्ष संतोष पाटील, माजी आमदार निर्मला ठोकळ, प्रकाश पाटील, दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे गुरुनाथ म्हेत्रे, राजेश पवार, सुधीर खरटमल यांच्यासह पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार भालके म्हणाले,राष्ट्रवादी काँग्रेस इतर मित्रपक्षांशी तुमचे चांगले संबंध आहेत. बँक निवडणुकीच्या निमित्ताने तुम्ही फार प्रयत्नशील आहात. त्याच पद्धतीची वकिली तुम्ही म्हेत्रे- काळेंना संचालकपदाची संधी मिळवून देण्यासाठी करा. इतर ठिकाणी बोलताना तुम्हाला अडचण येईल. पण, आता काँग्रेसच्या कळपात असून त्या दोघांना संचालक करण्याचा शब्द द्या. तसेच, राष्ट्रवादी नेत्यांकडून जिल्हा परिषदेत काँग्रेसला सत्तेत वाटा मिळावा, अशी गळ त्यांनी मानेंना घातली. जिल्हा बँक कुणाच्या बापाची नाही. तुम्ही अध्यक्ष नसता तर बँकेच्या कारभाराबाबत फाडून खाल्ले असते, असे परखड मत व्यक्त केले. बँकेच्या निवडणुकीच्या संदर्भात अगोदरच तुम्ही पक्षाची बैठक घेणे अपेक्षित होते. पण, दुसऱ्यांच्याबरोबर बैठकीला गेला अन् अर्जही भरला नाही, असा टोला जिल्हाध्यक्ष संतोष पाटील यांना लगावला. सत्ताधारी फडणवीस सरकारच्या कामकाजावर त्यांनी यावेळी सडकून टीका केली.

आमदार म्हेत्रे यांनीही भालकेंच्या सुरात सूर मिळत, बँकेत संधी मिळालीच पाहिजे, अशी भूमिका मांडली. माने यांनी बँकेचा कारभार चांगल्या पद्धतीने केल्यामुळेच अडचणीतील बँक वाचली अशी मानेंची स्तुती करीत, राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषदेची जागा काँग्रेसला मिळालीच पाहिजे, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली.

मनपा डोळ्यासमोर ठेवून निर्णय घ्या : माने
विधान परिषदेची जागा काँग्रेसचीच असून १९८५ मध्ये (कै.) ब्रह्मदेवदादा माने येथूनच निवडून गेले होते. त्यानंतर ही जागा मित्रपक्षाला सुटली. पण, यावेळी काँग्रेसला जागा मिळालीच पाहिजे. काँग्रेसची सदस्य (मतदार) संख्या जास्त आहे. उमेदवारीबाबतचा निर्णय माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे घेतील. राष्ट्रवादी काँग्रेसकडून जागा मिळाली पाहिजे. पुढील वर्षी महापालिकेच्या निवडणुका असून दूरदृष्टीचा विचार करून निर्णय घ्यावा, असे माजी आमदार माने यांनी बोलताना सांगितले.